ती दोघे म्हातारीच्या खानावळीत आली. त्यांना पाहून म्हातारीला आनंद झाला.
‘काय रे, अलीकडे येत नाही फार ते?’ तिने विचारले.
‘पण आज आलो ना? आता खायला दे. आम्हांला भुका लागल्या आहेत.’ मंगा म्हणाला.
‘थांबा, थालीपीठ लावते व तुम्हांला देते.’ म्हातारी म्हणाली.
म्हातारी थालीपीठाच्या तयारीला लागली. मुले तेथे बसली होती. मधुरी म्हातारीच्या पाठीशी उभी होती.
‘हसायला काय झाले मधुरी?’ म्हातारीने विचारले.
‘तू किती म्हातारी झालीस? केस पिकायला लागले.’ मधुरी म्हणाली.
‘परंतु मी अजून तीस वर्षे जगेन. मी पुरी शंभर वर्षे जगेन. मी लौकर मरणार नाही.’ म्हातारी म्हणाली.
‘तू मुलांना खाऊ देतेस म्हणून देव तुला नेत नाही. होय ना ग आजी?’
‘देवाला सारी आवडतात.’ बुधा म्हणाला.
‘आजी. मला कुडकुडीत हवे हो. मंगा म्हणाला.
‘मला जाऊ हवे. बुधा म्हणाला.
‘आणि मधुरी तुला ग? म्हातारीने विचारले.
‘मी एक तुकडा कुडकुडीत खाईन व एक नरम खाईन.’ मधुरी म्हणाली. मुलांनी थालीपीठ खाल्ले. मुले जायला निघाली. म्हातारी तेथे अंगणात उभी होती. येत जा रे रोज माझ्याकडे. ती म्हणाली. बरे हो. म्हणून मुले गेली.
एके दिवशी त्या वाळूच्या टेकडीवर तिघे बसली होती.
‘मधुरी, आज आपण गंमतीचा एक खेळ खेळू. मी फुलांच्या माळा आणल्या आहेत आणि तुरे व कोवळी पाने आणली आहेत.’ मंगा म्हणाला.
‘कोणता खेळ खेळायचा?’ तिने विचारले.
‘थांब. आधी तुला सजवू दे. तुझ्या केसांत, कानांत ही फुले, हे तुरे, ही पाने घालू दे. तू राणी दिसशील.’ मंगा म्हणाला.
‘कोणाची राणी?’ तिने हसून विचारले.
‘ते मग सांगेन. तो म्हणाला.
त्याने तिला सजवले, नटविले. मधुरी गोड दिसू लागली. मंगाने टाळी वाजविली. बुधा सारे पहात होता.