‘थांब, कुस्करुन टाकतो ते फूल.’ असे म्हणून मधुरीच्या बापाने ते फूल कुस्करले. पाकळया खाली पडल्या. मधुरी त्या पाकळया वेचू लागली.
‘कशाला वेचतेस?’
‘त्या पाकळयांवर कोणाचा पाय पडू नये म्हणून. बाबा, फुलांवर पाय पडू नये. बुधा, तू जा.’
‘कुस्करलेले प्रेम तू गोळा कर. असे म्हणून बुधा गेला. मधुरी घरी आली. तिच्या हातात त्या गुलाबाच्या पाकळया होत्या. ती त्या पाकळया डोळयांवरुन फिरवी. एकेक पाकळी ती हातात घेई. तोंडावर फिरवी व खाऊन टाकी. ती का बुधाला पोटात ठेवीत होती? तिच्या जीवनवृक्षावर मंगा व बुधा दोघांनी का घरटी बांधली होती?
पाठोपाठ बापही घरी आला.
‘मधुरी तुझे लग्न येत्या महिन्यात मी करुन टाकणार.’
‘नको बाबा.’
‘ते मी तुला विचारले नाही. तू तयार आहेस ना?’
‘नाही.’
‘त्या दिवशी सांगितले होते की विचार करुन ठेव.’
‘केला विचार.’
‘हे का विचाराचे उत्तर?’
‘हो.’
‘मधुरी, तू माझी झोपडी सोडून जा. तुला एक महिन्याची मुदत देतो.’
मधुरीने घर सोडून जाण्याचा निश्चय केला. ती बंधने तोडणार होती. ती मोलमजुरी करीतच असे. ती काही कोणावर फार अवलंबून नव्हती. जो आपल्या उपजीविकेसाठी, जीवनाच्या गरजांसाठी दुस-यावर अवलंबून असतो त्याला स्वातंत्र्य नाही. त्याचा स्वाभिमान नष्ट होतो. त्याची मान खाली असते. त्याला विचार-स्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य, आचार-स्वातंत्र्य कसलेच स्वातंत्र्य नसते. मधुरी स्वतंत्र होती. ती थोडीच मिंधी होती!
‘मधुरी, ते सांगतील त्याच्याशी का नाही लग्न करीत?’ एके दिवशी आई म्हणाली.