‘होय हो, मी दुष्टच आहे. माझीच पोरे खाणारी मी लावी आहे. मंगा, असे सोन्याला डाग देताना माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल? एका गोष्टीवरून का माझी परीक्षा करणार? अरे, ज्याला मी नऊ महिने पोटात वाढविले, तो माझाच आहे. मी सोन्याचा नाही भाजला. नाही, हो पुन्हा अशी मी वेडी होणार. मंगा येतो हो माणसाला कधी राग, संताप. नको मला बोलू. कर्जही नको काढीत जाऊ.’

‘ही गरीबी दूर केलीच पाहिजे. हे दारिद्र्य माणसाला दुर्गुणी बनविते. दुष्ट करिते. गरिबीमुळेच सोन्या शेजारी तोंड वेंगाडता झाला, गरिबीमुळेच तू सोन्याला भाजलेस. गरिबी! या जगात सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे ही गरीबी. गरिबीने माणसाचे पशूत रूपांतर होते. गरिबी स्वाभिमानाला मारते. आशाआकांक्षा धुळीस मिळविते. गरिबाला कोणीही बोलावे, कोणीही मारावे, कोणीही त्याचा पाणउतारा करावा. छे! गरिबीच्या गारठयात मी माझी मधुरी अत:पर ठेवता कामा नये. माझ्या मुलांची जीवने गरिबीत नीट वाढणारी नाहीत. मधुरी, वीट आला मला या गरिबीचा. किती तरी वर्षे मी मनात म्हणत आहे की आपण श्रीमंत व्हावे. मधुरीला जणू राजाची राणी करावे; परंतु मी माझ्या मनाला आजपर्यंत लगाम घातला. आता नाही घालणार. मी जाणार कुठेतरी. मधुरी, मला जाऊ दे, देशदेशांतरी, करीन व्यापार, करीत देवघेव. श्रीमंत होईन, तेव्हाच परत येईन.’

‘मंगा नको रे असे म्हणू. माझ्यापासून नको रे कोठे जाऊ. तू म्हणजे माझ्या प्राणांचा प्राण. तू माझ्या डोळयांतील बुबुळ, माझ्या कुडीतील श्वास, तुझ्यामुळे मी जगते. तू कोठे गेलास तर या मुलांना कोण? मला तरी मोलमजुरी करता येईल का? मुले सारी घरी सोडून कोण? मला तरी मोलमजुरी करता येईल का? मुले सारी घरी सोडून कशी कोठे जाऊ? आज मुले जगत आहेत. उद्या तू गेलास म्हणजे आम्हांस जगणेही कठीण होईल. सोने घेऊन घरी येशील, परंतु सोन्या हवा ना, रुपल्या तर हवा ना, मनी तर हवी ना ते सोने अंगावर घालायला? नको, नको मंगा! नको हो जाऊ. आपण येथेच राहू. चांगले चालले आहे. एखादे वेळेस उठते वादळ. चालायचेच मंगा. आकाश का नेहमी निरभ्र असते? झाडे का नेहमी शांत असतात? नदीला कोठेच का वेग, खळखळाट नसतो? मंगा, हा संसार आहे. मधुन कडू, मधून गोड. कोणाचा असा संसार आहे की येथे सदैव सुखाची पुनव फुलेली आहे? सदा आनंदाची दिवाळी आहे? श्रीमंत कुटुंबांतूनही का कुरबुरी नसतात, भांडणे नसतात? श्रीमंत आईबाप का मुलांवर रागावत असतील? मन सर्वत्र एकत्र आहे. मंगा, श्रीमंतांची श्रीमंती भांडणे असतात, गरिबांची गरीब. परंतु भांडणे, बोलाचाली, चालयचेच हो. मंगा, माझे वेडीचे ऐक, माझ्या मनाचा सूर ऐक. कोठे जाण्याचे मनात आणू नकोस. बघ. तिन्ही बाळे कशी सुरेख झोपली आहेत. चांगली आहेत आपली मुले. रडकी नाहीत. हसतात, खेळतात. त्यांना पाहून मला धन्यता वाटते. मंगा, माझ्या मांडीवर ही तील मुले दिलीस. मी श्रीमंत आहे. ही मुले म्हणजे माझी संपत्ती. हसती, नाचती, खेळती, बोलती संपत्ती. गोड जिवंत संपत्ती. मला काही नको आणखी. मंगा, नाही ना जाणार कोठे? सांग, नाही तर मला झोप येणार नाही. खाणेपिणे गोड वाटणार नाही. मधुरीला रडवावे असे तर नाही ना ठरविलेस? मधुरी नेहमी. दु:खीकष्टी असावी असे तर नाही ना ठरविलेस?’

‘मधुरी, काय वेडेवाकडे विचारतेस? तुला सुखाच्या स्वर्गात खेळवावे, सुखाच्या सागरात डुंबवावे म्हणून तर माझी सारी धडपड. कोठे त्रिखंडात गेला तरी तुला रडविण्यासाठी म्हणून नव्हे, तर तुला कायमचे हसविता यावे म्हणून.’

‘हल्ली का मी हसत नाही? उलट तू गेलास कुठे तर मात्र माझे हसे मरून जाईल. माझा आनंद कायमचा मावळेल. माझ्या ओठांची हसण्याची सवय जाईल आणि तू पुन्हा संपत्ती घेऊन घरी येशील तेव्हा कदाचित मला हसू येणार नाही. माझा मंगा तोंड फुलणार नाही. मधुरी जडजरठ होईल. मंगा, नको, नको. माझा मंगा मला सोडून जाणार नाही; नाही हो जाणार. खरे ना? असे म्हणून तिने त्याच्या खांद्यावर मान ठेविली. कितीतरी दिवसांत अशी मान तिने ठेविली नव्हती. मंगाने तिचे डोके खांद्यावरून मांडीवर घेतले व तो तिला थोपटू लागला. कोणी आता बोलत नव्हते.’

‘मंगा, मांडीवर मान आहे. कापू नको.’
‘नाही हो मधुरी; नीज. गोड झोप घे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel