‘बुधा!’
‘काय मधुरी?’
‘भेटेल का रे मंगा पुन्हा?’
‘हो भेटेल.’
‘कोठे भेटेल?’
‘आपल्या आठवणीत. तुजजवळ त्याच्या शेकडो प्रेमळ स्मृती आहेत. त्यांत त्याची भेट घे. ती टेकडी, तो तेथे मंगा आहे. या मंलांत मंगा आहे. मंगा अंतर्बाह्य भरलेला आहे. मधुरी, रडू नको.’
‘बुधा, मंगा मला सुखी करण्यासाठी गेला. मधुरीला मोत्यांनी नटवावे म्हणून गेला आणि समुद्राने माझे मोलाचे मोती गिळाले. कोण आणील ते मोती पुन्हा?’
‘मधुरी, काळाने गिळलेले मोती परत का मिळते? तू शांत हो. धीर धर. या मुलांना वाढव. मी आह. तुला मदत करीन. मला परका नको मानू. मीही तुझाच आहे. तू दूर आहेस तरी तेवढया ओलाव्याने मी जगतो. मधुरी जगात आहे तोपर्यंत मी मरता कामा नये. बुधा, खात जा. नीट जग. असे तूच ना मला सांगितलंस! मधुरी, तुझी आज्ञा मी मानिली. माझे दोन शब्द तू ऐक.’
‘बुधा, मरण मला थोडेच येणार आहे? मरायचे धैर्य तरी मला कोठे आहे? मधुरी जगेल. काळजी नको करू.’
‘मी जाऊ?’
‘जा. उशीर झाला.’
‘तुझ्याकडे मधून मधून आलो तर चालेल?’
‘ये हो बुधा.’
‘जातो मी. असे म्हणून बुधा गेला आणि मधुरी बाहेर झोपाळयावर बसली. तिचे मन हेलावत होते. मंगाच्या आठवणीत रमले होते. किती वेळ तरी ती बाहेर बसली. इतक्यात मनी जागी झाली. आई तिने हाक मारली. मधुरी एकदम घरात गेली. आहे हो मधुरी त्यांच्याकडे पहात होती. सोन्यासारखी मुले; परंतु आता कोण त्यांची काळजी घेईल? सोन्याला मजुरी करायला जावे लागेल. कोठले शिक्षण नि काय? आणि रुपल्याबद्दल मंगाच्या केवढाल्या उडया. परंतु सारे स्वप्न ठरले. तिने मुलांचे मुके घेतले. सर्वांना थोडेथोडे थोपटले आणि मनीला पोटाशी धरून ती झोपी गेली.'