मंगाने काही दिवसांनी रात्री कामाला जाण्याचे बंद केले. मधुरीला बरे वाटले. किती दिवसांत ती इतकी गोड हसली नव्हती.
‘आज किती आनंदी आहेस तू?’ मंगा म्हणाला.

‘आज तू हट्ट नसता केला तर इतके गोड हसणे अनुभवायला मिळाले नसते.’
‘शेवटी असे हसणे अनेक दिवसांच्या अश्रूंतूनच जन्मत असते.’
‘मधुरी, मी एक गोष्ट ठरविली आहे.’
‘कोणती?’
‘तुला इवलेही दु:ख द्यायचे नाही. तुझ्या इच्छेविरुध्द कधी जायचे नाही. सांगशील ते ऐकावयाचे.

‘माझा का गुलाम होणार आहेस?’
‘हो.’

‘मला नाही ते आवडणार. मंगा, तू आहेस असाच राहा, त्यातच मला आनंद आहे. कधी कधी तू मला रडवतोस; परंतु ते रडणेही मला गोड वाटते. तू त्याची मला सवय लावली आहेस. माझा अश्रूंचा रतीब बंद नको करु.’

सोन्या दोन-अडीच वर्षांचा झाला. पुन्हा मधुरीला दिवस गेले. परंतु या वेळेस ती आजीबाईकडे गेली नाही. घरीच सारे झाले. संसार वाढू लागला. मुले होतात त्यांचा आनंद होतो; परंतु पोसायला तोंडे वाढतात. प्राप्ती थोडीच वाढत असते? मधुरी घरी लोकांचे दळण आणी. मुलांना खेळवीत दळण दळी. संसारात रुकाभर भर घाली.

आणि एकदा सोन्या पडला आजारी. त्याला अतिसार झाला. त्यातच अमांशही. पाच पाच मिनिटांनी त्याला परसाकडे व्हायचे. मधुरीने सूप करुन ठेवले होते. सुपात राख टाकायची. बाळाला बसवावयाचे त्यात. मधुरी रडकुंडीस आली. सोन्याचा नूर गेला. तो नुसता अस्थिपंजर राहिला. ‘मुलाचे हाल आईला पाहवत ना!’

‘मधुरी, तू नीज. मी बसून राहतो.’
‘तू त्याला मारशील परवासारखे.’
‘मी का दुष्ट आहे? तुलाच जशी पोरांची काळजी. माझीही ती पोरे आहेत.
‘पण माझ्या पोटचे ते गोळे आहेत.’

‘बरे हो. मी निजतो. तू जप तुझ्या पिलांना.’
‘मंगा रागावू नको. मी निजू? परंतु सोन्याला त्राण नाही हो.’

त्याला नाही नीट बसता येत. चिरचि-या झाला आहे. त्याच्यावर रागावू नको हो. तू नेहमी रागावतोस असे नाही. आपणही माणसे कंटाळतो जरा. तू त्या दिवशी येथे नव्हतास. मीसुध्दा मारली एक चापट त्याला. आणि मग त्याला घट्ट पोटाशी धरिले. मंगा, तू तशीच मी हो. मी निजू?’
‘हं, नीज.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel