‘मधुरी, लहानपणाचे पूर्णत्व मोठेपणी अपूर्ण होते आणि अपूर्णातच मौज आहे. ओकेसतो जेवण्यात अर्थ नाही. थोडी ती गोडी.’
‘तू काही म्हण, माझ असे आहे खरे. चल बुधा, आपण उडी टाकू. अथांग सागरात बुडी. वर चंद्र फुलला आहे. मनात प्रेम फुलले आहे अशा वेळेसच चल बुडी घेऊ. पुन्हा अंधार नको यायला अमावास्येचा. आजचा दिवस आपण अमर करू, ये घेतोस?’

‘मधुर, नको असे बोलू. नीज, मी बासरी वाजवितो.’
‘वाजव. पोटातील बाळालाही ऐकू दे बासरी. म्हणजे त्याच्या जीवनात आनंद राहील.’
‘मधुरी, बाळाचे नाव ठेवायचे?’

‘मुलगा झाला तर मोती व मुलगी झाली तर वेणू. ही नावे मंगाने जाताना सांगितली होती. परंतु ते बाळ वाचले नाही. या बाळाला त्यातील नाव ठेवू. मंगाने दिलेले नाव.’ ती म्हणाली.
थोडा वेळ कोणी काही बोलले नाही. बुधा व मधुरी आनंदात मग्न होती.

‘बुधा, आता परतू.’
‘थांब ना.’

‘घरी मनी उठेल. आणि मला हा गार वारा बाधेल.’
‘ही घे शाल पांघरायला.’
‘तू पण ये. एका शालीत दोघे गुरफटवून घेऊ.’
‘मला नको. तूच घे अंगावर मधुरी.'

‘वेडा आहेस तू. नुसत्या शालीने थंडी नाही थांबणार. तुझ्या प्रेमाची ऊबही हवी. तीही दे. ये माझ्याजवळ. गारगार वाटत आहे.’
ती दोघे एकच शाल पांघरून बसली. नाव तीराला आली. दोघे उतरली. दोघे हळूहळू घरी आली. मुले शांत झोपली होती. मनी उठली नव्हती. मधुरी व बुधाही झोपी गेला.

मधुरी बाळंत झाली आणि मुलगी झाली. नक्षत्रासारखी मुलगी. तिचे नाव वेणू ठेवण्यात आले. रंगीत पाळणा नवीन घडविण्यात आला. त्यावर मोत्यांचे राघू, पाचूची पाखरे लावण्यात आली. पाळण्याला रेशमाची दोरी. सारा थाट अपूर्व होता.

‘सोन्या, रुपल्या, मनी सारी गरिबीत वाढली.’ ती म्हणाली.
‘मला वाटे तू मजजवळ मदत मागावीस; परंतु तू मागत नसस. तुला गरिबी बाधू नये असे मला वाटे; परंतु काय करणार मी?’

‘परंतु देवाने सारे चांगले केले. मुलांना कधी थंडी वारा बाधला नाही, आणि ही वेणू भाग्याची आहे.’
‘वेणू बासरी ऐकत वाढली - नाव योग्या आहे.’ तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel