झोपडीतील संसार
मंगा व मधुरी झोपडीतून राहू लागली. सुखाचा संसार. प्रेमाचा नवीन संसार. ती त्यांची स्वत:ची झोपडी होती, झोपडीभोवती थोडी जागा होती. मधुरीला स्वच्छतेचा नाद. मंगाला फुलाफळांचा नाद. त्या झोपडीभोवती त्यांनी फुलझाडे लाविली. सुंदर फुलझाडे. कोणी तेथे येताचा ती फुले सर्वांचे स्वागत करीत. मंगा रोज कामाला जाई. मधुरी घरीच असे. एखादे वेळेस तीही दळणकांडण करायला जाई. कोणाकडे तिखट, मीठ कुटायला दळायला जाई. पैपैसा मिळवी.
‘मधुरी, तू कशाला जातेस कामाला?’ एके दिवशी मंगा म्हणाला.
‘तू कामाला जातोस. मी वाटतं घरी बसू?’ तिने विचारले.
‘तू घरी काम करतेस तेवढे पुरे. स्वयंपाक करतेस, भांडी घासतेस, झाडतेस, सारवतेस, चिरगुटे, पांघरुण धुतेस, फुलझाडांना पाणी घालतेस. थोडे का घरी काम असते? तू नको करु आणखी कोठे काम.
‘मधून मधून मी जाते. रोज उठून थोडीच जात्ये मी?’
‘तुला आता जाववतही नसेल. तू जपून वाग. बाळंतपण नीट होऊ दे. माझा जीव घाबरतो.
‘वेडा आहेस तू. सारे नीट होईल. मंगा, तू दिवसभर थकतोस. किती रे तुला काम? रोज मेली ती ओझी उचलायची.’
‘परंतु तुझी आठवण होते व सारे श्रम मी विसरतो. घरी मधुरी वाट पहात असेल, गेल्याबरोबर हसेल, गोड बोलेल, असे मनात येऊन सारे श्रम मी विसरतो. मधुरी, खरेच तू माझे अमृत, तू माझे जीवन.’
‘मंगा, ही फुले बघ.’
‘ती कशी आहेत ते सांगू?’
‘कशी?’
‘तुझ्या डोळयांसारखी. फुलांतील हे परागांचे पुंज कसे बुबुळासारखे दिसतात, नाही? जणू ही फुलें प्रेमाने जगाकडे बघत असतात.’
‘परंतु जगाला त्याची जाणीव असते का मंगा? एखाद्याचे प्रेमाचे घडे भरुन ठेवावे, परंतु ते रिते करायला कोणी नसावे! काय वाटेल बरे त्या माणसाला? ही फुले असेच म्हणतील का?’
‘फुलांना कोणी प्रेम देवो न देवो, ती जगाला आनंद देत असतात. ती जगासमोर आपली जीवने घेऊन उभी असतात. मधुरी, तुझ्या प्रेमाचे घडे मी नाही का पीत?’
‘परंतु असे मी कुठे म्हटले? पितोस हो मंगा. तुझ्यासाठी माझे प्रेम मी भरुन ठेविले आहे. पी, पोटभर येता जाता पी. ते संपणार नाही.’
‘मुधरी!’
‘काय?’