‘नाही.’
‘करणार का?’
‘हो.’
‘तुमच्या घरी कोण आहेत?’
‘वडील आहेत, आई आहे. भावंडे आहेत.’
‘या म्हाता-या आजीबाईंचा व तुमचा काय परिचय?’
‘आम्हाला या लहानपणी खाऊ देत. आम्ही खेळायला येत असू. आमची भांडणे ही मिटवी. कधी थालीपीठ खायला देई. कधी आणखी काही.’
‘अजूनही खाऊ घ्यायला येता वाटते?’
‘हो. आम्ही आजीला लहानच आहोत. कधी वाईट वाटले तर मी येथेच येतो. पुन्हा आनंदी होऊन जातो.’
‘आज का खिन्न होऊन आले होतेत?’
‘हो.’
‘तरुणांना दु:ख नसावे, चिंता नसावी.’
‘तरुणांनाच असावीत. कारण दु:ख-चिंतांच्या ओझ्याखाली म्हातारे व अशक्त चिरडले जाणार नाहीत.’
इतक्यात आजीबाईने तेथे केळी आणून ठेवली. परंतु मंगा खाईना.
‘मंगा, खा ना रे.’ आजी म्हणाली.
‘पाहुण्यांच्या देखत लाजतोस वाटते?’
‘का हो, खरे की काय?’ व्यापारी म्हणाला.
‘तुम्ही घ्या म्हणजे तो घेईल.’ आजी म्हणाली.
पाहुण्यांनी केळे हाती घेतले. त्यांनी मंगाच्याही पुढे केले. मंगाला नाही म्हणवेना. तो खाऊ लागला.
‘आजीला नाही म्हणालास, परंतु त्यांच्या हातचे घेतलेस. आजी नेहमीचीच. आपण जगाजवळ नीट वागू, परंतु सारी ऐट जवळच्या माणसाजवळ. खरे की नाही?’ आजीने विचारले.
‘खरे आहे आजीबाई तुमचे म्हणणे. व्यापारी म्हणाला.
मंगा निघून गेला. व्यापा-याला मंगा आवडला. आपली मुलगी मंगाला द्यावी असे त्याच्या मनात आले. याला घरजावई करावे असे त्याला वाटले. तो म्हातारीजवळ बोलू लागला. आजीबाई सारे एकून घेत होती. शेवटी ती म्हणाली,
‘तो तयार होईल असे वाटत नाही.’
‘परंतु का?’
‘ते मला नाही सांगता येत.’
‘मी त्याच्या वडिलांकडे जातो व गळ घालतो’
‘पहा जाऊन, परंतु पितापुत्रांत त्यामुळे वितुष्ट न येवो म्हणजे झाले.’