मुले असे बोलत होती आणि फकीर, मो मंगा कोठे गेला? तो त्या टेकडीकडे गेला. टेकडीवर त्याला बुधा व मधुरी दिसली. तोही गेला. बाजूस पाठमोरा बसला. त्यांचे बोलणे त्याच्या कानावर येत होते. तो ऐकत होता.
‘बुधा, वाटते की या टेकडीवर बसावे. येथे मला बरे वाटते. येथे मंगा आहे असे वाटते. तो एकदम येऊन माझे डोळे धरील, माझे हात धरील असे वाटते. माझे डोके मांडीवर घेऊन गाणे म्हणेल असे वाटते. समुद्रातून एकदम नाचत येईल व मला हृदयापाशी धरील असे वाटते. या टेकडीवरील कणन् कण मला काही तरी सांगत असतो.’
‘मधुरी, अशा आठवणी येणारच. त्या तुझ्या पवित्र व कोमल आठवणी जाव्यात अशी मी कधीही इच्छा करणार नाही. म्हणून तर मी तुला घेऊन येथे येतो. इतक्या आठवणी तुझ्या हृदयात उसळत असूनही तू मला जवळ केलेस, माझ्या जीवनातही प्रकाश आणलास, सुगंध आणलास, तू थोर मनाची आहेस.’
‘मी थोर की घोर? मी चांगली की वाईट? देव मला जवळ घेईल की दूर लोटील?’
‘देवाला हृदय असेल तर तो जवळ येईल. मधुरी, तुझा विचार करता माझी मती गुंग होऊन जाते. त्या दिवशी रात्री तू झोपली होतीस. मी जागा होतो. तुझ्याविषयी मी विचार करीत होतो. मी एकदम हळूच उठलो व तुझ्या पायांवर डोके ठेविले. तू मला त्यासमयी देवता वाटलीस.’
‘बुधा, तूही थोर आहेस. किती वर्षे एकटा राहिलास! आमच्या सुखाचा हेवादावा केला नाहीस, काही नाही. नाहीतर प्रेमभग्न लोक क्रूर होतात हो. ते खूनही करतील.’
‘मोती बघ ऐकतो आहे गोष्टी.’
‘त्याला समजत असेल हो. लहान मुलांना सारे समजते.’
‘चल आता जाऊ. उन्ह झाले. तुला बाधेल.’
ती दोघे उठली व निघाली गेली. फकिराने, त्या मंगाने वळून पाहिले. परंतु त्याच्या अश्रुपूर्ण दृष्टीला काही दिसत नव्हते.
दिवस असाच गेला आणि रात्र आली. रात्री मंगा असाच कोठे जायला निघाला. मधुरीच्या घराजवळ आला. वरती संगीत चालले होते. सोन्या गात होता. गोड गोड गाणे म्हणत होता आणि बुधा बासरी वाजवीत होता. फकिराची, आमच्या या मंगाची, ते गाणे ऐकता ऐकता समाधी लागली. तो तेथे स्तब्ध उभा राहिला.
गाणे थांबले. बासरी थांबली. मंगा वर पहात होता. त्या संगीताचा, त्या आनंदाचा का त्याला मत्सर वाटला? तो मुकाटयाने तेथून माघारा वळला. तो बंदरावरच्य झोपडीत आला.
‘किती वेळ झाला?’ म्हातारी म्हणाली.
‘डोके सुन्न झाले आहे.’ तो म्हणाला.
‘तुम्ही शांत पडून राहत नाही. तुम्हांला काढा कारून ठेवला आहे. तो कढत कढत घ्या. घाम येईल.’
‘तुम्ही जणू आईप्रमाणे बोलत आहात.’