१  देवाने दिलेले डोळे

मित्रांनो ! लहानपणापासून माझ्या या डोळयांवर अनेक वेळा संकटे आली आहेत. पुन: पुन: त्यांतून हे डोळे सुखरुपपणे पार पडले आहेत. हे डोळे नाहीसे होण्यापूर्वी माझे हे डोळे मिटावे, असे कधी कधी मी म्हणत असे.

मी मराठी शाळेत होतो. लहान होतो तेव्हा अगदी. एके दिवशी बाहेर एकीला गेलो होतो. इतरही मुले आली होती. एका मुलाने गोफणीचा दगड भिर्र करुन उडविला. परंतु तो कोठे गेला ? ती लघ्वीला बसलो होतो. तो दगड माझ्या डोळयाला येऊन लागला. मी घेरी येऊन पडलो. इतर मुले धावत आली.

मला उचलून शाळेत नेण्यात आले. डोक्यावर पाणी मारण्यात आले. मी सावध झालो. माझ्या डोळयाच्या खालच्या बाजूला दगड लागला होता. एक केसांचे अंतर ! डोळाच फुटायचा; परंतु वाचला. ईश्वराच्या कृपेने वाचला. जखमेतून रक्ताची धार वहात होती. शाळेत वस्तुपाठासाठी दगडी कोळसा होता. त्याची बारीक भुकटी करुन जखमेत भरण्यात आली. रक्त थांबले. माझा डोळा सुजून गेला होता. सारखे पाणी गळत होते.

मी घरी आलो. वडिलांनी माझ्या डोळयाची स्थिती पाहिली. ते शाळेतील शिक्षकावर रागावले. परंतु माझा डोळा वाचविला गेला याबद्दल कोणीच काही बोलेना. आपले लक्ष मंगलाकडे कमी असते, अमंगलाकडे जास्त असते. देवाचे आभार मानायचे सोडून माझे वडील मुलांवर रागावले. ते दुपारी शाळेत गेले. गोफण मारणा-या मुलास त्यांनी शिक्षा करविली. त्या मुलाने माझ्या डोळयावर मुद्दाम थोडाच दगड फेकला होता ? तो आपली बालक्रीडा करीत होता. परंतु त्याला छडया बसल्या ! गरीब बिचारा मुलगा !

पुढे काही दिवसांनी आमच्या गावात डोळयांची साथ आली होती. माझेही डोळे त्या साथीत सापडले. माझे डोळे आले व त्यांचे गोळे झाले. घरगुती उपचार सुरु झाले. हळदीने रंगविलेले फडके डोळे पुसावयासाठी माझ्याजवळ असे. कांद्याचा रस, तुरटीची लाही वगैरे औषधे डोळयांत घालण्यात येत. रक्तचंदनाच्या घडया, गाईच्या दुधाच्या घडया, गुलाबपाण्याच्या घडया, डोळयांवर वेळोवेळी ठेवण्यात येत. पायांना दूध चोळण्यात येईल. पोटात थंडावा यावा म्हणून भाजलेला कांदा व साखर देण्यात येईल. सारे उपाय चालू होते. परंतु डोळे बरे होत ना.

मी रडरड रडायचा. सा-या जगभर मी हिंडावयाचा; परंतु घरात डांबला गेलो. ते उन्हाळयाचे दिवस होते. आंब्यांना पाड लागला होता. आंब्यांच्या झाडाखाली हिंडावयासाठी माझे पाय तडफडत होते. परंतु मी आंधळा झालो होतो. झाडांवर चढण्यासाठी, नदीत डुंबण्यासाठी मी अधीर झालो होतो. परंतु कोणाचाही हात धरल्याशिवाय मला पाऊल टाकता येत नसे. मी परस्वाधीन झालो.

'आई ! केव्हा ग डोळे बरे होतील ? केव्हा मी बाहेर जाईन ?' असे मी आईला तिचा पदर धरुन विचारीत असे.

'भोग सरला म्हणजे होतील बरे.' असे ती म्हणे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel