माझी खरुज बरी झाली. त्या वेळेपासून पुन्हा मला कधी खरुज झाली नाही. शरीराची स्वच्छता ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. शरीर स्वच्छ राखणे, हे वैयक्तिक कर्तव्य आहे व सामाजिकही कर्तव्य आहे. आपले शरीर गलिच्छ ठेवणे हा आपल्या आत्म्याचा अपमान आहे. त्याचप्रमाणे आपण गलिच्छ राहिलो तर आपण रोगी होऊ. आपण रोगी झालो तर समाजाचेही आरोग्य बिघडवू. वर्गात एखाद्या मुलालाच खरुज झाली तर त्याच्या वर्गातील इतर मुलांनाही ती होते. तुरुंगात खरुज झालेल्या कैद्यांना सर्वांपासून अलग ठेवितात. खरजेचा रोग फार स्पर्शप्रसर आहे.
शरीर हे परमेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर स्वच्छ व सुंदर राखणे म्हणजे देवाचीच पूजा आहे. देवाने दिलेले नीट सांभाळणे यातच खरा धर्म आहे. देवाने जी सेवेची साधने आपणास दिली आहेत ती नीट, स्वच्छ, सतेज व समर्थ राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देवाने आपल्या हाताची मागणी केली, त्यावेळेस हे किडलेले हात जर त्याला आपण नेऊन दिले तर त्या हातांनी तो काही करु इच्छील का ? आपल्या हातांचा देवाने उपयोग करावा, असे आपणास वाटत असेल तर हात पवित्र व स्वच्छ राखणे नाही का आपले कर्तव्य ठरत ?
माझी खरुज बरी झाली तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू ! किती तरी दिवस हातांवर खरजेच्या खुणा होत्या, फोडांचे डाग होते. पुन्हा माझे हात मी कलंकित होऊ देणार नाही, असा मी मनाचा निश्चय केला व निदान खरजेच्या बाबतीत तो खरा ठरला आहे.