१६. उजाडल्यावर

उठावयास मला उशीर झाला होता. मला त्याची लाज वाटली. पहाटे उठून मी भूपाळया म्हणत बसलो असतो तर पुजारी बोवाला मी आवडलो असतो, असे मनात आले. बाहेर उन्हे पडली होती. मी ती घोंगडी तेथे घडी करुन ठेविली. घरातील कोणीही माझ्याजवळ बोलण्यास येईना. आदल्या दिवशी पोटात काही नव्हते त्यामुळे शौचास लागली नव्हती. परंतु तोंड स्वच्छ धुण्याची इच्छा होती. नळ मागच्या बाजूस होता. त्यांच्या घरातून मी कसा जाणार ?

खिन्नपणे मी तेथे फे-या घालीत होतो. ते पुजारी शेवटी बाहेर आले. ते म्हणाले, 'चल तुझ्या मामांकडे जाऊ.'

मी :- तुम्हीच जा व त्यांना सारे सांगा. माझे सामानही घेऊन या.

पुजारी :- मी त्यांना सारे सांगेन. परंतु तुझे घर तर मला दाखव.

मी
:- मी तेथे आलो तर मला ते सोडणार नाहीत. 'तुमच्या भाच्याला मी माझ्याकडे ठेवणार आहे. तो माधुकरी मागणार आहे. त्याचे सामान द्या,' असे त्यांना समजावून सांगा. मला नका नेऊ बरोबर.

पुजारी
:- हे बघ, तू वाडयात शिरु नकोस; रस्त्यात उभा रहा. 'हया वाडयात मामा राहातात' असे मला दुरुन दाखवून तू बाहेरच उभा रहा. मी आत जाऊन सांगून-सवरुन सामान त्यांनी दिले तर घेऊन येईन, समजलास ना ? चल नीघ.

मी माझे तोंडही धुतलेले नव्हते. माझे मुख म्लान झाले होते. पुन्हा डोळे आसवांनी भरले. हे पुजारी मला फसविणार, असे स्पष्ट दिसू लागले. मी हळूहळू चाललो होतो. एकेक पाऊल दु:खाच्या, अपमानाच्या दरीकडे मला घेऊन जात होते. पुजारी म्हणाले, 'जरा भरभर चल. मला दुसरी कामे आहेत.' पत्र्यामारुती आला. मोदीचा गणपती दिसू लागला. पुजारी म्हणाला, 'कोणते घर ? किती घर नंबर ?' माझ्या तोंडून शब्द बाहेर उमटेना. मी कदाचित पळून जाईन, या भीतीने त्या पुजा-याने माझा हात बळकट पकडला. खाटीक बक-याला पकडीत असतील तसे झाले. मी काही बोलत नाही, असे पाहून तो पुजारी रागाने म्हणाला, 'दाखव घर; नाहीतर येथे जवळच पोलिस चौकी आहे तेथे तुला घेऊन जाईन.' पोलिसांच्या नावाचा उल्लेख होताच डोळयांसमोर भीषण चित्र उभे राहिले. पोलिसांच्या ताब्यात जाण्यापेक्षा मामांच्या ताब्यात जाणे काय वाईट ?

शेवटी भीतभीत मी आमच्या वाडयाजवळ आलो. दारातच काही मुले होती. 'श्याम श्याम ! श्यामला धरुन आणले आहे एकाने.' अशी वाडयात सर्वत्र विजेप्रमाणे वार्ता गेली. मला पहायला आमचा सारा वाडा जमला. पुजा-याने माझा हात घट्ट धरुन ठेवला होता. आले. ते पहा माझे मामा आले. ते पहा त्यांचे डोळे कसे क्रोधसंतापाने लाल झाले आहेत. त्यांचे ओठ थरथरत आहेत. हात माझ्यावर घसरायला सरसावत आहेत.

पुजारी :- हा तुमचा भाचा ना ?

मामा :- हो.

पुजारी :- ह्याला ताब्यात घ्या. काल रात्री तुळशीबागेच्या मंदिरात होता. मी माझ्या घरी आणून गोडधोड बोलून सांभाळला. आता तुम्ही सांभाळा. मी जातो.

मामा :- तुमचे बरेच उपकार आहेत. आम्ही कालपासून मोठया फिकिरीत होतो. काही सुचत नव्हते. खरोखरच तुमचे फार उपकार आहेत.

पुजारी
:- उपकार कसचे म्हणा. केले पाहिजे एकमेकांसाठी. बरे बसा. येतो.

मामा दरवाज्यापर्यंत पुजारीबोवास पोचवावयास गेले. मी आमच्या खोलीबाहेर अंगणात वेलीप्रमाणे थरथरत उभा होतो. मामा धावतच आले. त्यांनी माझा हात धरला व दोन चार थोबाडीत दिल्या. जवळच एक लाकूड पडले होते. त्यांनी ते उचलले. मला त्या लाकडाने मारले. 'हो चालता येथून ! आगलाव्या कुठला ! तू कोण सैतान आहे की आहेस तरी कोण ? बेशरम कार्टा ! नीघ !' असे म्हणून दिंडीदरवाजापर्यंत मला मारीत मारीत ते घेऊन गेले. जा चालता हो. तुझे तोंड नको पहावयास,' असे ते म्हणाले. मी खरोखरच वाडयाच्या बाहेर जाऊ लागलो. मी बाहेर जात आहे, असे पाहताच मामांचा संताप अनावर झाला. 'चाललास कुठे ?' हो आत. निर्लज्जा ! नीघ म्हटलं तर निघाला ! तुला काही लाज आहे की नाही नंदीबैला ?' असे म्हणून पुन्हा माझी बकोटी धरुन व मुस्कटात मारीत मारीत स्वत:च्या खोलीशी ते मला घेऊन आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्याम


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
अजरामर कथा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
शिवाजी सावंत
गावांतल्या गजाली