समुद्राच्या तळाशी मोत्यांच्या राशी आहेत. समुद्राला रत्नाकर म्हणतात. त्या रत्नाकरालाही माझ्या त्या हातरुमालाचा हेवा वाटला. हिंदुस्थानात सारे काही आहे, तेथे सौंदर्य आहे. सुपीकपणा आहे. अजूनही अपंरपार पीक भारतभूमी देत आहे. अजूनही नद्या भारतभूमीस समृध्द करीत आहेत. येथे गहू, ज्वारी, बाजरी, भात सारे पिकते. येथे संत्री, मोसंबी, केळी, द्राक्षे सारे होते. येथे सोन्याच्या खाणी आहेत. हिरेही सापडतात. भारतात सारे आहे; परंतु येथे एक वस्तू दुर्मिळ आहे. येथे प्रेम पिकत नाही. बंधुभाव पिकत नाही. देशभक्ती पिकत नाही. ही पिके दुर्मिळ झाली आहेत. आणि त्यातल्यात्यात हिंदुमुसलमानांचे प्रेम म्हणजे तर वार्ताच काढू नका. हिंदुमुसलमानांच्या प्रेमाची कल्पनाही येथे सहन होत नाही. इतकी ही दुष्प्राप्य वस्तू आहे.
या ऐक्यासाठी, या प्रेमासाठी तो अपार सागर सारखा ओरडत आहे, 'द्या रे, हिंदुमुसलमानांच्या प्रेमाचा एक बिंदू मला द्या रे !' असे तो समुद्र शत लाटांनी ओरडत आहे. किना-यावर आपटून आपटून सांगत आहे ! सागराला त्याची भूक आहे, त्याची तहान आहे. त्या अनंत सागराला म्हणूनच माझ्या हातातील ती टीचभर चिंधी अपार मोलाची वाटली. ती चिंधी त्रिभुवन लक्ष्मी होती. भारतीय भाग्याची ती भविष्यकालीन दिव्य प्रभा होती. अंधारातील ती अमरज्योत होती ! जा. सागरा जा व सा-या हिंदुस्थानला त्या चिंधीतील महान अर्थ सांग. त्या चिंधीतील कुराणाचा व वेदाचा महिमा सर्वांना गर्जना करुन सांग.
मित्रांनो ! या श्यामचे जीवन अनेकांच्या प्रेमाने रंगले आहे, अनेकांच्या प्रेमामुळे पुष्ट झाले आहे. हिंदू व मुसलमान उभयतांनी या श्यामला प्रेम दिले आहे, लहानपणापासून दिले आहे. सा-या जातींनी व सा-या धर्मांनी मला ओलावा दिला आहे. श्यामला सर्वांनी प्रेमामृत पाजिले; परंतु श्याम जगाला काय देणार !
श्याम काही देऊ शकत नाही. श्यामच्या हृदयात सर्वांबद्दल गाढ कृतज्ञता आहे. त्या सर्वांचे श्यामला स्मरण आहे. तो लहानपणचा अहंमद आज कोठे असेल ? तीस वर्षे जवळजवळ त्या गोष्टीस झाली. तो कोठे का असेना, माझ्या जीवनात तरी तो अमर झाला आहे !'