संध्याकाळी दादा व त्याचे मित्र यांच्याबरोबर मी कधी कधी बाहेर जात असे. पर्वती पाहिली. तेथून दुरुन सिंहगड पाहिला. पर्वतीवरचे भुयार पाहिले. 'या भुयारातून घोडे जात. घोडयांच्या टापांच्या खुणा आहेत तेथे' असे मला दादा म्हणे. तुळशीबाग व बेलबाग पाहिली. बेलबागेतील देवांच्या मूर्तीपेक्षा तेथील मोरच मला फार आवडले. तोपेर्यंत मी मोर पाहिले नव्हते. मोरांच्या पिसा-यांतील देवांच्या मूर्ती मी पहात होतो.

दादाने मला टिळकांचा वाडा दाखविला. टिळकांच्या किती तरी दंतकथा त्या वेळेस मुलांत प्रचलित होत्या. दादा मला त्या सर्व सांगायचा. त्यावेळेस टिळक सहा वर्षांच्या शिक्षेवर गेले होते. आमच्या मामांकडे टिळकांची तसबीर होती व तिच्यातील मूर्तीखाली लोकमान्यांचे ते धीरगंभीर शब्द लिहिलेले होते. आम्ही ज्या वाडयात राहात होतो तेथून जवळच लोकमान्यांचा गायकवाडा होता. मी कितीदा तरी वाडयाकडे कुतूहलाने पहात असे.

मी पुण्यात होतो; परंतु मन काही पुण्यास रमत नव्हते. पुणे सोडून जावे, असेच माझ्या मनात राहून राहून येई. रात्री निजावयाच्या वेळेस मी दादास म्हणावयाचा, 'कोठे रे मला रानात आणून टाकले आहे ! माझा जीव घाबरतो !' दादा शेवटी रागवायचा व मला म्हणावयाचा, 'नीज आता. मला दीवा मालवायचा आहे.' दिवा मालवला म्हणजे मला झोप यावयाची नाही. मी कोकणात घरी होतो. तेथे रात्री देवाजवळ नंदादीप असायचा. केव्हाही उठले तरी घरात प्रकाश असावयाचा. दिव्याच्या प्रकाशात निजण्याची मला सवय झालेली. त्यामुळे अंधारात मला झोप येत नसे. आजूबाजूस अंधार असताना सुखाने कोण झोपेल ?

आज भारतवर्षात सर्वत्र अंधार आहे, जिकडे तिकडे अज्ञान व रुढी यांचा बुजबुजाट आहे. वास्तविक कोणासही चैन पडता कामा नये. विवेकानंद एके दिवशी रात्री रडले, त्यांची उशी ओलीचिंब झाली. त्यांच्या मित्राने त्यांना विचारले, 'रात्री झोप नाही का आली ? ही उशी कशाने भिजली ? पाणी का सांडले ?'

विवेकानंद म्हणाले, 'या भारतवर्षातील माणसे पशूसारखी झालेली पाहून कोणास सुखाची झोप येईल ? हरिजनांना, स्त्रियांना आपण किती हीन स्थितीला आणले आहे, हे पाहिले म्हणजे कोणाचे डोळे भरुन येणार नाहीत ?'

मित्रांनो, सभोवती अंधार असेपर्यंत झोपू नका. अंधारात दिवा आणा व मग क्षणभर झोपलेत तर शोभेल. लहानपणी मला काळोखात झोप येत नसे. ती गोष्ट आठवली म्हणजे आज भारतीय लोकांस झोप कशी येते, याचे मला आश्चर्य वाटते.

एखाद्या वेळेस मध्यरात्री गाढव ओरडते. त्या वेळेस या भारतीय लोकांना सर्वत्र दु:ख, दैन्य, दारिद्रय अज्ञान असताही कशी झोप येते, हे का ते गाढव सांगत असते ? भारतीयांच्या झोपेबद्दल ते गाढव दु:ख करते. त्यांना जागे करु पहाते. भारतमातेच्या धुळीत लोळणारा, दिवसभर वाटेल तो घास खाऊन मरेपर्यंत मुकाटयाने श्रम करणारा व रात्रीच्या वेळेस रडणारा हा गाढव म्हणजे महान् मातृभक्त, असे मला वाटत असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel