माझ्या पाठीमागून कोणीतरी आले. माझे डोळे धरले गेले; परंतु माझे डोळे ओले पाहून डोळे    धरणा-या माणसाचे हृदय विरघळले.

गंगू म्हणाली, 'श्याम ! का रे रडतोस ? सांग ना. मी तुझ्याशी बोलत नसे; परंतु तुझ्या शाळेतून येण्याची मी रोज वाट पहात असे. तू आज आईकडे आला नाहीस. एकदम येथे वरती आलास. मला वाटले की, आता येशील. थोडयाने वेळाने येशील. शेवटी मी तुझ्याकडे आल्ये. सांग ना काय ते ! मी बोलत नव्हत्ये म्हणून तू रडत होतास.'

गंगू म्हटले, 'आज शाळेत एक गोष्ट झाली. तिचे मला रडू येत आहे.'

गंगू म्हणाली, 'मास्तरांनी मारले ?'

मी म्हटले, 'मारासाठी मी काही रडलो नाही. हात कधी मागे घेतला नाही.'

गंगू म्हणाली, 'मग काय कोणी मित्र बोलत नाही ? तुझा राम तुझ्याजवळ बोलतो ना ?'

मी म्हटले, 'हो'

गंगू म्हणाली, 'मग काय झाले ?'

मी म्हटले, शाळेत नादारी मिळावी म्हणून मी उभा राहिलो; तो मास्तर एकदम म्हणाले, 'बस खाली ! तुझे घराणे सा-या तालुक्यात प्रसिध्द आहे. आणि भिका-याप्रमाणे नादारीसाठी काय उभा    राहतोस ?' भाऊ म्हणाले होते, 'नादारीसाठी उभा रहा.' उभा राहिलो तर शिक्षक असे बोलतात व सा-या वर्गात अपमान होतो. नको हे अपमानाचे जिणे. कोठेतरी दूर दूर निघून जावे असे मनात येते. परंतु गंगू, जाऊ तरी कोठे ? बडे घर नि पोकळ वासा असे आमचे झाले ! काय करावे मला समजत नाही. मी रडू नको तर काय करु ? अपमान मला सहन होत नाही.

गंगू
:- तुझे वडील फीचे पैसे नाही का देणार ?

मी:- देतील कोठून तरी कर्ज काढून. फी देणे त्यांच्या जीवावर येते. आईबापांना शिणवून व श्रमवून का शिकावे, हेच मला समजत नाही.

गंगू
:- शिकून त्यांना सुख दे. आज त्यांना कष्ट पडतील परंतु उद्या तु त्यांना कष्ट पडू देऊ नकोस. त्यांना सुखात ठेव. आज मुलांसाठी आईबाप कष्ट करतील. उद्या मुले त्यांच्यासाठी झिजतील. आज झाडाला पाणी घालतो. उद्या झाड आपणास छाया देईल. श्याम ! मोठा हो. आईबापास सुख दे.

मी
:- मी शिकून मोठा होईपर्यंत माझी आई कोठली जगात राहायला ? ती नेहमी आजारी असते गंगू ! माझी आई फार दिवस मला लाभणार नाही !   

गंगू :- सायंकाळी असे अमंगल बोलू नये. चल खाली, आपण देवा-तुळशीला दिवा दाखवू. तुला आवडेल ते गाणे मी म्हणेन. चल, असे संध्याकाळी झाडाखाली रडू नये श्याम.

मी:- ज्याच्याजवळ राम आहे त्याला पाहून भूत पळेल. श्यामजवळ भूते- पिशाच्चे कधी येणार नाहीत. तुमचे बायकांचे काहीतरीच.

गंगू
:- ज्याच्याजवळ राम आहे तो रडत कशाला बसेल ? तो आनंदाने उडया मारील. देव सारे बरे करील, अशी श्रध्दा असेल.

मी :- होय. तू म्हणतेस ते खरे. माझी आई असेच म्हणत असते. तू दिवा लाव, मी सांगेन ते गाणे म्हण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel