या चरणात 'मेला' हा शब्द बायकांच्या तोंडच्या सीतेच्या तोंडी घातला आहे व त्यामुळे चरण गोड व यथार्थ वाटतो.
"मृदु सुपथिहुनीही मानिते पाय-वाटे'
या चरणात प्रथम संस्कृत शब्द योजून व शेवटी पायवाट हा शब्द वापरल्यामुळे शालजोडीस चिंधीचे ठिगळ लावावे तसे केल्यामुळे कशी अर्थहानी झाली आहे, ते केशवराव दाखवीत. इंग्रजी व मराठी काव्यात डुंबावयास केशवरावांनी मला नकळत स्फूर्ती दिली. अर्थाच्या व भावनांच्या छटा पाहवयास त्यांनी शिकविले. माझ्या भावनामय हृदयास त्यांनी संस्कारी केले.
इंग्रजी कवितांची मी भाषांतरे करु लागलो. शिपायाचे स्वप्न, पहिले दु:ख, आवडते कोकरु वगैरे कविता मी मराठीत त्या वेळेस आणल्या. आवडते कोकरु या कवितेचे भाषांतर सुरेख झाले होते. आज ते मजजवळ नाही; परंतु त्यातील काही चरण अजूनही मला आठवतात.
"गडबड न करी रे लाडक्या पाणी पी पी' हा चरण अजूनही माझ्या कानात घुमत आहे.
"हिमसमधवलांगच्छागहृत्सौख्यकारी
निकट बहु तयाच्या कोमलांगी कुमारी'
हे चरण त्या वेळेस मला फार आवडत होते. कोकराला 'छाग' शब्द तेथे वापरला तो योग्य नाही. छाग म्हणजे-यज्ञीय कोकरु-बळी द्यावयाचे कोकरु; परंतु माझ्या त्या वेळच्या बुध्दीला एवढा पोच नव्हता.
मी माझ्या भोवतालच्या वस्तू व व्यक्ती यांच्यावर मग काव्य करु लागलो. माझ्या वर्गातील सर्व मुलांवर मी कविता केल्या. कोणाचे एका श्लोकात वर्णन, तर कोणावर तीन तीन श्लोकही मी केले होते. आमच्या मधल्या सुट्टीत होणा-या आटयापिटयांच्या खेळांवरही मी काव्य केले.
शाळेतील मुले मला कवी म्हणून ओळखू लागली. शाळेतील माझ्या मित्रांस मी काव्यरुप पत्रे लिहू लागलो. Boy Poet, Boy Poet, असे मला मित्र म्हणत. शाळेतील शिक्षकांच्या कानांवरही माझी काव्य कीर्ती गेली.
एकदा एक शिक्षक आम्हांला मोरोपंतांचे सावित्री-आख्यान शिकवीत होते. एका आर्येत 'कीर्ती' शब्द अनेकवचनी आहे असा भास होत होता. मी विचारले, 'हा शब्द येथे अनेकार्थी का वापरला आहे ?' ते शिक्षक म्हणाले, 'तुमच्या काव्यात तरी कीर्ती शब्द कोठे अनेक वचनात आहे का ? तुमच्या वाचनात कीर्ती शब्द अनेकवचनी कोठे आला आहे का ?' तो उपहास मला सहन झाला नाही. मी सारे नवनीत अनेकवचनी कीर्ती शब्द वापरलेला कोठे आहे का, हे पाहाण्यासाठी धुंडाळले. मोरोपंतांच्या अंबरीषाख्यानात मला असे उदाहरण सापडले.
"कीर्ती श्रीमाधवाच्या सतत परिसता संपला शब्द सारा ।'
या चरणात 'श्रीमाधवाच्या कीर्ती' असा स्पष्ट अनेकार्थी प्रयोग आहे. तो चरण सापडताच मी आनंदाने नाचू लागलो. मी त्या शिक्षकांना तो चरण वर्गात दाखविला. ख-या शिक्षकाने माझे कौतुक केले असते. माझ्या प्रयत्नांची पाठ थोपटली असती ! परंतु हा मुलगा आपणास अडवितो, असे त्यांना वाटले. माझ्यावर प्रसन्न होण्याऐवजी ते जरा रुष्टच झाले.
अशा प्रकारे दापोलीच्या इंग्रजी शाळेत माझ्या हृदयाचा व बुध्दीचा विकास होत होता. साहित्यातील अंगणात मी खेळू-खिदळू लागलो होतो. माझ्या काव्यशक्तीचे प्रयोग करण्यात मी कृतज्ञता मानीत होतो. मित्रांनी केलेल्या स्तुतीने हुरळून जात होतो. एक प्रकारच्या गोड अशा मृगजळात मी पोहत होतो. डुंबत होतो.
शाळेतून परत येताना काव्यचर्चा करीत येत असू. राधारमण कवींच्या काव्याबद्दल आम्ही बोलत असू. चरणच्या चरण कसे यमकात्मक ते रचितात, याचे आम्हास आश्चर्य वाटे.