ज्या मुलाने फूल लाविले होते त्याच्यावर शिक्षक रागावले. त्या मुलाने फूल शिक्षकांना चिडवण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी म्हणून लाविले होते असे नाही; परंतु शिक्षकाना तो अपमान वाटला. ते त्या मुलाला म्हणाले, 'असे फूल लावणे काही शहाणपणाचे लक्षण नाही. हे तुम्हाला बरे दिसते का ? आणा ते फूल इकडे !' त्या मुलाने ते फूल नेऊन दिले.

मधल्या सुट्टीनंतर त्याच शिक्षकांचा पुन्हा पहिला तास होता. मधल्या सुट्टीनंतर आम्ही सर्वांनी ठरविले की, प्रत्येकाने फूल लावून बसावे. शाळेजवळ पडक्या बंगल्यापाशी नागचाफ्याची पुष्कळ झाडे होती. त्या झाडावर चढून २५ । ३० फुले आणण्यासाठी चढाऊ मुलांची टोळी पुढे गेली. ती मुले अर्ध्या तासाच्या आत भरपूर फुले घेऊन आली. नागचाफ्याची फुले फारच सुंदर असतात. त्या फुलांभोवती सुंदर पानेही होती. वर्गनायकाने प्रत्येकाला एक एक फूल दिले. देवाच्या सा-या मूर्ती सजल्या.

पहिली घंटा झाली. प्रत्येकाच्या कोटावर वनदेवतेचे निशाण फडकत होते. सुगंधी, सुरंगी, सुंदर निशाण ! वनदेवतेनेच जणू प्रत्येक मुलाला सजवून पाठविले होते. पहिली घंटा झाल्याबरोबर ते शिक्षक वर्गात जाऊन बसले. मुले बाहेर उभी होती. दुसरी घंटा होताच वर्गात रंगभूमीवर जाण्यासाठी ते सारे बालनट उत्सुकतेने उभे होते. झाली, दुसरी घंटा झाली. मुले शांतपणे वर्गात बसली. कोणीही हसले नाही, खोकले नाही, खाकरले नाही, शिकले नाहीत. शिक्षकांनी कृपादृष्टीने सर्वांकडे पाहिले. कृपादृष्टीची कोपदृष्टी झाली. त्यांनी सर्व वर्गाला उद्देशून म्हटले, 'हे तुम्हाला शोभते का ?' कोण उत्तर देणार ? वर्गनायक परशुराम उभा राहिला व म्हणाला, 'एकाने फूल लावणे शोभत नाही; परंतु सर्वांनी जर लावली तर कोणालाच कमीपणा वाटणार नाही. आता आम्ही सर्वजण सारखेच आहोत. म्हणून हे शोभेल असे वाटते.' शिक्षक काहीही बोलले नाहीत.

आम्ही पाचवीत असताना दोन नवीन शिक्षक आम्हाला लाभले. ते दोघे पदवीधर होते. एक किडकिडीत होते; तर एक जरा वाटोळे होते; एकाचे नाक टोकदार होते; तर दुस-याचे जरा बसके होते. एक साधे होते, गरीब होते; दुसरे जरा आपण कोणी विशेष आहोत, असे वाटणारे होते. किडकिडीत शिक्षक शास्त्र शिकवीत. आम्ही प्रयोगालयात जात असू. स्फटिकांचे वगैरे प्रयोग आम्ही केले. प्रयोगालयात असताना एखादा मुलगा त्या शिक्षकांच्या कोटाला पाठीमागे चिमटा लावून ठेवी. दुसरा कोणी हळूच जाऊन तो चिमटा काढून घेई. एखादा मुलगा त्यांच्या खिशात कोळसाच टाकून ठेवी. त्यानंतर पुन्हा जेव्हा तास येई तेव्हा कोणी, 'सर ! तुम्हाला खिशात काही सापडले ?' ते हसत व म्हणत, 'माझ्या घरी जळणाला काही तोटा नाही.' फार प्रेमळ होते ते शिक्षक. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम वाटे; परंतु तितका आदर वाटत नसे.

दुसरे शिक्षक आम्हास इंग्रजी, गणित आणि संस्कृत शिकवीत. ते प्रथम आले तेव्हा त्यांनी इंग्रजी व्याकरणावर फार भर दिला. आम्हाला इंग्रजी व्याकरण फार विचारावयाचे. आम्हीही त्यांना पुरुन उरलो. येथे स्वल्पविराम नको होता. येथे पूर्णविरामाची जरुरी होती. येथे उद्गार चिन्ह का आहे ? वगैरे प्रश्न त्यांना विचारुन आम्ही वादविवाद करावयाचे. 'शंकास्थाने विचारा,' असे त्यांनी सांगताच एक एक मुलगा खंडीखंडी शंका घेऊन उभा राही. 'अमक्या शब्दाऐवजी अमका शब्द वापरला असता तर काय    झाले असते. या विशेषणाचे स्वारस्य काय, हा परिच्छेद येथेच का संपविला ? असल्या शास्त्रीय शंका वर्गात विचारल्या जात. काळे म्हणून एक बिटुकला-थिटुकला मुलगा होता. तो शंका विचारुन भंडावी. एकेकाच्या शंकांचे समाधान करता करता तास केव्हा निघून जाई व बाकीच्यांच्या शेकडो शंका शिल्लकच राहात.

एकदा शिक्षकांनी एक नवीन प्रयोग करावयाचे ठरविले. ते म्हणाले, 'तुम्ही अभ्यास करीत नाही. मी उद्यापासून मार्क देणार आहे. रोज तुमचे मार्क मांडीत जाईन. वाचनात मार्क, शब्दासाठी मार्क, गणितात मार्क, माझ्या विषयापुरते तरी मी असे सुरु करणार. रोज शेवटचा माझाच तास आहे. त्या वेळेस मिळालेले मार्क सांगत जा.' आम्हा मुलांना ही गोष्ट आवडली नाही. मार्कांची लाचलुचपत घेऊन अभ्यास करणारे आम्ही नव्हतो. आम्ही का घंटेचे मार्क आणि पाटीचे मार्क घेणारी बिगारीतली बाळे    होतो ? आम्हाला तो अपमान वाटला सर्वांनी एकएक मार्क लावायचा असे आम्ही ठरविले. आधी या गोष्टीचा मागमूस त्या शिक्षकांना आम्ही लागू दिला नाही. गणिताचा तास आला. त्यांनी गणित घातले. थोडया वेळाने म्हणाले, 'झाले की ? मी उत्तर सांगतो.' मी म्हटले, 'मला येते आहे; जरा थांबा.' ते म्हणाले, 'आता तुमचे मार्क गेले. मी थांबत नाही.' मी रागावून म्हटले, 'हा अन्याय आहे, मला येते आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel