पुढे मामा पुण्याला निघून गेले; परंतु घरी माहेरपणाला आलेली अक्का आजारी पडली. माझी एकुलती एक गुणांची बहीण विषमाने आजारी पडली. तिचीही सेवा मी मोठया मनोभावाने केली. अक्काच्या कपाळावर थंडगार पाण्याचे ताम्हन धरुन तासंतास बसत असे. अक्काची औषधे तयार करीत असे. गावातील वैद्याच्या औषधाने गुण पडेना. शेवटी मी व माझे आजोबा एके दिवशी एक मराठी वैद्यकग्रंथ घेऊन बसलो. अक्काची सारी लक्षणे मी सांगत होतो. ती लक्षणे कोणत्या रोगात आहेत ते आम्ही पडताळून पहात होतो. जो रोग ठरेल त्यावर जो उपाय सांगितला असेल तो करुन पहावयाचा, असे आम्ही निश्चित केले होते. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्व औषधी वस्तू आम्ही मिळविल्या. लहान काटा आणून औषधी प्रमाणात मोजून आम्ही पुडया तयार केल्या. देवाचे नाव घेऊन अक्काला त्या काढयाचे औषध सुरु करण्यात आले.

अक्काला खरोखरच गुण पडत चालला. आजोबा व मी दोघांनी केलेली परीक्षा बरोबर ठरली. आमचे निदान अचूक ठरले, आजोबांनी माझी स्तुती केली. 'श्यामला धोरण आहे. चंद्रीला काय काय होते ते टिपल्याप्रमाणे त्याने त्या दिवशी सांगितले. ती लक्षणे जास्तीत जास्त कोणत्या रोगात बसतात हे ठरवितानाही श्यामचा फारच उपयोग झाला, 'असे आजोबा कोणाजवळ तरी बोलत होते. ते शब्द अमृताप्रमाणे माझ्या कानावर पडले. गेलेली अब्रू मी थोडीथोडी मोठया प्रयासाने मिळवीत होतो.

त्या अक्काच्या आजारात आई कितीदा तरी 'माझी गुणांची पोर कधी बरी होईल काही कळत नाही' असे बोलली. आईचे शब्द ऐकून मला लाज वाटे. 'माझा गुणाचा श्याम असे माझी आई माझ्याबद्दल केव्हा बरे म्हणेल ? असे माझ्या मनात येई. आळस सोडून दिला. सारी कामे करु लागलो. पुढचे आंगण मी झाडीत असे. चारा दिवशी ती मी सारवीत असे. मी शेणगोठा करीत असे. गोठयात जमिनीला चिकटलेले शेण करवंटीने खरवडून गोठा आरश्यासारखा स्वच्छ करीत असे. शेणाचे कधी थापे घालीत असे, कधी फोडून टाकीत असे. म्हशीला विहिरीवर नेऊन तिला स्वच्छ धूत असे. तिच्या शिंगांच्या बेचकात दोरी घालून मी घसाघसा ओढीत असे. असे केल्याने शिंगांच्या बेचक्यातील खाज कमी होते व म्हशी गवाणीवर शिंगे आपटीत नाहीत. म्हैस गोठयात हगलेली दिसली तर तिचे शेण लगेच फावडयाने ओढून बाजूला करुन मी ठेवीत असे. केळीना पाणी वगैरे घालीत असे. सकाळी फुले परडीत वेचून ठेवीत असे. कधी कधी आजोबांना किंवा वडिलांना आंघोळीस उशीर झाला तर मी देवाची पूजाही करीत असे. आजारी अक्काची मुलगी खांद्याशी धरुन खेळवीत असे. श्याम कर्मतत्पर व सेवापारायण होत होता. कारण त्याला गेलेली अब्रू परत मिळवावयाची होती. 'माझा गुणाचा श्याम' असे आईच्या तोंडचे उद्गार ऐकावयाचे होते. जगातील शेकडो मानपत्रे, मोठमोठे मानसन्मान त्यापेक्षा आईच्या तोंडच्या यथार्थ स्तुतीच्या एका शब्दात अधिक अर्थ असतो. श्यामला आईकडून धन्य म्हणून घ्यावयाचे होते. तेच त्याचे अत:पर जणू ध्येय ठरले होते.

अक्का बरी झाली. सर्वांना समाधान झाले. अक्का अशक्त होती. अद्याप फार हिंडू फिरु शकत नव्हती. ती व मी खूप बोलत बसत असू. मी पुण्याच्या माणकताईच्या गोष्टी तिला सांगितल्या व तिला रडू आले. मी अक्काचाही पत्रलेखक बनलो. अक्काच्या यजमानांना अक्काच्या सांगण्यावरुन मी पत्र लिहीत असे. पत्राच्या शेवटी अक्का सही करी. ते अक्काच्या सहीचे पत्र असे. पत्रामध्ये वरती मायना काय लिहावा, ते माझ्या नीटसे ध्यानात येत असे. आमच्या मोडी पुस्तकात इतर सारे मायने होते; परंतु पत्नीने पतीस कोणता मायना लिहावा, ते त्यात नव्हते. शेवटी मी माझ्या पोथी पुराणातील ज्ञान उपयोगात आणले. दमयन्ती, सीता, सावित्री कसे विलाप करीत ते आठवले. आपल्या पतींना कोणत्या संबोधनांनी त्या हाका मारीत त्यांचे स्मरण केले. शेवटी मी पुढीलप्रमाणे पत्रास आरंभ केला-

"मत्प्रिय पतिदेवाचे चरणसेवेसी'


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel