निदान स्टेशनावर तरी जाऊ या असे मनात आले. मी एका टांग्यात बसलो व स्टेशनवर आलो. मुंबईस जाईन म्हटले तर पुरेसे पैसे नव्हते. पाणी आलो असतो तर जेमतेम मुंबईच्या तिकिटास पैसे पुरले असते. परंतु अनोळखी व अपरिचित मुंबईत रात्रीच्या वेळेस मी पायांनी कोठे जाणार, कोठे हिंडणार ? आणि मुंबईचे मामा तरी मला फिरुन घरात घेतीलच असे कशावरुन ? तेही दारातून मला हाकलून देतील, असे मनात येई. माझ्या कमरेत चांदीचा करगोटा होता. बारीकच होता. परंतु त्याचे कमीत कमी रुपया दोन रुपये आले असते. मी तो करगोटा कमरेतून तोडला. स्टेशनवर कोणाला तरी विकावा असा मी मनात विचार केला. मी धाडस करुन एक दोघांजवळ गेलो व म्हटले, 'माझा एक करगोटा विकत घेऊन मला काही पैसे द्याल का ? माझ्यावर तुमचे उपकार होतील. मला कोकणात घरी जावयाचे आहे; परंतु पुरेसे पैसे नाहीत म्हणून मी हा विकत आहे. घेता का ?' त्या गृहस्थाने माझ्याकडे संशयाने पाहिले. ते म्हणाले, 'आम्हाला नको काही. असेल चोरीबिरीचा माल. जा, येथून चालता हो.'
त्यांचा शब्द ऐकून मी चपापलो. मी पटकन तो करगोटा माझ्या खिशात लपविला. पोलिस मला पकडतील; कोठून आणलास करगोटा, बोल ! का मारु फटका, असे दरडावतील; मला उलटा टांगून मारतील; मिरच्यांची धुरी देतील, किती तरी भयाण विचार माझ्या डोक्यात थैमान घालू लागले ! मी घाबरलो व एकदम स्टेशनच्या बाहेर गेलो. अर्धा-पाऊण तास भटकत होतो. अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा स्टेशनात आलो. बाराच्या गाडीची तिकिटे सुरु झाली होती. आत बाराची गाडी उभी होती. लोक बसू लागले होते. ज्या गाडीने पूर्वी मी मुंबईस गेलो होतो तीच ती गाडी. किती आशाळभूतपणाने त्या गाडीकडे मी पहात होतो ! मी कोणत्या ठिकाणचे तिकिट काढू, कोणाकडे' कोठे जाऊ ? काही कळेना, काळी वळेना. मी तिकिट घेण्याच्या खिडकीजवळ घुटमळत उभा होतो.
बारा वाजण्याची वेळ होत आली. गाडीची घंटा झाली. गाडी सुटावयास फक्त पाचच मिनिटांचा अवधी होता. पाच मिनिटांतच काय ते मला निश्चित केले पाहिजे होते.
काही कळेना काही वळेना बुध्दि ही भ्रमली
वर्म कळेना शर्म कळेना वृत्ति गुंग जाहली ।।
माझी वृत्ती गुंग होऊन गेली. गाडीची शिट्टी झाली. गाडी निघाली. शेकडो उतारु तिच्यात बसले होते. मला त्या सर्वांचा हेवा वाटला. मी असूयेने त्या गाडीकडे पहात राहिलो. माझ्या संतापाला हसत हसत ती गाडी निघून गेली. स्टेशनमध्येच मी किती वेळ तरी बसून राहिलो. पोटात भूकही लागली. भूक लागली म्हणजे काही तरी घेऊन खावे, असे मनात येई; परंतु मामांच्या औषधांसाठी दिलेल्या पैशांतून खाण्याचा धीर होईना. भूक शमविण्यासाठी मी नळावर जाऊन पुन्हा पुन्हा पाणी पीत होतो.
शेवटी त्या स्टेशनात क्रियाशून्य व निश्चयशून्य बसण्याचा मला कंटाळा आला. मी स्टेशनबाहेर पडलो. पाय थकेपर्यंत भटकत रहावयाचे असे मी ठरविले. स्टेशनपासून मी निघालो. मला त्या बाजूची फारशी माहिती नव्हती. मी कोठे व कसा हिंडत गेलो, ते माझे मलाच माहीत नव्हते. मी आळंदीकडे का वानवडीकडे गेलो, कोणाला माहीत; भटकता भटकता संध्याकाळ होत आली. रात्री कोठे बसू, कोठे निजू ? आपण आलो तरी कोणत्या बाजूला ? काही कळेना. समोर पर्वती पाहिल्यावर तेथून मग मी काटयातून, खळग्यातून, शेतातून निघालो. काही करा; पण पर्वती गाठा, असे माझ्या पायांना मी सांगत होतो. काळोख पडण्यापूर्वी पर्वती पकडलीच पाहिजे, असा हुकूम शिथिल होणा-या माझ्या तंगडयांना मी फर्माविला. तंगडया तोडीत मी झपझप चाललो होतो. काटे बोचत होते. ठेचा लागत होत्या; परंतु माझे लक्ष ध्येयभूत पर्वतीकडे होते. ते सोन्याचे कळस माझ्या डोळयांसमोरुन मी दूर केले नाहीत.