अशा रीतीने बेमालूम खोटे झोपण्याची कला मी संपादन केली.

मामांच्या भीतीमुळे मला ते सारे करावे लागे. भीतीमुळे खोटेपणा वाढतो. अंधारात घाण राहते. अंधारात चोर, डास, जंतू राहतात. भीतीच्या अंधारात असत्याची उत्पत्ती होते. प्रेमाच्या प्रसन्न वातावरणात मोकळेपणा असतो. मुले खोटे बोलतात. कारण त्यांना भय वाटत असते. मुलांनी खरेपणाने वागावे असे वाटत असेल तर तुमच्याबद्दल त्यांना भीती वाटणार नाही असे करा.

एके दिवशी रात्री मामांबरोबर माधवराव आले होते. मामा आले होते म्हणून मी झोपलो होतो. माधवरावांचा आवाज ऐकून मला उठावेसे वाटत होते.

'श्याम निजला वाटते ?' माधवरावांनी विचारले.

'तो लवकरच झोपतो. मी घरी येण्यापूर्वी तो जेवतो व पडतो. लहान आहे अजून.' मामा म्हणाले.

'आता डोळे तर चांगले आहेत ना ?' माधवरावांनी विचारले.

'हो, मधून मधून औषध घालावे लागते.' मामा म्हणाले.

'श्याम वाचतो चांगले. कविता पुष्कळ पाठ केल्या आहेत त्याने. त्याला कविता फार आवडतात.' माधवराव म्हणाले.

'परंतु मी शिकवायला लागलो की, श्याम रडायला लागतो. शेवटी मी शिकविणे बंद करतो. मनात म्हणतो की. आहे येथे चार दिवस तो असू दे आनंदाने.' मामा म्हणाले.

'माझ्याजवळ मात्र हौसेने बसतो. प्रश्नांची उत्तरे देतो. गोड आहे श्याम. स्वत:च एखाद्या वेळेस गोष्ट रचून सांगतो.' माधवराव माझी स्तुती करीत होते.

माधवरावांचे शब्द ऐकून मला गुदगुल्या होत होत्या. स्वत:ची स्तुती कोणाला आवडत नाही ? एक संताला मात्र स्तवन हे विषसम वाटत असते. बाकी आपण सारे स्तुतिप्रिय आहोत. लहानपणी कोणी उत्तेजन दिले तर मुलांना केवढी धन्यता वाटत असते ? माधवरावांना उठून एकदम मिठी मारावी असे मला वाटत होते. परंतु माझे ढोंग बाहेर आले असते. मी तसाच पडून राहिलो. पांघरुणात गुदमरुन राहिलो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel