"सारे म्हणजे कोण ?' त्याने विचारले.
'मारुती, बिभीषण, शबरी राम राम म्हणत. शंकर सुध्दा राम राम म्हणतो. जटायू राम राम म्हणे.' मी म्हटले.
"तुला रे काय माहीत ?' त्याने कुतूहलाने विचारले.
"मी सारे वाचले आहे. मला आहे सारे माहीत. रामाच्या नावाने सेतू बांधताना शिला तरल्या. रामविजयात नाही का ?' मी ऐटीने म्हटले.
कल्याण स्टेशन गेले. आता ठाणे येणार होते. मुंबईला गाडीवाल्यास किती पैसे द्यावे लागतील वगैरे मी विचारीत होतो. सात वाजावयास आले होते. गाडी वेगात जात होती. तिला झालेला उशीर भरुन काढावयाचा होता.
'तुम्ही या ठाण्यालाच नेहमी असता ?' मी विचारले. नाही.' तो म्हणाला.
'तुमचे घर कोठे ?' मी विचारले.
'वा-यावर.' तो म्हणाला.
'काही तरीच ! पाखरांची सुध्दा घरटी असतात. खरेच कोठे तुमचे घर ?' मी पुन्हा विचारले.
'मी जाईन तेथे माझे घर, वारा वाटेल तेथे जातो, मेघ वाटेल तेथे जातो. तसा मी.' तो म्हणाला.
'म्हणजे तुम्हाला कोणी नाहीत ? आईबाप नाहीत ? भाऊ-बहीण कोणी नाही ? तुम्ही एकटे आहात ?' मी विचारले.
'मला कोणी नाही. म्हटले तर मी एकटा आहे. म्हटले तर कितीतरी मला भाऊबहिणी आहेत.' तो म्हणाला.
'म्हणजे काय ?' मी आश्चर्याने म्हटले.
'लहान घरातील भाऊ मला नाहीत; मोठया घरातील आहेत.' तो म्हणाला.
'म्हणजे तुमची दोन घरे आहेत ?' मी विचारले.
तो तरुण गोड गोड हसला. त्याने माझ्या पाठीवरुन हात फिरविला. त्या वेळेस त्याची मुद्रा किती सात्त्वि व प्रेमळ दिसत होती !
मनाचा मवाळू दिनाचा दयाळू
स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू
असा तो दिसत होता.