मामा सांगत होते. श्याम ऐकत होता, शेवटी माझी पुन्हा तयारी झाली. निघताना मला वाईट वाटले. एक प्रकारची लाज, अपमान अनेक भावना मनात उसळल्या होत्या. शेवटी सर्वांना नमस्कार करुन मी निघालो. मामांनी मला गाडीत बसवून दिले. बरोबर आठ आण्याचे पैसे दिले. गाडी निघाली. मी तर रडू लागलोच; परंतु धीर गंभीर मामांनीही रुमाल डोळयांस लाविला.

मी पुन्हा पुण्यास जाणार ! पुन्हा तोच कंटाळवाणी जीवनक्रम. परंतु काय करणार ? माझ्या बालमनाला जितका विचार करता येणे शक्य होते तितका मी करीत होतो. इतक्यात ठाण्याची आठवण झाली. माधव दिव्य ता-याप्रमाणे माझ्या जीवनात क्षणभर चमकून निघून गेलेला माधुर्यसागर माधव ! भेटेल का पुन्हा तो ? कसला पुन्हा भेटतो ? माधव म्हणजे वारा, माधव म्हणजे मुशाफरी करणारा मेघ. तो हिमालयाजवळ आहे का रामेश्वराजवळ आहे कोणास ठावे ? कुठेही असला तरी अभागी श्यामांना तो हसवीत असेल. माधव ! तुझ्यासारख्या जीवनदायी जिवाची सर्वत्रच जरुरी आहे. जा, सर्वत्र जा. दु:ख, संताप दूर कर. क्लेश, चिंता कमी कर.

ठाणे स्टेशनवर कोण कोण चढतात ते मी टक लावून पाहिले. माधव दिसला नाही. मी हिरमुसला झालो. माधव भेटता तर न जाणो, कदाचित श्याम कायमचा त्याच्या बरोबर जाता ! श्यामचे जीवन आजच्यापेक्षा निराळे झाले असते. आजच्यापेक्षा पवित्रतम, मधुरतम, सुंदरतम झाले असते. परंतु कोणी सांगावे ? माझ्या जीवनाची मला काळजी आहे त्यापेक्षा हे जीवनधन मला देणा-या त्या परम श्रीमंताला, त्या प्रभूला, त्याची अधिक काळजी आहे. माझ्या जीवनाकडे त्याचेही डोळे आहेत.

मी पुण्यास आलो. वाटेत काहीही घेऊन खाल्ले नाही. खाण्याची त्या दिवशी इच्छाच झाली नाही. पुणे स्टेशनवर आलो. टांगा करुन घरी गेलो. लाजत, मान खाली घालून मी वाडयात शिरलो. 'श्याम आला, श्याम आला !' सारी म्हणाली. माझा भाऊ घरी होता. क्षणभर कोणी कोणाशी बोलले नाही. मी दादाला म्हटले, 'दादा ! या श्यामवर रागावू नकोस, मला सर्वांनी क्षमा करावी.'

दादा म्हणाला, 'या गोष्टीचा आम्ही कोणी उल्लेख करणार नाही. जसे काही झालेच नाही, असे समजून वागण्याचे आम्ही ठरविले आहे.'

मी घरात गेलो. मामी बोलली नाही. एशीने मला पहाताच हास्य केले. तिने मला ओळखले. मी तिला चिमटे तरी खेळवीतही असे. एशीला घेऊन लगेच झोपाळयावर जाऊन बसलो. झोपाळयावर माधवाने शिकविलेले चरण मी गुणगुणत होतो.

प्रेमाचे भरले वारे
भाऊ हे झाले सारे  ।। प्रेमाचे ।।


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel