फकिराला आश्चर्य वाटले, तो मनात विचार करु लागला. एवढयाशा डोळयाची का इतकी किंमत असेल ? राजा आपली थट्टा तर नाही ना करीत ? परंतु फकिराच्या डोक्यात शेवटी स्वच्छ प्रकाश पडला. त्या डोळयाची अनंत किंमत त्याला दिसू लागली. तो जसजसा विचार करी तसतशी डोळयांची किंमत अधिकच दिसू लागली. तो मनात म्हणाला, 'खरेच, या लहानशा डोळयाची खरी किंमत कोण करु शकेल ?' इवलासा डोळा ! परंतु या पृथ्वीवरुन दूर अनंत आकाशात असलेले शेकडो तारे तो पाहू शकतो. आकाशाला भिडू पाहणारे, दुरुन निळे निळे दिसणारे पर्वत तो पाहू शकतो. हजारो लाटांनी उचंबळणारा सागर, खळखळ वाहणा-या पवित्र नद्या, फुलांफळांनी शोभणारे वृक्ष, वा-यावर नाचणा-या लतावेली, सारे हा डोळा पाहू शकतो. मित्रांचे प्रेमळ हास्य, भावंडांची गोड तोंडे, आईचा मुखचंद्र हा डोळा असल्यामुळेच हे सारे अनुभविता येते; मोराचा पिसारा, पोपटाचा रंग, खेळकर वासरे, गोंडस गाई, सृष्टीतील हे अपार वैभव या चिमुकल्या डोळयांमुळे अनुभविता येते. या डोळयांची किंमत कोण करील ? एका डोळयाची एवढी किंमत मग दोन डोळयांची किती ? आणि डोळयांशेजारी कान आहेत. आईने मारलेली गोड हाक या कानांनी ऐकू येते, सागराची गर्जना, झ-याचे गुणगुणणे, पाखरांचा किलकिलाट, मेघांचा गडगडाट, मित्रांचे प्रेमळ संवाद, गाईचे हंबरणे, कोकिळेचे-कुऊ-सारे कानांमुळे ऐकता येते. या कानांची किंमत किती ? आणि गोड गोड बोलावयास दिलेले हे ओठ व ही जीभ, दुस-याची सेवा करावयास दिलेले हातपाय, दुस-याच्या सुखदु:खाशी आपणास एकरुप करु शकणारे हे हृदय, जगात चांगले काय, वाईट काय, हे दाखविणारी ही बुध्दी, या सर्वांची किती किंमत होईल ? शरीर, हृदय व बुध्दी यांचे मोल कोण करील ? देवाने सर्व काही मला दिले आहे. मी उगीच वेडयाप्रमाणे देवाने मला काही दिले नाही, असे ओरडत होतो. मी आंधळा व कृतघ्न झालो होतो. देवाने मला भरपूर दिले आहे. त्याचा नीट उपयोग करणे एवढेच आपले काम. आपणास जे हे अपार व अमोल भांडवल जन्मत:च मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून जगाची तद्वारा सेवा करणे हे मानवाचे काम.'

फकीराचे डोळे भरुन आले. त्याच्याने बोलवेना. राजा म्हणाला, 'फकिरजी, बोला ना.'

फकीर काप-या आवाजात म्हणाला, 'राजा ! तू मला चांगला धडा शिकविलास. देवाने मला काही दिले नाही असे पुन्हा मी म्हणणार नाही. देवाने सारे काही मला दिले आहे.' असे म्हणून तो फकीर निघून गेला.

गडयांनो ! ही फकिराची गोष्ट नेहमी माझ्या डोळयांसमोर असते. माझे डोळे लहानपणी गेले नाहीत, याबद्दल मी देवाचा किती उतराई होऊ, हे मला समजत नाही. माझे डोळे लहानपणी, गेले असते तर मी किती अभागी झालो असतो.

डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. माझे डोळे चांगले झाले. उजवा डोळा जरा अधू आहे. परंतु मी त्याला नेहमी जपतो. एक काळ असा होता की, मी जगाला कंटाळून माझे डोळे बांधून ठेवीत असे. नको या जगाचे दर्शन ! जेथे तेथे लोभ, मत्सर, दंभ, स्वार्थ यांचा बुजबुजाट असे मनात येऊन तासन् तास डोळयांवर मी पट्टी बांधून ठेवीत असे ! केवढा कृतघ्न मी होत होतो ! लहानपणी जाणारे डोळे देवाने सांभाळले ते का या जगावर रुसण्यासाठी ? ते का जगावर रागावण्यासाठी ? नाही. नाही. जगातील दु:ख पाहून ते दु:ख दूर करण्यासाठी हे डोळे आहेत. जगातील काटे पाहून ते काटे दूर करावे म्हणून हे डोळे आहेत. जगातील आनंद पाहून आनंदावे म्हणून हे डोळे आहेत. दुस-याला काही देता आले नाही तरी निदान प्रेमळ दृष्टीने त्याच्याकडे पाहावे. डोळे म्हणजे प्रेमळ असे जणू दीपच. हेला ज्याप्रमाणे वाकडया नजरेने, लाल डोळयांनी बघतो, तसे माणसाने करणे शोभत नाही.

मी कोणावर रागावलो; क्रोधाने कोणाकडे पाहिले की, लहानपणी नाहीसे होणारे डोळे मला आठवतात. रस्त्यांतील काटे, दगड, घाण डोळयांना दिसूनही जर मी ती दूर करावयास वाकलो नाही, तर मला ते जाणारे डोळे आठवतात. आकाशातील चंद्र, आकाशातील तारे, धरेवरची फुले, पाण्यावरचे तरंग, हे सारे पाहून मी जर सुखी झालो नाही तर मला लहानपणाचा तो प्रसंग आठवतो. या विश्वाच्या भव्य दिवाणखान्यात लाखो चित्रे देवाने टांगली आहेत; न पाहील तो भिकारी. माझ्या डोळयांचा मला नीट उपयोग करु दे. देवाने दिलेल्या डोळयांचा मी कधीही दुरुपयोग करता कामा नये. कारण डोळे नसणे म्हणजे काय, हे मी अनुभवले आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel