मावशीने माझे हात धुतले. एका स्वच्छ रुमालाला तिने नीट टिपले. नंतर माझे हात तडतडू नयेत म्हणून कापूर घातलेले तेल तिने माझ्या हातांना लाविले. अशा रीतीने माझ्या खरजेवर मावशीने मारा चालविला. रोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळा मावशी याप्रमाणे हात धुई. माझी खरुज भराभर सुकू लागली. लिंबू व मीठ यांच्यासमोर खरुज तोंड वर काढीचना. मावशीने मला ताक जास्त पिण्यास सांगितले.
मी एके दिवशी मावशीला विचारले, 'मावशी ही खरुज का होते ?'
मावशी म्हणाली, 'पोटात उष्णता वाढली म्हणजे होते. तू ताक पीत गेलास म्हणजे कमी होईल.'
मी म्हटले, 'ताक पिणा-यांना का कधी खरुज होत नाही ? मावशी म्हणाली, 'होते कधी कधी.'
मी म्हटले, 'आणि पोटातील उष्णता माझ्या हातातूनच का बाहेर यावी ? माझ्या पायांना का नाही झाली खरुज ?'
मावशी म्हणाली, 'कोणाच्या पायांनाही होते. काहींचे तर सारेच अंग खरजेने भरुन जाते.'
मी विचारले, 'मावशी ! माझे हातच वाईट; म्हणून खरुज झाली असेल. मी एशीला चिमटे घेतो, मी मुंबईला देवाच्या पूजेतील पैसे घेऊन पळालो. मी मंडईतील पेरु याच हाताने चोरले. माझे हातच वाईट आहेत, नाही ?'
मावशी म्हणाली, 'त्याचा खरजेशी काय संबंध ? हातांनी चोरी केली तर मनाला वाईट वाटते. आपण स्वच्छता ठेवीत नाही म्हणून खरुज होते. इंग्रजीत एक म्हण आहे की, स्वच्छता म्हणजे देव. स्वच्छतेच्या देवाची पूजा करणार नाही. त्याला खरुज होईल, रोग होतील. आपल्याकडे या देवाची कमी उपासना आहे. अंथरुणे कोणी नीट धुणार नाहीत, त्यांना उन्हात वाळत टाकणार नाहीत. उशी म्हणजे तर घाणीचे माहेरघर असते. अंथरुणांना घाण येऊ लागते तरी त्याची कोणी काळजी घेत नाही, स्वच्छतेच्या देवाची भक्ती जसजशी सुरु होईल तसतशी आपल्या देशातील रोगराई जाईल.'
माझ्या मावशीचे म्हणणे किती खरे आहे ? सार्वजनिक स्वच्छता आपणास शिकावयाची आहे. खेडयात वाटेल तेथले पाणी पितात. हिवताप येतो. मरीमाय येते, नारु होतात. या स्वच्छता-देवाची उपासना आपणास सर्वांना शिकावयाची आहे. आपले लोक स्वत:च रोग लपवितात. दुस-यापासून ते अलग राहणार नाहीत. मुद्दाम त्यांच्यात ते मिसळतील. अशा रीतीने रोगाचा फैलाव होतो. परमेश्वराची अनेक स्वरुपांत आपण उपासना करतो. गजानन म्हणजे विद्येचा देव, हनुमान म्हणजे शक्तीचा देव. रामचंद्र म्हणजे सत्याचा देव; परंतु स्वच्छतेच्या देवतेची मंदिरे अद्याप उघडली गेली नाहीत. ती सर्वत्र पाहिजेत. त्या मंदिरांतून स्वच्छतेचे माहात्म्य कळले पाहिजे. त्या मंदिरातून स्वच्छतेवर प्रवचने व कीर्तने झाली पाहिजेत. उद्योगमंदिर ! स्वच्छतामंदिर ! नव्या देवतांची नवीन मंदिरे नवभारतात उघडावी लागतील ! माझ्या खरजेवर अंतर्बाह्य उपचार सुरु झाले. रात्रीच्या वेळेला माझी मावशी हात बांधून हाताचे घाटाणे करी. त्या वेळेस मला फार वाईट वाटे. नखांनी खाजविता येऊ नये हाही त्यात एक हेतू असे. नखात फार विष असते. मावशी मला सारे समजावून सांगे. नखात घाण माजते, जेवतांना अन्न साचते, तेथे त्याचे विष होते. तेच पुन्हा पोटात जाते. मावशी मला स्वच्छता व आरोग्य यांचे धडे देत होती.