ते परीक्षक म्हणाले, 'तुमचा मुलगा मला आवडला. त्याने शिकावे, पुढे चांगले व्हावे, असे मला वाटते. त्याची जर शिकण्याची सोय नसेल तर मी त्याला घेऊन जातो. त्याच्या पुढील सर्व शिक्षणाची मी व्यवस्था करीन.'

वडील म्हणाले, 'मी विचार करुन काय ते कळवीन. आपल्या सहानुभूतीबद्दल आभारी आहे.' पुढे वडिलांनी नकार दिला. पुष्कळ लोक त्यांना हसले, 'चांगली सोन्यासारखी संधी आली होती ती गमावली.' असे आप्तेष्ट वडिलांना म्हणाले. वडिलांनी मला का बरे पाठविले नाही ? त्याचे कारण एकदा वडिलांचा व एका गृहस्थाचा पुढील संवाद झाला, त्यावरुन माझ्या ध्यानात आले.

एक गृहस्थ - भाऊराव ! तुम्ही चुकलात. श्यामच्या शिकण्याची कायमची चिंता नाहीशी झाली असती.

वडील - श्रीमंताकडे माझ्या मुलास पाठविण्यास मी भितो. तेथे काही हरवले तर त्यांच्याकडे असणा-या गरीब मुलावरच आळ यावयाचा. शिवाय श्यामबद्दल अजून तितकासा निर्धास्त मी नाही. एखाद्या वेळेस काही घ्यावयाचा. श्याम चोरटा म्हणून बोभाटा व्हावयाचा. घरची मंडळी दोषावर पांघरुण घालतील. परंतु परके थोडेच घालतील ? श्याम शिकून कीर्तिमीन नाही झाला तरी चालेल; परंतु चोर म्हणून कुप्रसिध्द तरी व्हावयास नको. पुन्हा श्रीमंताकडे अनेक मोह असतात. श्यामही त्या फंदात पडावयाचा. मी विचार करुनच 'नाही' असे उत्तर दिले. माझ्या मुलाने शिकावे, असे मला नाही का वाटत ? असेल त्याच्या नशिबी तर शिकेल.'

वडिलांचे शब्द ऐकून त्या वेळेस मला वाईट वाटले. 'खरे' परीक्षकांकडे जाता आले तर किती सुरेख होईल, असे मला वाटत होते. वडिलांना माझी खात्री नव्हती. मी कदाचित चोरी करीन, असे त्यांना वाटले. मला रडू आले. दागदागिने काढून टाकणारा श्याम, त्याने का चोरी केली असती ? कोणी  सांगावे ? पुढील जीवनात दोन-तीन वेळा त्याने चो-या केल्याही. त्या गोष्टी पुढे येतीलच. आज एवढेच लक्षात ठेवा की, सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे. स्वातंत्र्य व सत् संस्कृती हा राष्ट्राचा अलंकार आहे. समानता व प्रेमाचे ऐक्य निर्माण करणे यात माणुसकी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel