आमच्या वर्गातील प्रत्येकाने पंचवीस कव्हरे घेण्याचे ठरविले. मधल्या सुट्टीत आमच्या वर्गातील मुलांनी ६-७ शे कव्हरे खरेदी केली. कव्हरे विकणा-या शिक्षकांस वाटले की, तीन-तीन चार-चार विद्यार्थी मिळून एके ठिकाणी कव्हरे घेत असतील. कोणी कोणाचे मित्र असतात. कोणी एकमेकांचे नातलग असतात. ते भराभर कव्हरे देत गेले.
परंतु कव्हरे खुंटली व इतर वर्गातील मुले 'कव्हरे द्या' म्हणून आरडओरडा करु लागली. शेवटी मधली सुट्टी संपली. घंटा झाली. आपला विजय होणार या आनंदात आम्ही होतो; परंतु आमच्या वर्गनायकाने एकदम शत्रूच्या गोटातून एक बातमी आणली. तो शिक्षकांत हीच चर्चा चालली होती. ज्या मारकुटया मास्तरांनी ही योजना काढली होती ते तर लाल झाले होते ! ते तेथे सुचवीत होते की, 'मुलांजवळून सारी कव्हरे परत घ्या. अशी एक नोटीस काढा की, 'सहा कव्हरांपेक्षा जास्त कव्हरे ज्याने घेतली असतील त्याने ती हेडमास्तरांकडे आणून द्यावी व पैसे न्यावे.' दिडकीस तीन कव्हरे होती. दोन आण्यांची पंचवीस होती.
वर्गनायक येऊन एकदम म्हणाला, 'अशी नोटीस येणार आहे. कव्हरे परत करावी लागतील.'
एक व्यापा-याचा मुलगा म्हणाला, 'आम्ही भांडू. दोन आण्यांची एकदम घेतली तर एक कव्हर जास्त मिळते; ते आम्ही का गमवायचे ? उरलेली कव्हरे आम्हाला पुढच्या परीक्षेत उपयोगी पडतील.'
परंतु दुसरा एक मुलगा म्हणाला, 'आपण भराभरा आपल्या सर्व कव्हरांवर नावे घालून ठेवू या; म्हणजे मग ती कव्हरे कोणाला देणार ! देऊ म्हणतील तर नावे खोडावी लागतील. अशी खाडाखोड केलेली कव्हरे वापरणे म्हणजे सारखेपणा गेलाच. युनिफॉर्मिटी कोठे उरली ?'
शेवटी सर्वांनुमते हाच सल्ला योग्य ठरला. आम्ही भराभर सर्व कव्हरांवर शाईने नावे घालून ठेवली. अजून शिक्षक वर्गावर येत नाही. दुसरी घंटाही होऊन गेली होती.
इतक्यात एका गुप्त हेराने ताजी तार आणली की, 'आमच्या वर्गातील मुलांनी हा चावटपणा केला आहे, अशी बातमी हेडमास्तरांच्या कानावर बलभीमदारांनी घातली आहे. आपल्या वर्गात आता नोटीस घेऊन शिपाई येईल की, परीक्षेस लागतील त्यापेक्षा अधिक कव्हरे घेणारांनी ती जादा कव्हरे परत करावी म्हणून' आमच्या वाटाघाटी होताहेत इतक्यात शिक्षक आले. ते हसत होते व आम्हांसही हसे आवरेना. विजयी मुद्रा आमच्या तोंडावर होती, 'कशी जिरवली युनिफॉर्मिटीवाल्यांची !' असा अर्थ आमच्या मुद्रेतून निघत होता.
इतक्यात शिपाई आला. त्याच्या हातात नोटीस होती. कव्हरे परत करण्याबद्दलचीच होती. 'आम्ही तर सर, आपापली नावेसुध्दा सर्व कव्हरांवर घातली आहेत,' असे मुले सांगू लागली. शिक्षक वर्गनायकाला म्हणाले, 'तुम्ही जा व हेडमास्तरांस विचारुन या की, अशी नावे घातलेली कव्हरे आणावयाची का ?' आमचा वर्गनायक हेडमास्तरांकडे गेला. हेडमास्तर म्हणाले, 'काही हरकत नाही. नावे खोडून आम्ही ती कव्हरे बाकीच्या मुलांस देऊ.' वर्गनायक म्हणाला, 'पण युनिफॉर्मिटी बिघडेल !' हेडमास्तर त्याच्यावर जरा रागावले व म्हणाले, 'ते तुमच्यापेक्षा मला अधिक समजत आहे. तुमचा वर्ग म्हणजे टारगट मुलांचा वर्ग आहे. फारच शेफारलात तुम्ही. मुद्दाम काहीतरी विरुध्द करण्यात पुरुषार्थ नसतो.'
आमच्या जवळची कव्हरे गेली; परंतु त्या मारकुटया मास्तरांची आपण जिरवली, त्यांचा हेतू काही अनायासे सिध्दीस जाऊ दिला नाही, यातच आम्हाला आनंद वाटत होता. याच मारकुटया मास्तरांचे दुसरे शिक्षक मित्र होते. ते आमच्या वर्गावर एकदा एका शिक्षकांच्या गैरहजेरीत एक तास आले होते. वहीतून एक सुटा कागद घेऊन त्यावर एक लहानशी इंग्रजीत गोष्ट लिहा असे त्यांनी सांगितले. जाताना आमचे सर्वांचे कागद ते घेऊन गेले.