२४. मधल्या सुट्टीतील मेवे
मुलांना स्वतंत्रपणापेक्षा दुसरे काय प्रिय आहे ? झाडांवर चढावे, नदीमध्ये डुंबावे, डोंगरावर चढावे, जंगलात फिरावे, आवळे, बोरे, काजू, कै-या यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा. या जीवनात एक प्रकारचा किती आनंद आहे म्हणून सांगू ? त्या त्या ऋतूंतील फुलेफळे आधी देवाला वहावयाची व नंतर तो देवाचा प्रसाद मानवाने भक्षावयाचा. तुळशीचे लग्न आवळे-चिंचांशिवाय पूर्ण होत नसते. संक्रान्तीच्या सुगडात बोरे हवीत. शिवरात्रीला शंकराला कै-या वाहतात. आमच्या देवानांसुध्दा या चिंचाबोरांची आवळे-कै-यांची गोडी आहे. महाराष्ट्रातील देवाला महाराष्ट्रातील रानमेवा. महाराष्ट्रातील देवाला संत्री-मोसंबी फारशी आवडत नाहीत. देवतांच्या कोणत्याही पूजेत त्यांना स्थान नाही; परंतु आवळे, चिंचा-बोरांना आहे.
दापोलीच्या शाळेत असातना हा रुक्ष परंतु आम्हाला रसाळ वाटणारा मेवा आम्ही मधल्या सुट्टीतच भरपूर खात असू. आमच्या शाळेच्या भोवती कलमी आंब्याची कितीतरी झाडे होती ! परंतु त्याच्यावर रखवालदार असे. त्या रखवालदाराच्याही हातावर मी व माझे काही मित्र तुरी देत असू. शाळा सुटली म्हणजे रखवालदार निघून जात असे. परंतु मी व माझे काही मित्र वर्गातच काही वेळ थांबत असू. त्या रखवालदारावर आम्ही रखवाली ठेवीत असू. तो निघून गेला की, आमचा जथा बाहेर पडत असे. चांगले चाकू जवळ असत. आंब्यावरच्या कै-या बिनबोभाट पाडून त्या आम्ही खिशात ठेवून देत असू व रस्त्याने हळूहळू गप्पा मारीत कै-या खात खात आम्ही घरी जात असू.
परंतु मधल्या सुट्टीतील कार्यक्रम यापेक्षा आकर्षक होता. मधल्या सुट्टीत टेकडीवरुन आम्ही खाली जावयाचे. जवळच एक पडका बंगला होता. त्या बंगल्यात एके काळी राष्ट्रीय शाळा होती. त्या बंगल्याभोवती नाना प्रकारचे पुष्कळ वृक्ष होते. आम्र, बकुळ, नागचाफा, चिंच-विविध झाडे तेथे होती. बकुळीची फळे चांगली पिकेपर्यंत आम्हाला धीर धरवत नसे. आमच्या पोटात इतकी ऊब असे की कितीही कच्ची फळे असोत, ती येथे पिकून गेली असती. बकुळीची फळे जरा पांढुरली की आम्ही खावयास मागेपुढे पहात नसू.
झाडावर चढावयास भिणारी मुले खाली असत, काहींना चढण्याचा आळस असे.' आम्हाला वरुन टाकारे, आम्हाला टाका,' अशी प्रार्थना ही खालची मंडळी आम्हाला करीत असत. समोर भाग्य असूनही त्याच्यासाठी धडपड न करता भीक मागाणा-या त्या हतदैवी मुलांना आम्ही वरुन बिया मारीत असू. परंतु वरुन बियांचा मारा आम्ही सुरु केला की, खालची मंडळी दगडांचा मारा आमच्यावर सुरु करीत. या दगडांच्या मा-यापुढे आमचा टिकाव लागत नसे. परंतु आम्ही ऐटीने म्हणत असू, 'तुम्ही हातपाय तरी हालवू लागलात हे काय थोडे ! ऐदी गोळे पडलेले होतेत ! तर आम्हाला दगड मारण्यासाठी म्हणून का होईना; पण एकदाचे उठवलेत, यातच आमचा विजय आहे. आता आम्ही तुम्हाला बकुळे वरुन टाकतो ती तुम्ही झेला.'
अशा रीतीने आमची वरच्यांची व खालच्यांची तडजोड होई. आम्ही बकुळीची फळे खात असू. बकुळीची फुले वासासाठी घेत असू. त्या फुलांचे तुरे आम्ही करत असू. कोणी हे तुरे शिक्षकांस नेऊन देत, कोणी स्वत:च्या आत्मदेवास देत. बकुळीची झाडे उंच असतात व त्यांची छाया दिसावयास फार दाट नसते; परंतु चिंचेच्या झाडांची दाट छाया. झाडावर कोवळया कोवळया चिंचा झाल्यापासून आम्हा वानरांचा हल्ला सुरु व्हावयाचा. चिंचांची कोवळी कोवळी पानेही आम्हाला आवडत. करवंदीच्या कोवळया पानांच्या बोख्या, त्याही खावयास आम्ही मागेपुढे पहात नसू. चिंचांचा मेवा श्रावण-भाद्रपद महिन्यापासून जो सुरु होई तो चांगला पौष-माघ महिन्यापर्यंत पुरे.