१९. आत्याचे घर
मी आत्याकडे राहू लागलो. ही माझी आत्या माझ्या वडिलांची सर्वांत वडील बहीण. मला सात आत्या होत्या. या सर्व आत्या जर कधी लग्नमुंजीत घरी आल्या, माहेरी आल्या, तर त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी. हे आम्हाला समजत नसे. मग आम्ही त्या त्या आत्याच्या गावाच्या नावाने हाक मारीत असू. जालगावची आते, वेरळची आते, कापाची आते, गिम्होणची आते, मुरुडची आते, केळशीची आते, अशा हाका आम्ही मारीत असू.
आत्याचे घर कापदापोलीच्या अगदी एका टोकाला होते. त्या भागाला कोकंबे म्हणत. आत्याच्या घरापलीकडे पाच-सातच घरे होती. त्या घरानंतर मग कबरस्थान व मोठी आंबराई होती. कबरस्थानाजवळ आत्याचे घर होते. आत्याच्या घराशेजारी एक जरीमरीचे देऊळ होते. जरीमरीचे देऊळ म्हणजे मरीआईचे देऊळ. मरी आई ! किती अर्धगंभीर शब्द ! मरण म्हणजे माताच होय. माझ्या आवडत्या अमेरिकन व्हिटमन कवीने मृत्यूवर एक फार सुंदर कविता लिहिली आहे. त्या कवितेत तो म्हणतो:-
"ये काळये सावळये मरणमाई ये. खरोखरच तू माता आहेस. थकलेल्या मुलास माता हळूच पाठीमागून घेऊन उचलते, त्याप्रमाणे मृत्युमाते, थकलेल्या जीवांना तू उचलून जवळ घेतेस व पुन्हा जीवनरस पाजतेस माते, लोकांना तुझी भीती वाटते. वेडे आहेत ते. मी तुझ्यावर प्रेम करतो.'
"आजपर्यंत मरणाची गाणी हृदय भरुन घेऊन कोणीच गायली नाहीत का ? मी आनंदाने मरणाची गाणी गाईन. मरणाचे स्वागत करीन.' अशा अर्थाच्या सुंदर कविता व्हिटमनने लिहिलेल्या आहेत. रवींद्रनाथांनी तर फारच सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'आई मुलाला रित्या स्तनातून दुस-या भरलेल्या स्तनाला लावण्यासाठी उचलते, तसेच मरण होय. जीवनाने भरलेल्या एका स्तनाला रिते केले. आईच्या दुस-या स्तनाला तोंड लावण्यासाठी आपण वळतो; हा जो मधला वळण्याचा क्षण त्यालाच मृत्यू म्हणतात. मृत्यू म्हणजे मृत्यू नव्हेच. मृत्यू म्हणजेही जीवनच आहे. वेदात ईश्वराचे वर्णन करताना-
यस्यच्छायामृतं यस्य मृत्यु: ।
असे भव्य वर्णन ऋषीने केले आहे. जीवन व मरण दोन्ही ईश्वराच्या छाया आहेत. उपनिषदात 'प्राणो मृत्यु:' म्हणजे मृत्यूसुध्दा प्राणच आहे,' मृत्यू म्हणजे जीवनच होय,' असे लिहिले आहे.
माझ्या आत्याच्या घराशेजारी मरणाचे स्मरण रहात असे. श्री एकनाथ नेहमी म्हणत की, मरणाचे स्मरण मनुष्याने सदैव ठेविले तर तो चांगल्याच रीतीने वागेल. 'उद्या तू मरणार आहेस,' असे जर एखाद्याला सांगितले तर तो उरलेला जीवनाचा काळ कशा रीतीने दवडील ? तो सर्वांशी गोड बोलेल, केलेल्या अपराधाची क्षमा मागेल; कोणाजवळ भांडणार नाही, कोणावर रागावणार, रुसणार नाही. त्याचे डोळे प्रेमळ होतील. ओठ गोड होतील. हृदय हळुवार होईल. बुध्दी धीरगंभीर होईल. 'दोन दिवस जगात रहावयाचे आहे. हसावे, खेळावे, प्रेम लुटावे, आनंद निर्माण करावा.' असे माणसाने म्हटले पाहिजे. परंतु जगात याच्या उलट कारभार हजारो वर्षे चालला आहे व म्हणून तुकाराम महाराज दु:खाने म्हणाले,