लहानपणापासून मुलांना अपमानाची चीड येते; आपले व्यक्तिमत्त्व तुच्छ मानिले जाऊ नये, असे त्यांना वाटत असते. इतरांप्रमाणे जेवताना मुलाला सबंध पापड न वाढता जर तुकडा वाढला तर त्याला चीड येते; त्याला राग येतो. इतरांना भाजी वाढून त्या पोराला कशाला, असे म्हणून त्याला जर न वाढली तर तो रडू लागतो. पंक्तीमध्ये आपला अपमान मुद्दाम जाणून बुजून हे सारे का करतात, हे त्या अकपट मुलाला समजत नाही. तुम्ही बाहेर जाताना त्याला न न्याल तर ते मूल तडफडते. मला महत्त्व आहे. मला क्षुद्र लेखू नका, असे बालब्रम्ह बाहू उभारुन पुकारुन सर्वदा सांगत असते. परंतु त्या बालब्रम्हाला घरी, दारी, सर्वत्र धिक्कारण्यात येते. पायाखाली तुडविण्यात येते. आणि अशा या कृतीला शिक्षण हे पवित्र नाव देण्यात येत असते !

खरा शिक्षक होता होईतो मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही. त्यांना दमदाटी देणार नाही. त्यांच्यावर दातओठ खाऊन धावणार नाही. पुस्तक फेकून मारणार नाही. खरा शिक्षक मुलांना भ्याड बनविणार नाही. मलिन होऊ देणार नाही. खरा शिक्षक हसत-खेळत शिकवील. तो मुलांच्या आत्म्याचे वैभव ओळखील व त्यावर दृष्टी ठेवून सदैव वागेल, बोलेल, चालेल. मुले म्हणजे राष्ट्राचे खरेखुरे भांडवल. मुले म्हणजे उद्याचे भव्य भविष्य. मुले म्हणजे देवाघरचा संदेश आणणारे प्रेषित. मुले म्हणजे मोदमूर्ती आनंदाची माहेरघरे. मुले म्हणजे चैतन्याचे कोंब. स्फूर्तीच्या कळया. मुले म्हणजे सुगंधी फुले पाहणा-या सुंदर कळया. देवाला सर्वात जास्त प्रिय कोणी असेल तर ती मुले. देवाच्या घरी जावयाचे असेल तर मूल होऊन जावे लागते. या द्वेषमत्सराने भरलेल्या संसारात जर अमृताचा अंश कोठे असेल तर तो मुले होत. मुलाजवळ राहण्याची, हसण्याखेळण्याची, बोलण्याचालण्याची संधी येणे म्हणजे सोन्याची संधी. जो मुलांशी सहकार्य करतो तो देवाशी सहकार्य करतो. जो मुलांना मारतो, रडवितो, तो प्रभूला मारतो व रडवितो.

परंतु अशा पवित्र भावनेने रंगलेले, हया थोर दृष्टीने बघणारे शिक्षक आपणास आढळून येतील ? 'गध्या, ए बैला, ए शुंभा, ए अडणीवरच्या, ए मूर्खा, ए टोणग्या, अशा शेलक्या संबोधनांनीच मुलांची पावलोपावली संभावना घरी, दारी, शाळेत होत असते. वर्षानुवर्षे ज्या मुलांच्या कानावर वरील शिव्याशापांचा वर्षाव होत असेल ती मुले गध्दे व बैल, मूर्ख टोणगी न झाली तरच आश्चर्य.

शिक्षकांनी 'बावळया' अशी हाक मारली म्हणजे मुलांना साहजिक गंमत वाटे. मला 'बावळया म्हटलेले ऐकून कोणाला येथे वाईट असेल का वाटत ? माझ्याबद्दल आपलेपणा बाळगणारा या वर्गात कोणी नाही ? श्यामसाठी रडेल, श्यामसाठी झुरेल असे कोणी आहे का येथे ? मी पहात असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel