प्रथम प्रथम वाडयातील मुले माझी थट्टा करीत असत. 'श्यामला बोलू नका रे !' 'श्याम नाही तर पळून जाईल व आपल्यावर येईल रे !' असे मला पाहून बोलत असत. मला खेळावयास घेत नसत. कोणी जर म्हणाले, 'श्यामला खेळायला घ्या. तो पहा तेथे उभा आहे.' तर दुसरा कोणी म्हणे, 'नको रे बाप्पा ! विटी लागली तर श्याम साता-यास निघून जाईल.' परंतु हळूहळू ही थट्टामस्करी अस्तास गेली. वातावरण निर्मळ झाले. मी मुलांत मिसळू लागलो.
मी अभ्यासही चांगला करु लागलो. मामांनाही समाधान वाटले. श्याम पळून आला पण पूर्वीपेक्षा सुधारला असे ते आपल्या मित्राजवळ म्हणाले. अरबी भाषेतील सुरस कथा वगैरे गोष्टींची पुस्तकेही वाचावयास मिळाली. दुपारच्या वेळेस गप्पा मारणा-या वाडयातील बायकांत मी भारतभागवतातील भक्तिविजय, जैमिनी अश्वमेघातील गोष्टी सांगू लागलो. बायका माझे कौतुक करीत. 'श्याम, तुला किती रे माहिती ! वाचलेस तरी एवढे कोठे !' असे त्या मला विचारीत. एखाद्या वेळेस भक्तिविजयातील पाठ केलेले धावे मी म्हणत असे.
त्या मूळच्या ओव्यात मी माझ्या ओव्याही भरीस घालीत असे.
द्रौपदीलज्जानिवारणा । पांडवरक्षका मनमोहना
गोपीजनमा नसरंजना । पावे आता सत्वर । ।
गजेन्द्राचि ऐकून करुणा । सत्वर पावलासी जगज्जीवना ।
प्रल्हादरक्षका मनमोहना । पावे आता सत्वर । ।
अनाथनाथ रुक्मिणीवरा । भीमातीरवासविहारा
जगद्वंद्या जगदुध्दारा । पावे आता सत्वर । ।
असे ते गोड धावे मी म्हणत असे. वाडयातील म्हाता-या देवदेव करणा-या बायकांना हे सारे आवडे.
श्यामचे महत्त्व वाढू लागले. तो सर्वांस प्रिय वाटू लागला. आमच्या वाडयांतील मालकाच्या घरात स्त्रीसाम्राज्य होते. निरनिराळया बायकांचे जमाखर्च तोंडी असत. त्या सावका-या करीत. श्यामजवळ हिशेबाची पंचराशिके, सरळव्याजाची उदाहरणे यावयाची. दुपारच्या वेळेस मी झोपाळयावर बसलो म्हणजे ही कामे मला करावी लागत.
परंतु त्या स्त्रीसाम्राज्यातील एका सासुरवासणीचे जे काम मला करावे लागे ते सर्वांत पवित्र काम होते. तिचे तेथे हाल होत. माहेरी ती सर्वांची लाडकी होती. माहेरी तिचे आईबाप नव्हते. तिच्या आजोबांनी तिला वाढविले होते, लहानाचे मोठे केले होते. ती मला म्हणावयाची, 'श्याम ! घडीघडी मला माहेरची आठवण येते. माझे आजोबा मला माणकी म्हणतात. हिरी म्हणतात, सोनी म्हणतात. माझ्या माणकीला कोणत्या नावाने तरी हाक मारु, असे ते हसत रडत विचारतात. मी का श्याम आता लहान आहे ! अठरा वर्षाची झाल्ये; तरीही माहेरी गेले म्हणजे आजोबा म्हणतात, 'माणक्ये ! त्या रंगीत पाटावर बस हो. तू कितीही मोठी झालीस, उद्या चार मुलाबाळांची आई झालीस तरी मला तू लहानच वाटणार. बस त्या पाटावर. आजोबांजवळ का लाजायचे ? वेडी कुठली.' श्याम आजोबांचे माझ्यावर किती प्रेम ! परंतु येथे नरक आहे रे दुसरा ! खरोखरच वनवास आहे हा ! येथे बोलू कोणाजवळ, सांगू कोणाजवळ ? एक तू येथे आहेस श्याम ! मला भाऊ नाही. तूच येथला भाऊ. बोलावयाला येऊन जाऊन तूच एक आहेस.'