मी खिडकीतून पुन्हा बाहेर पडू लागलो. जरा जरा झिमझिम पाऊस पडत होता. ते देवाचे अघमर्षण मी माझ्या मस्तकावर घेत होतो. नेरळ स्टेशन आले. एक तरुण माझ्या डब्यात शिरला. त्याने इकडे तिकडे जागा पाहिली. माझ्याजवळ जागा होती. तो माझ्या जवळ येऊन बसला.
तो माझ्याकडे पाही. मी त्याच्याकडे बघे. आमची ओळख ना देख; परंतु आम्हाला एकमेकांकडे पहावे, असेच वाटत होते. बोलण्याचे मात्र धैर्य नव्हते. मी पुन्हा बाहेर पाहू लागलो. मध्येच त्याच्याकडे बघे व तो गोड हसे. इतक्यात माझ्या डोळयांत काही तरी गेले. मी डोळा चोळू लागलो, डोळयातील कण खुपे. फार त्रास होऊ लागला. मी माझ्या सद-याचे टोक तोंडात वाफवून डोळा शेकवू लागलो. छे ! डोळा खुपेच तरी.
तो शेजारचा तरुण जवळ आला. 'थांब बाळ, चोळू नको. मी माझ्या रुमालाने हळूच काढतो बघ !' असे म्हणून त्याने माझे डोके धरले. हळूच रुमालाचे टोक डोळयात फिरवून त्याने तो कण बाहेर काढला. तो कण त्याने मला दाखविला. कण निघाल्याची खात्री झाली. डोळा स्वच्छ झाला. धुऊन निघाला. चांगला झाला.
मी त्या तरुणाकडे कृतज्ञतेने व प्रेमाने पाहू लागलो. त्या प्रेमसेवेने आमच्या दोघांमध्ये आड असलेले अहंकाराचे पर्वत कोसळून पडले. आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. विशेषत: तो तरुणच माझी चौकशी करीत होता. सहानुभूतीने ऐकणारा मिळताच मुळी मानवी मने मोकळी होतात. त्या तरुणाने आपला फराळाचा डबा काढला. आम्ही फराळ करु लागलो.
"श्याम ! लाजू नकोस, घे तुला भूक लागली असेल. दहा वाजता एकदा तू जेवलेला आहेस. मुंबईला मामांकडे पोहोचेपर्यंत उशीर होईल. खा. मला तर ठाण्याला उतरावयाचे आहे.'
"तुम्हाला माझे नाव काय माहीत ? मी अजून तर सांगितले नाही.' मी आश्चर्याने विचारले.
"ते बघ पुस्तकावर आहे.' तो म्हणाला.
"ते इंग्रजी नाव मीच घातले आहे.' मी म्हटले.
"तुझे अक्षर चांगले आहे व नावही गोड आहे.' तो म्हणाला.
"तुम्हाला श्याम नाव आवडते ?' मी विचारले.
"हो.' तो म्हणाला.
"मला नाही आवडत. मला रामाचे नाव आवडते. रामाचेच नाव गोड आहे. सारे भक्त राम राम म्हणत.' मी म्हटले.