वडिलांनी त्या वेळेस जे सांगितले ते आज शतपटीने मला स्मरत आहे. हे युग म्हणजे जाहिरातीचे युग आहे. करणे थोडे परंतु त्याची स्तुतिस्तोत्रेच फार. सृष्टीची कामे मुकाटयाने चाललेली असतात. एकेक कळी महिने महिने मुकाटयाने फुलत असते. एके दिवशी सकाळी झाडावर फूल फुललेले दिसते; परंतु त्याच्या पाठीमागे केवढी तपश्चर्या असते ! झाडाची मुळे रात्रंदिवस खाली जमिनीच्या पोटात ओलावा धुंडाळण्यासाठी किती खटपट करीत असतात ! ते कोणाला माहीत असते ?
मी त्या दिवसानंतर जप करीत असे; परंतु पुन्हा वडिलांना कधी सांगितले नाही. १०८ मण्यांची माळही मग हातात घेत नसे. कारण माळेने मनात अहंकार उत्पन्न होई. देवाला मोजून मापून काय द्यावयाचे ? आईचे स्मरण का दिवसातून आठ वेळा असे ठरवून करावयाचे असते ? आई सतत हृदयात असावी. तिचे स्मरण होताच डोळयांत पाणी आले म्हणजे पुरे.
देवाचे एकदा स्मरण केले तरी ते पुष्कळ आहे व सहस्त्र वेळा केले तरी ते कमी आहे. त्या स्मरणाच्या पाठीमागे जो जिव्हाळा असेल त्यावर त्या स्मरणाचे मोल अवलंबून राहील.
चौथ्या इयत्तेतील एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी आमचे वर्गशिक्षक आले नव्हते. दुस-या वर्गाचे शिक्षक आमच्यावर देखरेख करीत होते. जागेवरुन उठू नका, असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितले होते. मुलांना असे जागचे जागी डांबून ठेवणे याहून घोर अपराध दुसरा कोणताच नसेल. शिक्षक आले नसतील तर मुलांना खेळायला सांगावे. नाही तरी घरी बसवून त्यांचा थोडाच विकास होणार आहे !
मी माझ्या वर्गातील मुलांना भक्तिविजयातील एक गोष्ट त्या वेळेस सांगत होतो. मुले माझ्याभोवती जमली होती. माझी गोष्ट संपली. मी मुलांना म्हटले, 'आता जागेवर बसा. मी प्रत्येकाकडून रामराम म्हणवून घेतो.' मुले जागेवर बसली. मी एकेका मुलाजवळून रामराम म्हणवून घेत होतो. प्रत्येकाने दहा दहा वेळा म्हणावयाचे.
परंतु इतक्यात तिसरीवरचे शिक्षक छडी घेऊन आले. आम्ही जागा सोडल्या होत्या. मी माझ्या जागेवर नव्हतो. मुले भराभर जागेवर बसली. मेंढरे शांत झाली. मी एका मुलाच्या जवळच बसलो. ती माझी जागा नव्हती. ते शिक्षक मला मध्येच घुसलेला पाहून म्हणाले,
'काय रे श्याम ? ही तुझी का जागा ?'
मी भीत भीत म्हटले, 'नाही.'
'मग जागा सोडून येथे का आलास ? आरडाओरडा करायला हवा. होय ना ? जागा सोडू नका, म्हणून सांगितले होते की नाही ? का सोडलीस जागा ? येथे काय करीत होतास ?'
मी काही बोललो नाही.
शिक्षक म्हणाले, 'हात पुढे कर.'
मी म्हटले, 'काही गडबड नव्हतो करीत.'