श्याम अलीकडे कायमचाच आजारी होता. तो अशक्त होत चालला होता. त्याच्या स्नेह्यासोबत्यांना, त्याच्या सहकारी मित्रांना त्याबद्दल भीती वाटे; परंतु श्याम त्यांच्या चिंतेला हसे व 'वेडे आहात तुम्ही सारे !' असे म्हणे. श्याम सकाळी-सायंकाळी थोडे हिंडे, फिरे. विशेष दगदग व यातायात त्याच्याने होत नसे. आश्रमाच्या अंगणातील एका निंबाच्या झाडाखाली आरामखुर्ची टाकून तो पडून राही. तेथून गावची नदी नीट दिसत असे. नदी म्हणजे देवाची झुळझुळ वाहणार दया. नदी म्हणजे गावची आई, असे श्याम नेहमी म्हणे.
नदी म्हणजे कर्मयोगाची जिवंत मूर्ती. तिला आळस माहीत नाही, विश्रांती ठावी नाही, सतत जीवन असेतो ध्येयाकडे दृष्टी ठेवून वाहणे, हेच तिला ठावे. आजूबाजूच्या सृष्टीला हसवीत, फुलवीत, समृध्द करीत ती सगळीकडे धाव घेत असते.
फेडीत जगाचे पापताप । पोषीत तीरींचे पादप ।
जाय जैसे आप । जान्हवीचे ।।
नदी वाकडी गेली, काटयाकुटयातून गेली, उच्छृंखलपणाने कडयावरुन उडी घेऊ लागली तरी ती ध्येयाकडेच जात असते. समुद्राला भेटण्यासाठीच तिचे सारे उद्योग. नदी म्हणजे अमर आशा. नदी म्हणजे आशागीत. मनुष्य वाकडया मार्गाने गेला, रानात शिरला तरी शेवटी एक दिवस तो मंगलाकडेच येईल, असे नदी सांगत असते. सारे प्रवाह शेवटी अनंत सागरालाच भेटणार. सारे मानवी समाज शेवटी अनंत कल्याणाकडे, अपार आनंदाकडे, निरतिशय सौंदर्याकडेच जाणार, यात शंका नाही.
आई मुलाला आंघोळ घालते, त्याचे हागमूत काढते, त्याला स्वच्छ राखते. नदी सा-या गावाला स्वच्छ ठेवते. गावाने केलेली घाण ही आपोमाता दूर करिते. लोक नदीचे जसे काही सत्त्व पहात असतात. सर्व व्यवहार या मातेच्या अंगावर ते करितात, तरीही माता ते सारे सहन करिते. गावातील गाईगुरे, म्हशी, बैल यांनाही ती स्वच्छ राखते. तिला ना कोणी हीन, ना कोणी तुच्छ. सारी तिची लेकरे.
श्याम नदीचा भक्त होता. तो आजारी असला तरी नदीकडे पाहून तो आजारीपणा विसरे. खुर्चीत पडल्यापडल्या गाणी गुणगुणे. लहान मुले आली तर त्यांना गोष्टी सांगे, चांगली गीते शिकवी.
श्यामच्या आश्रमातील मित्र एके दिवशी आपापसांत बोलत होते. श्याम त्या वेळेस तेथे नव्हता. गोविंदा म्हणाला, 'श्यामच्या आईला आठवणी किती सुंदर होत्या. राहून राहून त्यांची आठवण येते.' नामदेव म्हणाला, 'त्या छापून काढल्या तर हाहा म्हणता खपल्या.' रघुनाथ म्हणाला, 'तीन महिन्यांत सारी आवृत्ती संपली. पुन्हा ना तिचा गाजावाजा, ना तिची प्रसिध्दीपत्रे, ना जाहिराती. 'राजा म्हणाला, 'किती तरी लोकांची श्यामला अभिनंदनपर पत्रे आली.' एकाने लिहिले, 'श्यामच्या आईची पारायणे आमच्या घरात आम्ही करीत आहोत. पोथीचा अध्याय वाचावा त्याप्रमाणे एकेक प्रकरण रोज रात्री घरातील सर्व मंडळी जमून आम्ही वाचतो.' दुस-याने लिहिले, 'ही आमची बालबोध गोष्टीरुप गीताच आहे.' एका मुलीने लिहिले, 'हे पुस्तक लिहून तुम्ही आम्हांवर फार उपकार केले आहेत.'