११. थोर मनाचा मजूर शिवराम
मुले जे पहातात ते करु लागतात. क्रिकेटचे सामने जोरात सुरु असले म्हणजे सर्वत्र मुले घरी, दारी, रस्त्यांत क्रिकेट खेळतात व क्रिकेटसंबंधीच बोलतात. मुलांच्य खेळाचे ऋतू असतात. कधी क्रिकेटचा मोसम येतो; तर कधी खो खो, आटयापाटयांचा येतो. कधी विटीदांडूला बहर येतो; तर कधी सूरपारंब्या सुरु होतात. मुलांच्या खेळातील ऋतुमान व हवामान शाळेतील भूगोल विषयात शिकविण्यासारखे आहे.
नाही फार पाऊस, नाही फार ऊन, अशा हवेत क्रिकेट सुरु होतो. भाद्रपद-आश्विन महिने क्रिकेटचे असतात; तर कार्तिक-मार्गशीर्ष भोव-याचे असतात. माघ-फाल्गुन महिने आले की, रात्रीच्या स्वच्छ पिठासारख्या चांदण्यात आटयापाटया, खो-खो सुरु होतात. चैत्र-वैशाखाच्या उन्हाळयात झाडांच्या शीतल फांद्यावरच्या सूरपारंब्या सुरु होतात. किंवा निरभ्र आकाशात पतंग उडवितात. परंतु मुले स्वयंप्रभू असल्यामुळे वाटेल तो खेळ वाटेल तेव्हाही खेळू शकतात व खेळतातही.
मी पुण्यास क्रिकेट पाहू लागलो. कोकणात चेंडू-लगो-यांचा खेळ आम्ही खेळत असू. परंतु हा काठया-फळयांचा डाव कोकणात फारसा त्या वेळेस नव्हता व खेडयात तो अजूनही माहीत नाही. तालुक्याच्या गावापेक्षा अधिक उडी विदेशी खेळांनी अद्याप मारली नाही. इंग्रजी शाळा आली की, तिच्या पाठोपाठ चेंडू आलाच.
आमच्या वाडयात पेन्शनरांचे एक बि-हाड होते. त्यांचे दोघे-तिघे नातू होते. त्यांना क्रिकेटचे सारे सामान दिले होते. त्यांच्याजवळ चेंडू होते. फळया होत्या, काठया होत्या, हातमोजे होते, पायबंद होते, सर्व काही होते. रोज सायंकाळी क्रिकेटच्या सामानाचा भारा घेऊन ती मैदानावर खेळावयास जात.
मला त्यांचा हेवा वाटे. क्रिकेट खेळावा, असे मला वाटे; परंतु कोणाबरोबर मी खेळणार ? मी शाळेत जात नसे. त्यामुळे शाळेतील सोबती मला नव्हते. शिवाय क्रिकेट कशाने खेळावयाचा ? जवळ ना चेंडू ना काठी ! आपली उणीव कशाने भरुन काढावयाची, याचा मी तीव्रतेने विचार करु लागलो.
शेवटी बेलफळाचा चेंडू करावयाचा असे मी ठरविले. लाकडाच्या स्टंपा करावयाच्या हे तर केव्हाच ध्यानात येऊन गेले होते. मी एकटाच लाकडे भिंतीला उभी करीत असे व बेलफळाच्या चेंडूने त्या लाकडांना टिपण्याचा प्रयत्न करीत असे. धावत येऊन वाटोळा हात फिरवून मी बेलफळ फेकीत असे. अशा रीतीने माझा एकटयाचा खेळ सुरु झाला. परंतु उपनिषदातील ब्रह्म्याच्या चिंतेप्रमाणे 'एको हं बहु स्याम' मी एकटा आहे. मी वाढेन केव्हा, आम्ही दोन केव्हा होऊ, असे मनात येई. शेवटी जनार्दन मित्र माझ्या हाकेसरशी धावला.
जनार्दन व मी क्रिकेटचा अभ्यास मिळालेल्या साधनसामग्रीने करु लागलो. देवाची पूजा करताना जे नसेल ते अक्षता देऊन भरुन काढण्यास मी शिकलोच होतो. 'महावस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि, तांबूलार्थे अक्षतान् समर्पयामि' असे मी लहानपणी म्हणावयाचा. त्या प्रमाणे 'स्टम्पार्थे इन्धनं समर्पयामि,' असे मी म्हणू लागलो. जळणाची लाकडे आमच्या स्टंपा होत्या. रोज नवीन नवीन स्टंपा. आदल्या दिवशीच्या उन्हात तापलेल्या स्टंपा दुस-या दिवशी चुलीत छान पेटत. जनार्दनाने देवदारुच्या फळीची एक बॅट बनविली होती; परंतु बेलफळाच्या पुढे ती बॅट टिकेना. शंकराला देवदारु वृक्ष आवडतात व बेलाची झाडेही आवडतात. अशा दोन्ही झाडांचा समन्वय आमच्या खेळात आम्ही केला होता; परंतु देवदारुच्या फळया लवकर फुटत आणि बेलफळेही फार टिकत नसत.