राजा म्हणाला, 'पुष्कळ आहे व तेच आम्ही मागत आहोत. श्याम ! आईच्या आठवणी तू सांगितल्यास. आमच्याच हृदयांत त्या अमर झाल्या आहेत. असे नाही तर, शेकडो लोकांच्या जीवनांत त्या अमर झाल्या आहेत. तुझ्या आईच्या आठवणी सांगितल्यास, त्याप्रमाणेच इतरही ज्या आठवणी असतील त्या आम्हांला सांग.'
राम म्हणाला, 'भावाबहिणींच्या, आप्तेष्टांच्या, मित्रांच्या, निरनिराळया शाळांतील शिक्षकांसंबंधीच्या तुझ्या शेकडो आठवणी असतील. तुझ्या आठवणी लहान लहान असतील, परंतु त्या आठवणी सांगताना त्यांच्याभोवती जे वातावरण तू उत्पन्न करतोस ते किती रसमय असते म्हणून सांगू !'
नामदेव म्हणाला, 'आठवणी सांगता सांगता सा-या भारताचा जणू इतिहासच तू सांगू लागतोस. भारतमाता तुझ्या रोमारोमांत शिरलेली आहे. आम्हांला समाज, धर्म, इतिहास, शिक्षण, वाड्.मय, आरोग्य, आहारविहार इ.शेकडो गोष्टीसंबंधीचे ज्ञान त्यामुळे होते. ते ज्ञान गोष्टीच्या ओघात सहज येऊन जाते. मुद्दाम सांगू म्हटल्याने थोडेच सांगता येणार आहे ? श्याम, तू गेलास तर आम्हांला कोण सांगेल ? कोण हसवील ? कोण रडवील ?'
श्याम म्हणाला, 'मी येथून जाणार नाही. तुम्हांला सोडून मी कोठे जाऊ ? माझे ते सारे विचार मी कधीच सोडून दिले.'
प्रल्हाद म्हणाला, 'तुमच्या रुग्ण शरीरामुळे तुम्ही दुसरीकडे कोठे आता जाणार नाही. परंतु कदाचित कायमचे देवाघरी लौकर गेलात तर ?
श्याम म्हणाला, 'त्याची भीती कशाला ? मरण म्हणजे मेवा. जीवनाला मरणाचे फळ व मरणाला जीवनाचे कोंब फुटतात. मला तर मृत्यू म्हणजे देवाकडे जाण्याचे द्वार वाटते. एखाद्या मोठया राजवाडयाला अनेक प्रवेशद्वारे असतात. त्याप्रमाणे मृत्यूची अनंत प्रवेशद्वारे ओलांडीत ओलांडीत सिंहासनावर बसलेल्या त्या राजराजेश्वराचे दर्शन घ्यावे लागते.'
जन्ममरणाची पाऊले टाकीत
येतो मी धावत भेटावया ।। जन्म. ।।
श्याम तो गोड चरण म्हणत राहिला. सारे स्तब्ध राहिले.
गोविंदा म्हणाला, 'श्याम ! तुझ्या प्रकृतीमुळे आम्हांस असे वाटते. मरणाला आम्ही भीत नाही. परंतु तो दिवस येण्यापूर्वी तुझ्याजवळचे सारे आम्हांला दे. तुला त्रास होईल कदाचित, कदाचित बरेही वाटेल. कारण गतायुष्यातील अनेक प्रसंगांकडे पाहताना आपण अनासक्त रीतीने पाहतो व आनंद अनुभवतो. गतायुष्यातील सारे गोडच वाटू लागते. सांगशील का ? प्रत्यही थोडथोडे सांगत जा.'