तुळशीबागेतील रामाला मी मधून मधून जात असे. कधी मंडईत गेलो तर वाटेत रामाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय मी सहसा राहात नसे. तुळशीबागेतील मूर्ती खरोखरच नयन मनोहर आहे. त्या मूर्तीकडे किती पाहिले तरी तृप्ती होत नाही. हे ध्यानसौंदर्य पीतच राहावे असे वाटे.
पुन: पुन: लोचन पाहताती
परंतु ते तृप्त कधी न होती ।
असाच अनुभव तुळशीबागेतील सहृदय मनुष्याला येतो. कोणी म्हणतात की, तुळशीबागेतील मूर्तीपेक्षा रास्त्यांच्या रामाच्या मूर्तीचे ध्यान अधिक सुकुमार व मोहक आहे; परंतु मला तरी तुळशीबागेतील रामच गोड वाटतो.
कार्तिकी एकादशीला मंदिरात खूप गर्दी होती. मी एकटाच स्वतंत्रपणे गेलो होतो. दादा त्या वेळेस कोकणात गेला होता. त्याच्या शाळेला परीक्षेची व दिवाळीची सुट्टी होती. मामांनी मला दोन आणे दिले होते. या दोन आण्यांचे मी काय करु, ते मला समजेना. ते दोन आणे खेळवीत मी रामाच्या दर्शनास निघालो. मला स्वत:ला दोन आणे मिळाले. दोन आण्यांचा त्या दिवशी राजा होतो. सबंध आठ पैसे, सबंध चोवीस पया, मला माझ्या सुखासाठी त्या दिवशी खर्च करण्यास परवानगी होती. हेच घे, तेच घे, असे माझ्यावर नियंत्रण घालावयास कोणी नव्हते. माझा मी मुखत्यार होतो. त्या दोन आण्यांचे अंदाजपत्रक मी ठरवीत होतो. विचार करीत करीत देवळाच्या आवारात मी शिरलो. लोकांची अपरंपार गर्दी तेथे लोटली होती. देवाचे दर्शन घेणे दुष्कर होते. लहान मुलांना कोण पुढे जाऊ देतो ? हिंदुस्थानात सर्वत्रच मुलांची पायमल्ली होते. मंदिरातही ती का होणार नाही ? मी गर्दीत घुसलो. मीही धक्काबुक्की, दंडादंडी, कोपराकोपरी करु लागलो. शेवटी रामाचे दर्शन मी घेतले. एक क्षणभरच. तेथे दुसरा क्षण उभे रहावयास अवकाश नसे. मागून रेटारेटी व लोटालोटी सुरु असे.
देवाचे दर्शन घेऊन मी बाजार पाहू लागलो. दोन आण्यांचे काय घ्यावे, ते मला समजेना. एक दिडकी तर रामासमोर ठेवून मोकळा झालो. उरलेल्या पैशांचे काय करावे ? एखादे चांगलेले पुस्तक मिळेल का ते मी पाहू लागलो; परंतु तुळशीबागेत कोणते पुस्तक असणार ? तेथे रामरक्षा, व्यंकटेशस्तोत्र, शनिमाहात्म्य, हरिपाठाचे अभंग हीच पुस्तके असावयाची. माझ्या पैशांत बसेल असे व मी न वाचलेले तेथे शनिमाहात्म्य होते. शनिमाहात्म्य घ्यावयाचे मी ठरविले. दीड आण्याचे शनिमाहात्म्य व एका दिडकीचे एका रामाचे चित्र याप्रमाणे दोन वस्तू मी खरेदी केल्या.
कोकणात मी पुष्कळ पोथ्या वाचल्या होत्या. रामविजय, पांडवप्रताप, रामाश्वमेध, जैमिनीअश्वमेध, काशीखंड, मनश्चंद्रबोध, गणेशपुराण, कथासारामृत, शिवलीलामृत हे मोठे ग्रंथ मी वाचले होते. व्यंकटेशस्तोत्रही मी वाचले होते. शनिमाहात्म्य मी कधीही वाचले नव्हते. एकदाचे विकत घेतले. रस्त्यातून वाचीत वाचीत मी चाललो होतो. घरी आलो व सारे शनिमाहात्म्य मी वाचून काढले. त्यातील गोष्टी मला आवडल्या. माझ्याजवळ शनिमाहात्म्य आहे. हे कळल्यापासून वाडयातील बायका मला ते शनिवारी वाचावयास सांगत व मी वाचीत असे.
शनिमाहात्म्य पुढे माझे कोठे तरी हरवले. परंतु ते रामाचे चित्र माझ्याजवळ सात वर्षे होते. चित्राचे तुकडे झाले होते तरी ते मी तसेच माझ्याजवळ ठेविले होते.