१५. पुनश्च पलायन
पुण्याला माझे गाडे नीट चालले होते. मी चांगला अभ्यास करीत होतो. वाडयामध्ये महिलामंडळात मी आवडता झालो होतो. माझे मनही शांत होते. ज्याप्रमाणे आरंभी आरंभी पुण्यास माझा जीव रमत नसे, कोठे तरी जंगलात, रानावनात येऊन पडलो, असे वाटत असे त्याप्रमाणे आता वाटत नाहीसे झाले होते; परंतु शांततेचा अकस्मान भंग होऊन वादळ येते तसेच माझ्याही बाबतीत झाले. वरुन शांत दिसणा-या पृथ्वीच्या पोटात भयंकर उलथापालथ होत असते व एक दिवस अकस्मात भूकंपाच्या रुपाने वा ज्वालामुखीच्या रुपाने ती प्रकट होते; त्याप्रमाणेच वरुन सुरळीतपणे चालणा-या माझ्या जीवनाच्या आतील बाजूस मला न कळत काहीतरी असमाधान जमा होत होते. अशांती गोळा होत होती. एक दिवस या अशांतीचा परिस्फोट व्हावयाचा होता.
माझ्या मामांनी रजा घेतली होती. परंतु रजेत कोठेच न जाता ते पुण्यासच राहिले होते. ते पोटदुखीने आजारी होते. मामांना लहानपणापासून पोटदुखी होती. परंतु कधी कधी पोटात फार दुखत असे. दिवस-रात्र दुखत असे. विश्रांती मिळावी म्हणून त्यांनी रजा घेतली. ते घरी शक्यतो पडून रहात. अगदी कंटाळाच आला तर जरा बाहेर हिंडून येत.
घरी असले म्हणजे मामा त्यांची आवडती ज्ञानेश्वरी किंवा वाल्मिकी रामायण वाचीत बसत. मला दररोज शिकविणेही सुरु झाले. सकाळी, दुपारी मला शिकविण्यासाठी बोलावीत. इंग्रजी वाचून घेत; भाषांतर करुन घेत. मामांना कचेरी असे तेव्हा ते बहुधा रविवारी शिकवावयाचे; परंतु आता रजा असल्यामुळे वाटेल तेव्हा ते हाका मारीत. मामांचे शिकवणे शांत नसे. आदळाआपटीचे त्यांचे शिकवणे असे. जे फार बुध्दिमान असतात ते उत्कृष्ट शिक्षक होणे कठीण असते. कारण विद्यार्थ्यांना झटपट न समजले तर ते संतापतात. डोक्यात राख घालतात. या गाढवांना इतके कसे समजत नाही, असे त्यांना वाटते. आपल्याप्रमाणे सारे बुध्दिमान असले पाहिजेत, असा त्यांचा समज असतो. मंदमती विद्यार्थ्यांचा ते तेजोभंग करतात. मनुष्याचा पदोपदी पाणउतारा करणे, तेजोभंग करणे म्हणजे त्याचा वधच करणे होय. त्याच्या आत्म्याची ती हत्याच होय.
मी लहानपणी मुंबईस डोळे दुखत म्हणून होतो; तेव्हा मामा शिकवतील या भीतीने मी लौकर झोपून जाण्याचे सोंग करीत असे. मामांच्या शिकवण्याची गोडी न लागता उलट भीती वाटत असे. मामांनी मला हाक मारली की, माझी चर्या एकदम दु:खी व काळवंडलेली होई. एके दिवशी मामा सकाळी मला म्हणाले, 'बुधवारात त्या डॉक्टरांकडे जा व माझे औषध घेऊन ये. बारा आणे त्यांना दे. आज सकाळी काही शिकवीत नाही. आपण दुपारी मात्र पुष्कळ अभ्यास करु बरे का श्याम ? जा, बाटली धुऊन घे आणि जा.'
"दुपारी आपण पुष्कळ अभ्यास करु' हे मामांचे शब्द सुरीप्रमाणे हृदयात गेले. कोकराला सिंहाच्या गुहेत दोन तास शांतपणे व आनंदाने कसे बसवेल ? शिकविणारे मामा म्हणजे मला वाघसिंहच वाटत असत. मी डॉक्टरांकडे जावयास निघालो; परंतु मनात प्रक्षुब्धता पेटली होती. आपण कोठे तरी निघून जावे, असे पुन्हा मनात आले. नको हे मामाजवळ शिकणे असे वाटले; परंतु जवळ पैसे होते फक्त बारा आण्याचे. बारा आण्यांत मी कोठे जाऊ, कोणाकडे जाऊ ?