अशी एकविसावी ओवी आहे. पुष्कळ आकडयापर्यंत म्हणता येतात.'
मी म्हटले, 'गंगू ! तू आपल्या ओव्यात माझे नाव गुंफतेस का ? घरी आई, आजी दळताना माझ्या नावाच्या ओव्या म्हणतात. तू म्हणतेस ?'
गंगू म्हणाली, 'म्हणजे रे कसे ?'
मी म्हटले, 'तुला माहीत नाही ? मी म्हणून दाखवू ?
दहावी माझी ओवी । दाही दिशा ग फाकल्या ?
श्याम दाखवी वाकुल्या । गंगूताईला ।।'
गंगू म्हणाली, 'तू मला वेडावणार वाटते ? मी अशाने तुझ्याजवळ बोलणारच नाही.'
मी म्हटले, 'मागेसुध्दा तू बोलत नव्हतीस; परंतु तूच झक्कत बोलायला लागलीस !'
गंगू म्हणाली, 'झाडाखाली रडत होतास म्हणून मी बोलायला आल्ये.'
मी म्हटले, 'तुला मी रडत आहे, हे थोडेच माहीत होते ? तू पाठीमागून माझे डोळे धरलेस तेव्हाच तुला कळले ! तू आपण होऊन बोलायला आली होतीस.'
गंगू म्हणाली, 'मी तुझ्याजवळ बोलले नाही तर तुला बरे वाटेल का ?'
मी म्हटले, 'काहीतरीच विचारतेस ! गंगूताई मी मनात दुसरी एक ओवी जमविली आहे. म्हणून दाखवू ?'
गंगू म्हणाली, 'चांगली असली तर म्हण, वाकुल्या दाखवण्याची नको.'
मी म्हटले, 'अगदी छान वाटते. ऐक हो ?
"आठवी माझी ओवी । आठवा कंस मारी ।
श्यामसाठी गंगू चोरी । पपनस । ।'
गंगू रागावून म्हणाली, 'श्याम ! मी पपनस चोरुन आणले नव्हते म्हणून कितीदा तुला सांगितले ? असे चिडविणे काही चांगले नाही हो. जा तू.'
मी म्हटले, 'का जाऊ ?'
गंगू म्हणाली, 'आता अभ्यास कर जा; नाही तर परीक्षेत चोरुन लिहावे लागेल.'
मी म्हटले, 'मी काही ढ नाही. मला अभ्यास न करताच सारे येते. मी एक युक्ती करीत असतो.'
गंगू म्हणाली, 'कोणती रे ?'
मी म्हटले, 'रात्री निजताना माझ्या पुस्तकाची पिशवी मी उशाला घेतो. म्हणजे पुस्तकातले सारे सावकाशपणे डोक्यात शिरते.'
गंगू म्हणाली, 'तुला उशी नाही वाटते ?'
मी म्हटले, 'नाही, मला उशी लागतच नाही. येथे असलो तर पिशवी घेतो. घरी गेलो तर आई मोठे गाठोडे देते.'
इतक्यात दिगंबरच्या आईने गंगूस हाक मारली. गंगू पळतच गेली. तिचे आंगधुणे व्हावयाचे होते.
एके दिवशी गंगू मला म्हणाली, 'श्याम ! एखादा शिंपी तुझ्या ओळखीचा आहे का रे ?'
मी म्हटले, 'काय शिवावयाचे आहे ?'
गंगू म्हणाली, 'शिवावयाचे काही नाही. मला पुष्कळशा चिंध्या हव्या आहेत. तू आणशील ?'
मी म्हटले, 'चेंडू करायला वाटते ? पुण्याला शिवराम गवंडयाने मला चिंध्यांचा चेंडू करुन दिला होता.
गंगू म्हणाली, 'आणशील का ? मला जंमत करावयाची आहे.'
मी म्हटले, 'चिंध्याची नाना रंगांची गोधडी ! होय ना ?'
गंगू म्हणाली, 'ते तुला काय करावयाचे आहे ? आणशील का ?'