मुले वाचनासाठी पाळीपाळीने उभी रहात. जो वाचीत असेल त्याच्या खालचा नंबर, वाचणा-या मुलाच्या बरोबर बसण्याच्या जागेवर आपली पुस्तकाची पिशवी सरकवून ठेवावयाचा. 'पुरे. तू रे' असे शिक्षकांनी म्हणताच पहिला वाचणारा थांबे व दुसरा उभा राही. पहिला वाचणारा एकदम झटक्यात खाली बसे तर तो पुस्तकांनी भरलेल्या पिशवीवर बसे; व वर्गात हशा व्हावयाचा. एकदा मी तसेच केले. त्या मुलाचे नाव होते शिवराम पटवर्धन. तो जरा तापट स्वभावाचा होता. त्याने वाचन संपून तो खाली बसणार होता; परंतु बसण्याच्या आधी त्याने मागे वळून पाहिले तो खाली पिशवी ! त्याने पिशवी उचलली व शिक्षकांच्या अंगावर जोराने फेकली. ती टेबलावर आपटल्यामुळे शिक्षकांना लागली नाही. भगतसिंगाने असेंब्लीत बॉम्ब टाकला; परंतु अध्यक्षांना लागला नाही, कोणाला लागला नाही त्याप्रमाणे ती पिशवी कोणाला लागली नाही. ते शिक्षकही ते दृश्य पाहून हसले; परंतु संयमाने ते आपले हसू आवरीत होते. त्यांनी मला व पटवर्धन दोघांना दोन-दोन छडया मारल्या.
परंतु आठवले याने कमालच केली. तो पुस्तके, वह्या, पिशवी वगैरे वस्तू बसणा-यांच्या खाली ठेवण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याचे डोके काही निराळेच. त्याने आपला दुपाती चाकू उघडला. कोणालाही नकळत तो चाकू बसणा-याच्या खाली ठेवून दिला. बसणा-याने मागे वळून पाहिले म्हणून बरे ! नाहीतर त्या दिवशी चांगलाच प्रकार घडला असता ! बसणारा पाहतो तो दोन्ही पाती उघडलेला चाकू तेथे मांडून ठेवलेला. तो एकदम घाबरलाच. आठवले एकदम चाकू मिटू लागला. शिक्षकांनी 'काय आहे' म्हणून विचारले. त्या मुलाने सांगितले, 'सर, हा पहा उघडलेला चाकू माझ्याखाली याने ठेवला आहे. मी बसलो असतो तर माझे ढुंगण कापले असते. सारा चाकू अंगात रुतून बसला असता.'
आठवले याने दुष्टपणाने ते केले होते असे नाही; परंतु आपण काय गंमत करतो आहोत, त्याचे काय परिणाम होतील, याचे त्याला स्मरण राहिले नाही, भान राहिले नही. शिक्षकांनी आठवले याला पाच छडया मारल्या व त्याचा चाकू आठ दिवस जप्त करुन ठेवला. 'वर्गात पुन्हा कोणी कोणाच्या खाली पिशवी, पुस्तक किंवा काही जर ठेविले तर झोडपून काढीन एकेकाला; लक्ष न द्यावे तर फारच अक्कल तुमची धावायला लागली !' असे शिक्षक म्हणाले. त्या दिवसापासून ही साथ कमी झाली. आठवले याच्या चाकूने त्या आमच्या निष्कपट गमतीचा प्राण घेतला.
आमची कवाईत घेणारे शिक्षक होते. ते अगदी तामसी होते. कवाईत करताना जोडीचा हात कुणी चुकला तर त्याला हातातील जोडीनेच मारीत. कुणाचा डंबेल्सचा हात चुकला तर हातीतील डंबेल्स फेकून मारीत. एकदा तीन-चार मुलांनी काही खोडसाळपणा केला. या शिक्षकांनी त्यात जी दोन श्रीमंतांची मुले होती त्यांना फार मारले नाही. एक वकिलाचा मुलगा होता त्यालाही फार मारले नाही; परंतु उरला एक तो होता गरीब. त्याला त्यांनी गुराप्रमाणे मारले. तो ओरड ओरड ओरडला. आम्हाला हा पक्षपात व हा राक्षसीपणा पाहून चीड आली. केव्हा एकदा या कसाबाच्या हातून आपण सारे सुटू, असे मला होई. हे कवाईत शिकविणारे शिक्षकच गणितही शिकवीत. आठवडयाच्या परीक्षा असत. यांच्या गणित विषयात जे कोणी नापास होत त्यांना ते छडया मारीत. छडया मारुन का मुले पास होतात ? यांना वाटे की, मुलांना मारले की, आपल्या विषयात शेकडा शंभरच्या शंभर टक्के मुले पास होतील ! काय विचित्र कल्पना !
तिस-या इयत्तेपर्यंत ड्रील असे. आम्ही चौथ्या इयत्तेत गेलो व या मारकुटया मास्तरांच्या हातून एकदाचे सुटलो. एकदा या शिक्षकांनी एक नवीन पध्दत शाळेत सुरु करण्याचे ठरविले. सारखेपणा असावा म्हणून सर्व वर्गातील मुलांनी शाळेने छापून आणलेली कव्हरेच पेपरवर लावावी. अशी एक सूचना या ड्रील-शिक्षकांनी हेडमास्तरांना केली. सर्व शिक्षकांच्या संमतीने ही योजना मंजूर झाली. आमच्या वर्गातील मुलांनी या गोष्टीविरुध्द बंड करण्याचे ठरविले. दीड हजार कव्हरे छापून आणलेली होती कारण शाळेत १५०-१७५ च मुले होती. एकेका मुलाला जास्तीत जास्त, आठ-दहा कव्हरे लागली असती. इंग्रजी, संस्कृत, मराठी, इतिहास-भूगोल, सायन्स गणित एवढेच तर विषय. खालच्या इयत्तांना संस्कृत नव्हतेच. गणिताचे निरनिराळे पेपर केले तरी आठ आणे झाले असते. आमच्या वर्गातील मुलांनी ती सारी कव्हरे विकत घेण्याचे ठरविले. शाळेला कव्हरांचा तोटा आणावयाचा. तोटा आणला की, काही मुलांच्या पेपरांना मग छापील कव्हरे नाही मिळणार; म्हणजे सारखेपणा गेला चुलीत ! असा आम्ही डाव टाकला.