श्यामचा हात यंत्राप्रमाणे पुढे झाला. श्यामने आपला हात ताठ व सरळ ठेविला होता. एक क्षणभरही तो हात कापला नाही, मागे पुढे झाला नाही. श्यामचा तो कष्टाळू मायाळू हात ! आत्याच्या घरी पाणी काढून काढून थकणारा हात, आत्याच्या घरच्या गाईला प्रेमाने गोंजारणारा तो हात, झाडांची कोवळी पाने कुरवाळणारा तो हात. फुलझाडांवरची सारी फुले न तोडणारा हात. महारणींचे गोयले त्यांच्या डोक्यावर देणारा, भेदातीत प्रेम दाखविणारा तो हात, चिमण्यांना अंगणात दाणे टाकणारा तो हात, रामरक्षा, गंगालहरी प्रेमाने लिहून घेणारा तो रसिक व भक्तिमय हात, घरी आईचे पवित्र पाय चेपणारा व तिला दळताना मदत करणारा तो हात, मित्राने दिलेला साठाचा तुकडा कुरवाळीत असणारा तो हात, अशा त्या हातावर सारख्या छडया बसत होत्या. मुलांनी दु:खाने खाली माना घातल्या होत्या. काहींचे डोळे जरा ओलेही झाले. माझ्यावर मुलांचे थोडेफार प्रेम होते. मी काही वाईट मुलगा नव्हतो. माझा कोणी वैरी प्रतिस्पर्धी नव्हता.

पहिल्या छडया मोडल्या, दुस-या ताज्या दमाच्या घेण्यात आल्या.' आता तो हात पुढे कर' एकाच हाताला का शिक्षा ? मी डावा हातही पुढे केला. तितक्याच शांतपणे पुढे केला. माझ्या डोळयांत एकही अश्रू आला नाही. माझ्या वर्गाची कीर्ती मी वाढविली. मार खावा तर तोही याच वर्गाने, अशी कीर्ती पुढे आमच्या वर्गात पसरली. एक क्षणभरही माझा हात वाकला नाही, कचरला नाही. झणझणीत छडी होती; परंतु हात आघातासाठी सिध्दच असे. त्या कठोर आघाताखाली हात लवमात्र लवला नाही.
दुस-या छडयाही झडल्या. शिक्षक मला म्हणाले, 'उभा रहा भिंतीजवळ !' मी उभा राहिलो. मी रडलो नाही, अयाई म्हटले नाही. गयावया केले नाही. माझा अभिमान धुळीला चिरडला गेला नाही, हे त्या शिक्षकांस सहन झाले नाही. मी एवढे मारतो; परंतु हा पुरे म्हणत नाही, 'पुन्हा नाही करणार, नका मारु आता' असे काही बोलत नाही, याची त्यांना चीड आली. मी मोडेन पण वाकणार नाही, अशी माझी वृत्ती पाहून ते मनात दातओठ खाऊ लागले. तेवढी शिक्षा करुन त्यांचे समाधान झाले नाही. त्यांच्या मनात अद्याप सूड होता. ह्या बेरड श्यामला पुरेपूर नमवायचा, असा जणू त्यांनी निश्चय केला होता. ते मुलांना म्हणाले, 'याला आणखी कोणती शिक्षा करु ? शाळा सुटेपर्यंत शाळेच्या दरवाज्यात टेबलावर याला उभा करु का ? प्रत्येक वर्गात याला हिंडवून याची धिंड काढू का ?'

मुलांनी चिठ्ठया लिहिल्या. त्या सर्व चिठ्ठया टेबलावर आल्या. माझी मान खाली होती. पुरीप्रमाणे फुगलेल्या माझ्या हातांकडे मी पहात नव्हतो. माझे डोळे जमिनीकडे होते. शिक्षक चिठ्ठया वाचू लागले. त्या चिठ्ठयांतून काय होते ? त्या बाल न्यायाधीशांनी कोणता निर्णय दिला होता ? शिक्षेचे कोणते अभिनव प्रकार त्यांच्या प्रतिभेने सुचविले होते ? मी चिठ्ठया ऐकत होतो. 'श्यामला क्षमा' असे सर्वांनी लिहिले   होते ! मी आता वर मुलांकडे पाहिले. माझे डोळे कृतज्ञतेने चमकले. माझ्यासाठी मुलांना उगाच मार खावा लागला. माझ्यावर रागावण्याचा त्यांना अधिकार होता; परंतु माझ्यावर न रागावता, माझा सूड न उगवता त्या सर्वांनी 'याला क्षमा करा' असे लिहिले. मुलांनी तर मनात केव्हाच मला क्षमा केली होती; परंतु शिक्षकाला क्षमेचा धडा ते बालदेव शिकवीत होते. ती मुले 'गुरुणां गुरु:' झाली होती.

मी मुलांकडे पाहिले व माझ्या डोळयांतून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. दु:ख अपमान, लज्जा यांसाठी साठविलेले अश्रू आतापर्यंत बाहेर आले नव्हते. सहानुभूतिहीन वातावरणात अश्रू ढाळून अश्रूंचा का अपमान करावा ? शिक्षक दोन-दोन छडयांनी मारीत असता मी रडलो नाही. माझे दोन्ही हात कळवळत असता माझे डोळे ओले झाले नाहीत. माझ्या डोळयांतून शिक्षकांच्या छडयांनी पाणी बाहेर काढले नाही. त्या छडयांत ती शक्ती नव्हती. श्यामचा हृदय पालट शिक्षकांची कठोर शिक्षा करु शकली नाही. ती शिक्षा निरुपयोगी होती; परंतु शिक्षकाच्या चार-चार छडया जे करु शकल्या नाहीत, ते मुलांच्या एका शब्दाने केले, मुलांनी केलेल्या क्षमेने अहंकारी व स्वाभिमानी श्याम पाझरला. शिक्षक माझा अहंकार चिरडू शकले नाहीत; परंतु मुलांच्यासमोर माझे सारे अहंपर्वत धुळीत पडले. मी तेथे मुक्याने अश्रू ढाळीत उभा राहिलो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel