मी म्हटले, 'तू तरी काही माझ्यापेक्षा फार नाहीस मोठी ! दोन-तीन वर्षांनी. चल, गंगू आपण दहीभात खाऊ.'
मी म्हटले, 'गंगू, तू एका वाटीत कालव. एकेक घास माझ्या हातावर ठेव व एकेक तू खा.'
गंगू म्हणाली, 'म्हणजे आणखी एक भांडे नको खरकटे करायला.'
गंगूने भात कालवला. ती माझ्या हातावर एकेक घास देत होती व ती एकेक घेत होती. तेव्हाच भात संपला. चार घास तर होते. मी माझ्या अंथरुणावर येऊन पडलो. इतक्यात गंगू म्हणाली, 'श्याम ! ही घे उशी. उंबरठयावर डोके नको ठेवू.'
मी म्हटले, 'मला नाही मऊ उशा आवडत.'
गंगू म्हणाली 'ही टणकच आहे.'
मी म्हटले, 'पाहू !'
गंगूने माझ्या हातात उशी दिली. उशीवर सुंदर स्वच्छ अभ्रा होता. अभ्य्रावर हिरव्या रंगाची वेल होती. वेलीवर पिवळया रंगाची चिमणी होती.
गंगू म्हणाली, 'श्याम ! नाही ना मऊ ?'
मी म्हटले, 'चिंध्याची आहे, होय ना ? या साठी वाटते चिंध्या हव्या होत्या ?'
गंगू म्हणाली, 'चिंध्यांची उशी डोक्याखाली घेऊन डोक्यात सा-या चिंध्या भरतील हो.'
मी म्हटले, 'मी का ही कायमची घेऊ ?'
गंगू म्हणाली, 'हो तुझ्यासाठीच मी केली आहे. तो अभ्रा धूत जा. म्हणजे घाण होणार नाही.'
मी म्हटले, 'आमच्या डोक्यात थोडेच तेल असते तुमच्यासारखे ! तुमचीच तेलकट डोकी.'
गंगू म्हणाली, 'पुरुषसुध्दा आता लावतात हो खूप तेल. केस ठेवतात, भांग पाडतात. उगीच ऐट नको.'
दिगंबराची आई म्हणाली, 'नीज आता श्याम ! दार उघडेच राहू दे ?'
मी म्हटले, 'हो दार उघडे राहू दे. मोकळा वारा येऊ दे. तारे आत डोकावू देत. मी आता निजतो. अळीमेळी गुपचेळी !'
मी त्या दिवशी शाळेतून आल्यावर गंगूला म्हटले, 'गंगू तू उद्या जाणार. तुला मी काय देउ ? माझ्याजवळ काही नाही. गंगू पावसाळयात आली असतीस, श्रावणाच्या महिन्यात आली असतीस, तर तुझ्या मंगळागौरीला मी पहाटे उठून फुले गोळा करुन आणली असती. पारिजातकाच्या कळयांचा अब्दागीर केला असता. तुझ्या मंगळगौरीत मी जागलो असतो. माझ्या मित्रांना बोलावून आम्ही नाटकातले संवाद केले असते. परंतु तू या दिवसात आलीस. ना मंगळागौर, ना काही.'
गंगू म्हणाली, 'श्याम, तू सारे मला दिले आहेस. तू माझ्यबरोबर खेळलास, माझ्या बरोबर भांडलास, माझ्याबरोबर रागावलास, रुसलास, माझ्याबरोबर हसलास, माझ्याबरोबर जेवलास. आणखी काय द्यावयाचे आहे ?'
मी म्हटले, 'गंगू ! तू मला पपनस आणून देत असत. उशी करुन दिलीस. तू माझे अश्रू पुशीत असत. अभ्यास कर सांगत असस ! गंगू, मी तुला काय देऊ ? मी गरीब आहे.'