शेवटी कोठून कसा तरी मी पर्वतीच्या पायथ्याशी आलो. फिरावयास आलेले लोक परतत होते. त्यांच्या पाठोपाठ मी निघालो. परंतु रात्री कोठे थांबवयाचे हा विचार मनाला सचिंत करीत होता. पर्वती मिळाली, सदाशिव पेठेकडे पावले जाऊ लागली. परंतु पुढे काय ? रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत सदाशिव, नारायण पेठेत भटकेन; परंतु नंतर काय ? बारानंतर पोलिसांनी पकडले तर ? पोलिस रात्री गस्त घालीत, हे मला माहीत होते. पोलिसांच्या ताब्यात जाणे म्हणजे यमदूतांच्या ताब्यात जाणे, असे मनाला वाटे. मी अस्वस्थ झालो. शेवटी माझा राम मला आठवला. ज्याचा लहानपणी मी जप करीत असे तो राम मला आठवला. गुहाला आलिंगन देणारा, जटायूवर प्रेम करणारा, शबरीची उष्टी बोरे खाणारा, माकडांना मिठया मारणारा तो परम मंगल राम आठवला. पदस्पर्शाने अहिल्येला पावन करणारा, स्वत:च्या नावाने शंकराच्या विषाची आग शांत करणारा, ज्याच्या नावाने समुद्रावर शिळाही तरल्या तो कारुण्यसागर, भक्तवत्सल राम मला आठवला.
"सुनेरी मैने निर्बलके बल राम'
राम म्हणजे दुर्बलांचे बल, राम म्हणजे निराधारांचा आधार, अनाथांचा नाथ, अरक्षितांचा रक्षिता, आर्तांचा त्राता राम, जो हाक मारील त्याचा आहे. हाक न मारील त्याचाही आहे.
नभासारखे रुप या राघवाचे
आकाशाची छाया सर्वांवर आहे. त्याप्रमाणे मेघश्याम रामाची कृपाही सर्वांवर आहे. राम व कृष्ण यांचे रंग नभाचे रंग आपण कल्पिले आहेत. नभाप्रमाणे ते सर्वांवर छाया करतील. लहानथोर, स्पृश्यास्पृश्य पाहणार नाही. हा अर्थ त्या विशिष्ट रंगकल्पनेत आहे.
तुळशीबागेत आपण जाऊ, रात्री तेथेच रामाच्या पायाजवळ आपण निजून जाऊ. आईजवळ बाळ झोपेल. असे विचार मनात खेळवीत मी तुळशीबागेकडे वळलो. आली. तुळशीबाग आली. रामाची नामपूजा चालली होती. मंडईतील भाजीविक्या टिप-या वाजवीत गोड अभंग म्हणत होत्या. मी रामाच्या घवघवीत, अजअजित मूर्तीसमोर उभा होतो. तसेच त्या मूर्तीसमोर कायमचे उभे रहावे, असे मनात आले. भजन चालले होते. रामाला प्रदक्षिणा घालीत राहिलो. रामाचे रुप अंतरी साठवू लागलो. तुळशीबागेतील राम हृदयबागेत आणू लागलो. त्या बाया विडा वगैरे गाणी म्हणू लागल्या. मी तन्मय होऊन ऐकू लागलो. शेवटी शेजारती होऊ लागली. शेजारती आली. माझा राम आता झोपणार; तुझा श्याम रे कोठे झोपणार ?
प्रसाद व तीर्थ वाटण्यात आले. 'रामाहो,' असे भक्तिपूर्वक म्हणून वंदन करुन लोक घरोघर चालले. मी तेथेच एका खांबाजवळ बसून राहिलो. रामाच्या आतील दरवाजा बंद झाला. पुजारी आले, मंदिराच्या मंडपात मी एकटाच होतो. हा लहान बारा वर्षांचा श्याम तेथे खिन्नपणे सचित बसला होता. ते पुजारी जरा जाडजूड होते. एका पायाने जरा लंगडे होते. ते माझ्याकडे येऊ लागले. ते रामाची पूजा करीत; परंतु त्यांची चर्या मला भेसूर वाटली. देवावर प्रेम करणा-याचे डोळे कसे प्रेमळ असतात ! देवावरच काय परंतु जगात कोणत्याही वस्तूवर ज्याने कधी उत्कटपणे प्रेम केले असेल त्याचे डोळे निराळेच असतात. ज्याला प्रेमाचा अनुभव आला त्याच्या डोळयांत एक प्रकारची मृदुता, एक प्रकारची करुणा. एक प्रकारची प्रेमळ ज्योती दिसते. त्या पुजा-याच्या दृष्टीत मला तसे काही एक दिसेना. माझ्या रामाची पूजा करताना त्यांचे डोळे डबडबले नव्हते काय ? माझ्या रामाची पूजा करताना त्यांचे हृदय भक्तिप्रेमाने उचंबळून नव्हते का आले ?
पुजारी मला म्हणाले, 'जारे पोरा आता. वाडयाचा दरवाजा आता बंद होईल. ऊठ येथून.'
मी म्हटले, मी येथेच निजेन, मला येथे मंदिरात नाही का झोपू देणार ?
पुजारी :- नाही. येथे तशी परवानगी नाही.
मी :- आमच्या कोकणातील देवळात तर कोणीही वाटसरु येऊन निजतो. मारुतीच्या देवळात कोणीही उतरावे.
पुजारी :- हे मंदिर का तसले भिकारडे मंदिर आहे ? हे संस्थान आहे. तुमची कोकणातील मंदिरे दरिद्री, तेथे कोण काय चोरुन नेणार आहे ? येथे देवाच्या अंगावर पहा !