राम पुढे छात्रालय सोडून जवळच्या जालगाव नावाच्या गावी राहावयास गेला. पुण्याहून त्याची आई सर्व भावंडांस घेऊन तेथे राहावयास आली. रामचे वडील वारले होते. मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आईवर होती. एके ठिकाणी बि-हाड करुन सर्वांनी राहावे, असे तिने ठरविले. छात्रालयातील दोन्ही मुले तिने काढून घेतली. जालगाव येथे भाडयाने घर घेऊन ती मंडळी राहू लागली.
रामच्या बि-हाडी जावे व रामची आई बघावी, असे कितीदा तरी माझ्या मनात येई. परंतु राम व मी तर बोलत नव्हतो. राम आपल्या नवीन घरी मला बोलवील, आपल्या सर्व भावंडांची ओळख करुन देईल असे मला वाटत होते. मी वाट पहात होतो. राम आज बोलवील, उद्या बोलवील, अशी मी आशा करीत असे; परंतु अभिमानी राम बोलवीना. राम हा फार स्वाभिमानी होता. तो ज्ञानधन तसाच मानधनही होता. श्याम फक्त एकच धन ओळखी ते म्हणजे प्रेमधन. राम बुध्दिमान होता; परंतु श्यामच्या भावना समजण्याइतकी बुध्दी रामजवळ नव्हती. तो गणिते भराभर सोडवी; परंतु हृदयाच्या गुंतागुंती त्याला सोडविता येत नसत. कारण त्या त्याला कळतच नसत.
त्या दिवशी आत्याने मला खूप पाणी ओढावयास लाविले. मीही संतापाने पाणी ओढीतच राहिलो. पुरे म्हणेपर्यंत आज पाणी मिरच्यांना घालावयाचे असे मी ठरविले. दोरीने पाणी ओढून ओढून हाताला चरे पडले. हातात दोरी धरवेना. 'पुरे हो आता पाणी' असे शब्दही माझ्या कानावर पडले.' पाच तोफांचे आवाज ऐकून मी आता सुखाने मरतो' असे थोर वीर बाजी म्हणाला. 'माझीही प्रतिज्ञा पुरी झाली' असे मी मनात म्हटले.
मी त्या दिवशी अगदी दमून गेलो होतो. हात रक्तोत्पलाप्रमाणे लाल झाले होते. करकोचे पडले होते; परंतु मी माझे दु:ख कोणाला दाखवू ? कोणाला सांगू ? माझा हा श्रमक्लिष्ट हात कोणाला दाखवू ? हा हात आपल्या हातात घेऊन कोण पाहील, कोण कळवळेल, कोण रडेल ? मी माझा हात आज रामला दाखवीन. मग माझा राम माझा हात कुरवाळील. माझा हात बघून तो कळवळेल. माझ्या दु:खाने तो दु:खी होईल. मनात असे म्हणत मी शाळेत गेलो; परंतु शाळेत गेल्यावर रामजवळ म्हणून जावे, तर राम दूर पळे. त्याला जाऊन पकडावे, असे मनात आले; परंतु माझ्या हातांना हिसडा देऊन स्वाभिमानी राम निघून जाईल व श्यामची मात्र जगात फजिती होईल असे वाटे. प्रेमासाठी तडफडणारा श्याम एकटाच दु:खी-कष्टी होऊन एका दूरच्या झाडाखाली जाऊन बसला व मोत्यासारखी टिपू गाळू लागला.
एके दिवशी मी वर्गात विचित्र खोडी केली. घंटा होण्याला अवकाश होता. दोन मुलांच्या पुस्तकांच्या पिशव्यांना मी एके ठिकाणी चांगली निरगाठ देऊन ठेविली. पहिली घंटा झाली. मुले वर्गात येऊ लागली. त्या वेळेस पहिल्या तासाला राधारमण कमी येत असत. कोण शिक्षकांच्या गैरहजेरीत ते येत असत. स्वत:ची काव्ये, संस्कृत स्तोत्रे ते शिकवीत. ज्यांच्या पिशव्या एकत्र बांधलेल्या होत्या ती मुले पिशव्यांची ओढाताण करु लागली. जसजशी ओढाताण होई, तसतशा गाठी अधिकच पक्क्या होत. मी त्यांना म्हटले, 'आता दुसरी घंटा होईल. तोडा लौकर कोणाच्या तरी पिशवीची नाडी !' परंतु आपली नाडी तोडून घेण्यास कोणीही तयार होईना. ती पहा दुसरी घंटा झाली. वर्गात शिक्षक येण्याची वेळ झाली. आमच्या वर्गात ओढाताण चालली आहे. व सारी मुले हसत आहेत.