९. फिरुन पुणे
मी मुंबईस पळून आलो. पुण्याला, मामांकडे मी सुखरुप आहे, अशी तार करण्यात आली. मी मुंबईस जवळजवळ एक आठवडाभर होतो. प्रथम एक दिवस मी घरातून कोठेच बाहेर गेलो नाही; परंतु दुस-या दिवसापासून मी गॅलरीत खेळू लागलो. घरात थोडा अभ्यासही करीत होतो. नवनीत वाचीत असे. धाकटे मामा थोडे थोडे शिकवीत. असा अनिश्चित कार्यक्रम चालला होता; परंतु अनिश्चित किती दिवस चालणार ?
पुण्याच्या मामांचे धाकटया मामांस पत्र आले. श्याम का गेला, काय झाले वगैरे कारणे त्यांनी विचारली होती. धाकटया मामांनी ते पत्र मला दाखविले. ते म्हणाले, 'या पत्राचे उत्तर तू लिही व पाठवून दे. हे तुला कोरे पाकिट देऊन ठेवतो. पत्ता लिहिशील ना ?' मी 'हो' म्हटले. मामा कचेरीत निघून गेले. ते आता पोस्टात होते. डोंगरीच्या शाळेत नव्हते.
मी माझे पत्र लिहू लागलो. सर्व कारणपरंपरा लिहिली. मामींबद्दल लिहिले. मामांच्या रागीट शिकविण्याबद्दलही लिहिले. वडिलांच्या कैदेबद्दलही लिहिले. केवढे थोरले पत्र मी लिहिले. ते पत्र दोनदा वाचून पाहिले. शेवटी ते मी पोस्टात टाकले. मामींबद्दल मामांना लिहिणे योग्य नव्हते. सासरच्या माणसांची मामी निंदा करते वगैरे मी लिहिले होते. आज मला त्याचे वाईट वाटत आहे; परंतु त्या वयात मला एवढे कोठून समजणार ? बुध्दीचा पोच त्या वेळेस नव्हता. मामांनीही पत्र पोस्टात टाक, असे सांगितले होते. 'तू लिहून ठेव. मी वाचून पाहीन' असे सांगितले असते तर त्यांनी वाचून काय योग्य, काय अयोग्य ते मला समजावून सांगितले असते; परंतु ते वाचणार असते तर मी मनमोकळेपणाने लिहिलेच नसते. माझ्यावर दडपण टाकण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी मला स्वातंत्र्य दिले. त्या स्वातंत्र्याचा मीच संयमपूर्वक उपयोग केला पाहिजे होता. जो संयम पाळील त्यालाच स्वातंत्र्य शोभेल. स्वातंत्र्येच्छू माणसाने संयमी असले पाहिजे.
माझे पत्र तर पुण्यास गेले. बाण तर सुटला. बोललेला शब्द, सोडलेला बाण परत का येतो ? मामांच्या हाती पत्र पडले. मामा मामीला रागे भरले. शेवटी मामांचे पुण्याहून पत्र आले. 'श्यामची इच्छा असेल तर त्याला परत येऊ दे. मला आनंद होईल; परंतु येण्यास फारच असंतुष्ट असेल तर न आलेला बरा.' असे त्यांनी लिहिले होते. मुंबईच्या मामांनी उपदेश केला. मी आलो त्या रात्री त्यांनी रागाने दोन कानशिलात भडकावल्या होत्या. त्याचे त्यांना वाईट वाटत होते. ते माझ्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, 'श्याम ! बाळ परत जा. असे करुन कसे चालेल ? अप्पा रागीट आहे; परंतु हृदय स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. तो पराकाष्ठेचा उदार आहे. तो सखूताईस, गजाननास व तुला शिकविण्यास तयार आहे. आजच्या काळात कोणी कुणाच्या उपयोगी पडेल का ? अप्पासारखा भाऊ आम्हास मिळणार नाही व असा थोर मामा तुम्हाला मिळणे कठीण. अप्पा देवाचा भक्त आहे. दत्तासमोर एकतारीवर भजन करता करता तो अश्रू ढाळतो. देवाचा भक्त का वाईट असतो ? अप्पाजवळ शीक. अप्पासारखा बहुश्रृत व बुध्दिमान मनुष्य मी अद्याप पाहिला नाही, त्याच्याजवळ खूप शीक संस्कृत वाच. पुढे शिष्यवृत्ती मिळव. जा; परत पुण्यास जा. रडू नकोस. मी त्या दिवशी मारले म्हणून का रडतोस ? श्याम ! अरे प्रेम करतो तोच कधी कधी मारतोही. जो प्रेम करतो त्याला एखाद्या वेळेला मारण्याचाही अधिकार आहे. तुला मी मारले; परंतु तू झोपलास. तुला मारणा-या या मामास मात्र त्या रात्री झोप आली नाही. त्या वेळेस तुझ्या पळून येण्यास मी उत्तेजन देणे योग्य झाले नसते.'