निशाण हलवले गेले. शिट्टी झाली. गाडी निघाली. आमचे हात सुटले; परंतु जीव जिवाला जडले. माधव व मी पाहता येईल तोपर्यंत व दिसत होते तोपर्यंत एकमेकांकडे पाहात होतो. माधव दृष्टीआड झाला, माधव हृदयात कायमचा आला. माधव माझ्या जीवनात दिव्य गीताप्रमाणे मधुर स्वर्गीय तानेप्रमाणे चिरंजीव झाला आहे. माधव म्हणाला, 'हे दोन चरण एवढेच माझे काव्य,' परंतु त्याने सारे जीवनच काव्यमय केले आहे. प्रेमाच्या दोन ओळी त्याने लिहिल्या, परंतु सारे जीवन त्याने प्रेममय केले होते. प्रेमाच्या काव्याचा पाऊस पाडणारे कवी व प्रेमाच्या कथांचा सुकाळ करणारे गोष्टीवेल्हाळ यांच्या जीवनात प्रेम, स्नेह, दया पाहू गेले तर एक कण सापडेल तर शपथ ! एक बिंदू आढळला तर मिळविली म्हणावायची ! जीवनात शाब्दिक प्रेम फार आहे, प्रत्यक्ष प्रेमाचा अभाव आहे.

'बोलाचीच कढी बोलाचाच भात : जेऊनीया तृप्त कोण झाला !'


या भारतात कोण तृप्त आहे ? सारे दुष्काळात सापडलेले, रोडके, दीन-दरिद्री आहेत. सारा संसार भयाण व नीरस दिसत आहे.

माधव ! एका तासा अर्ध्या तासाचा त्याचा माझा परिचय. परंतु त्या घटकापळांवर देवाचा शिक्का मारला गेला आहे. जीवनाच्या यात्रेत मधून मधून अशी उदात्त व पवित्र दर्शने होत असतात. त्या दर्शनांचा, स्पर्शनांचा सुवास जन्मभर पुरतो. जन्मोजन्मी पुरुन उरतो. 'जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे.' अशी ही दर्शने व स्पर्शने असतात ! एखादा सुंदर पक्षी यावा, क्षणभर बसावा, त्याने गोड किलबिल करावी व अनंत निळया आकाशात उडून जावे तसे ते माधवाचे भेटणे-बोलणे होते. त्या माधवाची व माझी ती भेट शब्दांनी न दाखविण्याइतकी पवित्र आहे. माधव कोठे आहे ? कोठे असेल ? कोठेही असला तरी या श्यामचे स्मरण त्याला होत असेल, या श्यामच्या हितमंगलाबद्दल तो सळसळणा-या वा-यावरुन प्रार्थना पाठवीत असेल, पाखरांबरोबर मला संदेश पाठवीत असेल, आशा पाठवीत असेल ! पाण्याने भरुन   येणा-या मेघाबरोबर प्रेमाची गंगा पाठवीत असेल !

अहंमदाप्रमाणे माधवलाही माझ्या हृदयात मी एक लहानसे घरटे बांधून दिले आहे. निराशेच्या अंधारात मी त्याच्या घरटयात शिरतो व त्याचा प्रेमप्रसाद घेऊन पुन्हा आशेचा दीप पाजळून हसू खेळू लागतो; खेळू-खिदळू लागतो.

बोरीबंदर जवळ येऊ लागले तसतसे माझे हृदय धडपडू लागले. बोरीबंदर आले. सारी गाडी रिकामी झाली. मी माझी लहानशी वळकटी बांधली. एका व्हिक्टोरियावाल्याजवळ मी गेलो. 'गिरगाव, म्हारबावडी, पाच देवाजवळ' वगैरे पत्ता त्याला सांगितला. आठ आणे भाडे ठरवून मी गाडीत बसलो. १५-२० मिनिटे झाली. व्हिक्टोरियावाला मला म्हणाला, 'उतरा आली म्हारबावडी.' मी आजूबाजूस पाहू लागलो. म्हारबावडी दिसेना. ओळखीची चिन्हे दिसेतना, मी गाडीवानास म्हटले, 'येथे कोठे आहे म्हारबावडी ? मला गिरगावातील म्हारबावडीजवळ नेऊन सोड. पांढ-या गणपतीचे तेथे देऊळ आहे. आंग्राच्या वाडीजवळची म्हारबावडी.' मी. गाडीतून उतरेना. गाडीवाला तणतणू लागला. 'जादा पैसे देना पडेगा. छ: आने में इतना लंबा कौन जायेगा । ' वगैरे त्याची बडबड सुरु झाली. मी त्याला म्हटले, 'आणखी चार आणे देईन; पण गाडी हाकल.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel