५.  आमच्या गावातील नाटक कंपनी

आमच्या लहानशा पालगड गावी एकदा एक नाटक कंपनी आली होती. त्या गावात आलेली ती पहिलीच नाटक कंपनी होती. आमच्या गावातील लोकांना नाटकाचा फार षोक होता. गावात दरवर्षी दोनदा नाटक होत असे. गणेशचतुर्थीच्या व रामनवमीच्या उत्सवात ही नाटके होत. माझ्या मोठया भावाने एकदा एका नाटकात गणपतीचे सोंग घेतले होते. माझे चुलते तर एक उत्कृष्ट नट होते. ते जर गाव सोडून बाहेर पुण्या-मुंबईस जाते तर त्यांनी आमच्या गावाचे नाव केले असते.

परंतु नाटक कंपनीत जाणे कमीपणाचे मानले जाई. माझ्या आतेबहिणीचा नवरा माझ्याच गावामधला होता. एकदा गणपतीच्या उत्सवात कीचकवध नाटक करावयाचे होते. त्या नाटकात तो धर्मराजाचे काम करणार होता; परंतु त्याचे घराणे वेदविद्येच्या अभ्यासासाठी आमच्या गावात प्रसिध्द होते. त्याच्या चुलत्यांना या गोष्टीचा फार राग आला. सा-या कुळाला नरकात तू लोटणार, असे ते त्या पुतण्याला म्हणाले. तो पुतण्या नाटकासाठी पडदे आणण्यासाठी सात कोसांवरच्या एका गावी गेला होता. तिकडे त्याला एक प्रकारचा साप चावला. चुलत्यांना वाटले की पाप करीत होता त्याचे प्रायश्चित मिळाले ! गावातील मंडळींना फार वाईट वाटले. परंतु तो साप विषारी नसावा, कारण तो लवकर बरा झाला. मंडळी म्हणू लागली, 'देवाच्या उत्सवाच्या कामासाठी गेला म्हणून देवाने वाचविले.'

सर्व कला देवाने निर्माण केल्या, असे आपण समजत होतो. ऋषिमुनींनी या कलांचे संवर्धन केले आहे. वेदकालापासून आपल्या देशात नाटके होत होती. रामायणात नाटकांचा उल्लेख आहे. नाटयशास्त्र भरतमुनींनी लिहिले. आपल्या देशात नाटयकला, नृत्यकला, चित्रकला, गायनकला, शिल्पकला या कला परमोच्च कोटीला गेल्या होत्या. या कलांची फारच जोपासना करण्यात येत होती. या कलांचा अभ्यास करणे सदभिरुचीचे व संस्कृतीचे लक्षण समजले जाई. उत्सवातून नाटककाव्याचा सन्मान केला जाई. ऋषींच्या आश्रमांतून विद्यार्थी उत्सवप्रसंगी नाटके करीत. अर्जुनासारखे वीर नृत्यकलेत पारंगत होते. कृष्णही उत्कृष्ट नाचणारा व वाजविणारा होता. शंकर व गणपती हेही उत्कृष्ट नृत्य करणारे म्हणून प्रसिध्द आहेत.

कला जर व्यसनी लोकांच्या हातात गेली तर ती कलाच वाईट, असे लोक समजू लागतात; परंतु ही चुकीची समजूत आहे. व्यसनांचा व कलांचा काय संबंध आहे ? एखादा कलावान एखाद्या व्यसनात सापडलेला आहे एवढयामुळे का त्याची दिव्य कला मातीत गेली ? त्याच्या दोषाची कीव करुन त्याच्या कलेचे कौतुकच केले पाहिजे. जगात निर्दोष व पवित्र कोण आहे ? महाराष्ट्रातील अमर नट गणपतराव जोशी दारु पीत; म्हणून का त्यांची ती भव्य कला तुच्छ मानावयाची ? बंगालमधील प्रसिध्द नाटककार व उत्कृष्ट नट गिरीश चंद्र हे व्यसनाधीन होते; म्हणून का त्यांची थोर कला सन्मानावयाची नाही ?

परंतु आपल्या देशात मनाचा थोरपणा व उदारपणा यांचा अभाव झालेला आहे. यामुळे कला लोपत चालल्या होत्या. आज पुन्हा त्या उदयास येत आहेत. रवींद्रनाथांनी नृत्यास चालना दिली आहे. उदयशंकर यांनी भारतीय नृत्यकलेचा आत्मा पुन्हा एकदा आज भारतीयांस व सर्व जगास दाखविला आहे. कलांचा विकास पुन्हा या भारतभूमीत होऊ लागणार, याची पूर्वचिन्हे दिसू लागली आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel