परंतु ते विचारस्त्रष्टेही नाहीत व धान्यस्त्रष्टेही नाहीत अशा करंटया आयतेखाऊ पोषाकी गुलामांनी गुलामगिरीचा घाणा फिरवीत फिरवीत रानावनातील राजा जो गुराखी, गाईची सेवा करणारा, त्याला तुच्छ मानावे ! धान्य देणारा दुनियेचा अन्नदाता जो शेतकरी त्याला हीन समजावे ! हे केवढे आश्चर्य ! केवढी ही कृतघ्नता व उन्मत्तत्ता !

रोमन साम्राज्याच्या -हासाची मीमांसा करताना प्रसिध्द इतिहासकार गिबन याने एके ठिकाणी लिहिले आहे, 'पांढरपेशे रोमन लोक श्रमजीवी लोकांना तुच्छ मानू लागले, हे रोमन साम्राजाच्या -हासाचे एक महत्त्वाचे कारण आहे.' भारतीयांच्याही आजच्या परमावधीच्या -हासाला हेच पूज्य निदान कारण आहे.

प्रतिध्वनति हि श्रेय: पूज्यपूजाव्यतिक्रम:  ।
जे पूज्य आहेत त्यांची जर पूजा केली नाही तर श्रेय:प्राप्ती होणार नाही. आपल्या वेदांमध्ये शेतीची स्तुती आहे. ऋषी सांगतो:-
"अक्षैर्मा दीव्य: कृषिमित् कृषस्य  ।'

गुलामगिरीचे जुगार नको खेळू, शेतीच कर' निढळया श्रमाने मिळवा व खा. कमाओ और खाओ. मजुरीचे महत्त्व तो महर्षी सांगत आहे. परंतु एकीकडे ऋषींचे गोडवे गाणारेच शेतक-यांना तुच्छ समजत आहेत. आपल्या प्राचीन काव्यात बैलाची उपमा वीरांना व थोरांना देण्यात येत असे; परंतु आज 'बैलोबा' ही शिवी झाली आहे. बैल म्हणजे तुच्छ वस्तू व बैलाबरोबर काम करणारा त्याच्याहूनही तुच्छ ! श्रम करणारांची कदर ज्या समाजात होत नसते आणि परपुष्ट बांडगुळांनाच जेथे लोड-तक्क्ये मिळतात त्या समाजाला भले दिवस कसे येतील आणि का येतील ?

मामांचे पोट दुखत असे. त्यावर नाना प्रकारचे उपचार करण्यात येत होते. एक उपचार तर फारच भयंकर होता. त्या प्रकाराला ओरपणी म्हणतात. मामा उताणे निजले होते. त्यांच्या पोटावर ओले फडके ठेवण्यात आले होते. जवळच भट्टी पेटली होती. भट्टीत फाळ टाकले होते व ते लाल झाले होते. ते लाल फाळ मामांच्या पोटावरुन भराभर ओढण्यात येत. त्या ओल्या फडक्याच्या घडीवरुन अत्यंत वेगाने ते लाल फाळ झरझर ओढण्यात येत. पोट भाजू नये म्हणून योग्य ती दक्षता बाळगण्यात येई. मला असे आढळले की, मधून मधून त्या ओल्या फडक्यावर ताक शिंपडीत. तो देखावा भयंकर दिसे. तो सारा प्रकार माझ्याने पाहावला नाही. मी क्षणभर डोकावत असे व फिरुन तुळशीच्या अंगणात निघून जात असे.

मामांचे पोट दुखणे तरीही कमी होईना. पुण्याचे पुण्यश्लोक अण्णासाहेब पटवर्धन यांनी मामांना कुर्डूच्या बियांचे एक औषध सांगितले होते. ते करुन पहावे, असे एक दिवस रात्री त्यांच्या मनात आले; परंतु कुर्डूचे बी कोठे असेल ? आमच्या घराशेजारच्या केळकरांच्या परसात मी कुर्डू पाहिले होते. मी विचारले, 'मी आणू का कुर्डू ?' मामा म्हणाले, 'जा घेऊन ये.' ती रात्रीची वेळ होती. मी दिवा घेऊन गेलो. केळकरांना विचारुन त्यांच्या परसात गेलो, कुर्डू तोडून आणले. मी कुर्डू आणले. ते पाहून मामांना आनंद झाला. त्यांनी मला शाबासकी दिली. म्हणाले, 'श्यामच्या लक्षात सारे असते. त्याचे डोळे चौकस आहेत. तो सर्वत्र पहात असतो.' आई म्हणाली, 'झाडाझुडपांची, फुलांची त्याला हौस आहे.' करंटया श्यामबद्दल गौरवाचे उद्गार किती तरी दिवसांनी श्यामचे कान ऐकत होते ! श्यामला जरा बरे वाटले, श्यामने थोडी अब्रू मिळविली. अंधारात थोडा प्रकाश आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel