राम म्हणाला, 'तुला सातारची गम्मत आहे का माहीत ? श्यामचा एक मित्र एका गृहस्थाकडे पुस्तक घेऊन गेला व म्हणाला, 'घेता का विकत ?' त्या गृहस्थांनी 'श्याम' हे नाव ऐकताच कपाळाला आठया घातल्या. ते म्हणाले, 'मुसलमानधार्जिण्या त्या श्यामचे पुस्तक आम्हाला नको.' परंतु तो मित्र म्हणाला, 'वाचून तर पहा. नको असेल तर मी परत नेईन. तुम्हांला आवडले तर पैसे द्या.' ते गृहस्थ म्हणाले, 'बरे आहे. राहू दे.' पुढे तो मित्र परत जेव्हा विचारावयास गेला तेव्हा ते भले गृहस्थ म्हणाले, 'मी बोललो त्याची क्षमा करा. मला आणखीही एक प्रत द्या. मुलामुलींच्याच काय पण लहानथोरांच्याही सदैव हातात असावे, असे हे पुस्तक आहे.' या पुस्तकाचा हा केवढा विजय !'
सदू म्हणाला, 'परंतु पुण्याची गोष्ट तुम्हांला कोठे माहीत आहे ? श्याम पुण्याला गेला होता. तेव्हा त्याच्याकडे काही लहान मुले आली. त्या मुलांत श्यामच्या ओळखीचा एक मुलगा होता. श्यामने त्याला विचारले, 'काय पाहिजे तुम्हाला ? गोष्ट का सांगू ?' ती मुले म्हणाली, 'तुम्हाला पहायला आम्ही आलो आहोत. 'श्यामची आई' म्हणजे का तुमची आई ? तुमचे 'श्याम' नाव किती गोड आहे ! असे म्हणून ती मुले गेली.'
गोविंदा म्हणाला, 'आपण श्यामला त्याच्या सा-याच आठवणी विचारु या. किती चांगले होईल ! श्यामजवळ शेकडो आठवणी असतील. किती तरी लहान लहान प्रसंग असतील की, ज्यांतून श्यामच्या जीवनाला प्रकाश मिळत असेल. या सर्व आठवणींचा ठेवा जर आपणांस मिळाला तर आपण केवढे भाग्यवान होऊ !'
राजा म्हणाला, 'श्याम ऐकेल तर ना. त्याच्या मनास त्रास होईल असे आपण काहीही करता कामा नये. त्याची प्रकृती सध्याच किती दुबळी झाली आहे, हे आपण पहातच आहो. श्याम आपल्यामध्ये फार दिवस राहील असे मला तरी वाटत नाही. हा विचार मनात येऊ नये, परंतु येतो खरा, 'मन चिंती ते वैरी न चिंती,' मी या विचाराने फार कष्टी होतो.'
नामदेव म्हणाला, 'म्हणून तर आपण श्यामजवळचे सारे घेऊन ठेवले पाहिजे. त्याच्या स्मृतींचा सुधासंग्रह हा तरी आपणाजवळ कायमचा राहील.'
रघुनाथ म्हणाला, 'आपण सारे जण श्यामजवळ जाऊन बोलू या.'
गोविंदा म्हणाला, 'चला रे सारे.'
ते सारे मित्र श्यामच्या भोवती गोळा झाले. श्यामने त्यांच्याकडे पाहिले. श्यामच्या तोंडावर प्रसन्न हास्य खेळत होते. श्याम मधुर वाणीने म्हणाला, 'काय रे पाहिजे आहे ? सारे माझ्याभोवती का रे जमा झाला आहात ? काही कमीजास्त का आहे ?'
राम म्हणाला, 'श्याम ! तुला एक प्रार्थना करावयास आम्ही आलो आहोत. आमच्या प्रार्थनेस नकार देऊ नकोस.'
श्याम म्हणाला, 'तुम्ही मला इतके प्रेम देत आहात की, माझ्याने नाही म्हणवणार नाही. हा श्याम तुमच्या प्रेमावर जगतो आहे. हे दुबळे शरीर नाहीतर कसचे टिकाव धरिते ? चकोर चंद्राच्या किरणावर पोसतो, असे कवी म्हणतात. त्याचप्रमाणे माझे जीवन तुमच्या प्रेमावर चालले आहे. तुम्हांला मी काय देणार नाही ? आणि द्यावयास तरी काय राहिले आहे ?'