१०.  दगडांचे म्हसोबा

पुण्याला मी क्रिकेटचा खेळ पहावयास शिकलो. निरनिराळया शाळांचे सामने होत असत. माझा दादा व त्याचे मित्र सामने पहावयास जात. त्यांच्याबरोबर मीही जात असे, शाळाशाळांत फार चुरस असे. अनेक दंतकथाही प्रचलित झाल्या होत्या. मुले म्हणत, 'स्टंपाखाली मंतरलेली लिंबे किनरे मास्तरांनी पुरुन ठेवली होती म्हणून त्यांच्या शाळेला जय मिळाला.' अनेक गोष्टी मुले बोलत असत. मी शाळेत जाणारा नव्हतो. कोणत्याच शाळेचा मला फारसा अभिमान नव्हता. मी त्रयस्थ होतो. क्रिकेटचा सामना पहाताना एकच गोष्ट कायमची माझ्या लक्षात राहिली आहे, ती म्हणजे म्हसोबाची पूजा !

ठिकठिकाणी मुले दगडाचे म्हसोबा तयार करावयाची. दगडावर कोणी तांबडी शाई ओतीत, कोणी खडूच्या लालसर कांडीने दगडाचे डोके लाल करीत. दगडाला लाल केल्याशिवाय त्याचा देव कसा होणार ? म्हसोबा तयार झाला म्हणजे मुले काही पानेफुले जमा करुन ठेवीत. म्हसोबाच्या पूजेला पानेफुले लागत. त्याप्रमाणे दुस-याही काही वस्तू लागत. मुलांचे बूट, चपला, जोडे यांचीही पूजेच्या कामी फारच आवश्यकता असे. विजयी होऊ असे वाटणारी मुले फुलेपाने बरीच जमवीत; परंतु पराभूत होऊ पाहाणारी मुले जोडेच देवाजवळ जमा करीत.

मुले देवाला म्हणायची, 'या चेंडूला चाराचा टोला गेला पाहिजे. न गेला तर बघ' !

दुस-या बाजूची म्हणावयाची, 'या चेंडूला तो विरुध्द पक्षाचा खेळाडू बाद होऊ दे. न बाद झाला तर बघ !'

मुलांच्या इच्छेप्रमाणे झाले तर देवाला फुले मिळत. मुलांच्या इच्छेप्रमाणे न झाले तर म्हसोबाला खेटरांची पूजा मिळे. कधी कधी म्हसोबाला दोन्ही पक्षांच्या लोकांकडून एकदम जोडे बसत. कारण गडी बादही होत नसे, परंतु टोलाही जात नसे. यामुळे दोन्ही पक्ष बिचा-या म्हसोबावर संतापत. देवाला जोडे मारल्यावर जर चांगला फटकारा मारलेला दिसला तर देवाला फुले मिळत व देवाला मुलाची धमकावणी ऐकावी लागे. 'याद राख. असेच फटकारे लागू देत. नाही तर पुन्हा हा फाटका जोडा पाहिला आहेस ना ? चेष्टा नाही चालावयाची !'

दगडी म्हसोबाचे हे किळसवाणे प्रकार आपण निर्माण केले आहेत. देव नवसाला पावला तर नारळ फोडीन; नाही तर त्याला जोडे मारीन. ही दगडी देवाची पूजा आपणांत रुढ आहे. ठिकठिकाणी शेंदूर फासलेल्या दगडांकडे पाहाण्याची लोकांची दृष्टी काय असते, ते ह्यावरुन दिसून येईल.

आपल्या मनात आहे ते सिध्दीस गेले तर देव खरा; नाही तर खोटा, इतकाच देवासंबंधीचा आमचा पुरावा जणू असतो. मागे एकदा पाऊस पडत नव्हता. लोकांनी कोठे महिने महिना शंकरावर अभिषेक धरले. महिन्याने पाऊस आला. आमच्या अभिषेकाने पाऊस आला असे लोक म्हणू लागले. एक गृहस्थ मला म्हणाले, 'पहा श्यामभाऊ ! तुम्ही तरुण लोक देव वगैरे झूठ आहे असे म्हणता; परंतु पाऊस पडला की नाही ?'

मी त्यांना म्हटले, 'आणि पाऊस न पडता, तर तुमचा देव झूट ठरला असता ना ? पाऊस पडला तर देव आहे, न पडला तर देव नाही, असाच याचा अर्थ झाला; परंतु ही खरी देवावरची श्रध्दा नव्हे. तुमच्या श्रध्देपेक्षा महान श्रध्दा आम्हाजवळ आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel