१३. माझी खरुज

पुण्याला मी मामांकडे होतो. त्या काळात जरी मी आजारी कधीही पडलो नाही तरी एकदा मला फारच खरुज झाली. आरंभीच एखाद्या गोष्टीचा नायनाट केला तर ती गोष्ट होत नाही. काही गोष्टी अशा असतात की, त्यांच्याकडे जर लक्ष दिले नाही, वेळीच त्या गोष्टींना आळा घातला नाही तर त्या मग आवरत नाहीत. व्यसने, रोग यांच्या बाबतीत असा प्रकार नेहमी अनुभवास येतो.

मला प्रथम एक फोड झाला, एकाचे दोन झाले. बोटाच्या बेचकातून प्रथम पुटकुळया उठल्या. परंतु त्या लहान पुटकुळया टरारल्या. त्याचे चांगले वाटाण्यासारखे फोड झाले. मी ते फोडून टाकीत असे; परंतु पुन्हा पुन्हा ते फुगत. दोन्ही हात हळूहळू भरले. मी परावलंबी झालो. मला भांडेही उचलता येईना. हाताने जेवता येईना, कपडे धुता येत ना. मी साबण लावून आंघोळ करताना हात धूत असे; परंतु खरुज बरी होण्याचे लक्षण दिसेना.

वाडयातील मुले माझा तिरस्कार करीत. 'त्याला नको रे खेळायला घेऊ. आपल्याला खरुज होईल,' असे सारी मुले म्हणत. झोपाळयावर बसलो तर मुले म्हणत, 'उठ रे श्याम ! इथे आम्ही बसतो. तुझी खरुज आम्हाल हाईल.' मामी मला एशीला हात लावू देईना. एशी रडायला लागली तर मी तिला उचलू जात असे. 'नको रे तिला उचलू खरजुडेराव ! आधी खरुज तर बरी करा स्वत:ची.' असे मामी तिरस्काराने म्हणे. एशी माझ्याजवळ येई; परंतु मामी येऊ देत नसे. सारे माझा तिरस्कार करीत. कोणी म्हणे, 'खाल्लेले पचत नसेल.' कोणी म्हणे, 'कावळयासारखी आंघोळ करीत असेल.' शेवटी मलाही तिरस्कार वाटू लागला. हात तोडून टाकावे, असे मनात येई.

माझी मावशी हिंगणे येथे शिकत होती. तिला कसली तरी रजा होती म्हणून ती चार दिवस पुण्यास आली होती. मावशी पुण्यास आली म्हणजे माझे कपडे स्वच्छ धुणे, हे तिचे पहिले काम असे. कात्री घेऊन ती माझी नखे काढीत असे. परंतु या वेळेस ती आली तर तिचा भाचा खरजेने वेंगून गेला होता. मावशी आली व मी रडू लागलो. 'मावशी ! माझी खरुज होईल का बरी ?' असे अशरण होऊन मी तिला विचारले. मावशीने माझे हात पाहिले. ती म्हणाली, 'होईल बरी.'

घरात लिंबू वगैरे आहे की नाही, त्याची मावशीने चौकशी केली. घरात लिंबू होते. मावशीने मला हाक मारली. ती म्हणाली, 'श्याम ! चल तुझे हात मी धुऊन टाकते.' मावशीने लिंबू व मीठ घेतले. चुलीवरचे कढत पाणी घेतले. आम्ही दोघे नळावर गेलो. मावशीने माझा हात हातात घेतला. 'लिंबाचा रस व मीठ' मावशीने खसाखसा चोळले. माझ्या हातांना झोंबले. मी रडू लागलो. मावशीने खोटी दया दाखविली नाही. तिने माझे हात घट्ट धरुन ठेवले होते. मावशीचे माझ्यावर प्रेम होते; परंतु माझ्या खरजेवर ती कठोर झाली होती. मला हसू यावे यासाठी रडवीत होती. मी रडताना ऐकून काही मुले माझी फजिती कशी होते, ते पहावयास जमली होती. 'अवगुणा हाती । आहे अवघीची फजिती' दुर्गुणी मनुष्याची जगात फजितीच व्हावयाची. जो स्वच्छ राहणार नाही, व्यायाम करणार नाही त्याला खरुज व्हावयाची. नाना रोग व्हावयाचे. त्याचा अपमान व्हावयाचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel